मृण्मयी पाथरे

करोना काळात तरुणाईच्या मानसिक आरोग्यावर परिणाम करणाऱ्या अनेक गोष्टी घडल्या. तरीही आपल्यापैकी कित्येक जणांनी केवळ स्वत:लाच नव्हे तर इतरांनासुद्धा मानसिक आधार दिला. ‘मन:स्पंदने’ या सदराच्या निमित्ताने  काऊन्सिलिंग सायकॉलॉजिस्ट मृण्मयी पाथरे मानसिक आरोग्याशी संबंधित विविध गोष्टींवर तरुणाईशी संवाद साधणार आहे.

upsc exam preparation tips in marathi
UPSC ची तयारी : पर्यावरण पारिस्थितिकी, जैवविविधता
printed receipts toxic body experts stop you must not touch those printed receipts heres why
खरेदीनंतर मिळणाऱ्या पावतीला स्पर्श करणे आरोग्यासाठी ठरतेय घातक? डॉक्टर काय सांगतात? वाचा
forever particles marathi news, forever particles latest marathi news
विश्लेषण : जगभर पिण्याच्या पाण्यात आढळतात घातक `फॉरएव्हर पार्टिकल्सʼ… त्यांचे उच्चाटन अवघड का असते?
Intermittent Fasting risks heart attack
सावधान! ‘या’ प्रकारचा उपवास केल्याने येऊ शकतो हृदयविकाराचा झटका? स्वतःची काळजी कशी घ्याल?

दोस्तहो, २०२१ साल कसं सरलं हे कळलंच नाही ना? आपल्यापैकी बरेच जण दर वर्षांअखेरीस गतवर्षांचा आढावा घेतात. आपलं आयुष्य, करिअर आणि शारीरिक आरोग्य कोणत्या दिशेनं चाललं आहे याची पडताळणी करतात. पण हा आढावा घेताना आपण आपल्या मानसिक आरोग्याकडे फार क्वचित लक्ष देतो. एकंदर या सगळय़ाचा विचार केला की मला ‘फ्रेंड्स’ या सिट-कॉममधल्या जोई या पात्राचा प्रसिद्ध डायलॉग आठवतो – ‘How you doing?’ बऱ्याच काळाने एकमेकांना भेटल्यावर किंवा मेसेज करताना  कित्येकदा हा प्रश्न आपण इतरांना विचारतो. आणि हाच प्रश्न कोणी आपल्याला विचारला, तर आपण एका झटक्यात ‘I am fine’ (मी बरा/ बरी आहे) असं म्हणून जातो. पण खरंच आपल्या सभोवतालची परिस्थिती पाहता आपण ‘fine’ आहोत का?

२०२० पासून करोनाच्या थैमानामुळे कित्येक जणांची आयुष्यं बदलली. प्रत्येक नव्या करोनाच्या व्हेरिएन्टसोबत शिक्षण, नोकरी आणि भविष्याचे प्लॅन्स बदलत गेले. या काळात बरेच जण सतत होणाऱ्या बदलांशी जुळवून घेण्याची धडपड करू लागले आणि प्रत्येक अनलॉकनंतर ‘न्यू नॉर्मल’ची आतुरतेने वाट पाहू लागले. गेल्या दीड – दोन वर्षांत आपल्याला सर्वात मोठी शिकवण जर काही मिळाली असेल तर ती म्हणजे – आपल्या आयुष्यात  uncertainty (अशाश्वती) हीच  certain (शाश्वत) आहे. या काळात शारीरिक आरोग्यासोबतच अनेक जण मानसिक स्वास्थ्याकडेही लक्ष द्यायला लागले. दिवसागणिक होणाऱ्या बदलांना सामोरं जाताना लहानांपासून ते वृद्धांपर्यंत सगळय़ानांच अनेक समस्यांचा सामना करावा लागला. पहिल्या कडक लॉकडाऊनदरम्यान कित्येक जण आपल्या कुटुंबीयांसमवेत ‘क्वॉलिटी टाइम’ घालवता येईल याबद्दल खूश होते. पण या लॉकडाऊनचा काळ जसजसा लांबत गेला, तसतसे बऱ्याच जणांचे लहानसहान गोष्टींवरून खटके उडू लागले. काही घरांत या काळात सर्वात जास्त ताणतणावाला सामोरं जावं लागलं असेल तर ते मुलींना आणि स्त्रियांना. आपला अभ्यास आणि काम मॅनेज करून घरातील इतर कामं करण्याची, दर आठवडय़ाला चमचमीत पदार्थ बनवण्याची आणि कुटुंबीयांना खूश ठेवण्याची अवास्तव अपेक्षा बऱ्याच जणींनी अनुभवली. हळूहळू आपल्याला गृहीत धरलं जात आहे या भावनेचं रूपांतर राग आणि द्वेषात होऊ लागलं.

आजची तरुणाई टेक्नॉलॉजी वापरण्यात कितीही सराईत असली तरी ऑनलाइन शिक्षण आणि ‘वर्क फ्रॉम होम’ बऱ्याच जणांना अवघड गेलं. बऱ्याच गोष्टी ऑनलाइन झाल्यामुळे आपला स्क्रीनसमोरचा वेळ वाढला. समोरासमोर रंगणाऱ्या गप्पांची जागा मेसेजेस, व्हॉइस आणि व्हिडीओ कॉलने घेतली. आपल्या सुखदु:खात इतरांना सामील करून घेताना मायेच्या आणि आपुलकीच्या ओलाव्याची परिभाषा बदलत गेली. इतरांशी कमी होणारा संपर्क काही जणांना नकोसं बंधन वाटू लागलं, तर जे आधीपासून सोशल अँग्झायटी अनुभवत होते, त्यांना लाभलेल्या  एकांतामुळे थोडंसं हायसं वाटलं. शाळेच्या शिक्षणापासून ते ऑफिसच्या कामापर्यंत सगळंच ऑनलाइन झालं. यामुळे काही जणांनी रोजच्या धावपळीतून सुटका झाली म्हणून नि:श्वास सोडला, तर काही जणांकडे वाय-फाय, इलेक्ट्रॉनिक उपकरणं आणि खासगी जागेची कमी म्हणून त्यांची पंचाईत झाली. अन्न/ पाणी, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजांमध्ये इंटरनेटची भर पडली. ज्या गोष्टी एरवी सहज उपलब्ध व्हायच्या, त्यासाठी इंटरनेटवर अवलंबून राहावं लागलं. या काळात करोना झालेल्या रुग्णांची वाढती संख्या कानावर पडत असताना, आपल्या जवळचे कुटुंबीय रुग्णालयात असताना ऑनलाइन लेक्चर्सना उपस्थित राहणं, अभ्यास करणं आणि परीक्षा देणं बऱ्याच जणांसाठी जोखमीचं होतं. केवळ शाळा- कॉलेजचाच अभ्यास नव्हे, तर कित्येक स्पर्धा परीक्षा, निरनिराळे दिवस (डेज) आणि आंतरमहाविद्यालयीन फेस्टिव्हल्स यांच्या अनुभवालाही कित्येक जण मुकले. ज्या कॉलेजच्या प्रथमानुभवांची शाळेतून बाहेर पडलेले विद्यार्थी आतुरतेने वाट पाहतात, त्या अनुभवांना केवळ विद्यार्थ्यांनीच नव्हे तर कॉलेजच्या वास्तूनेही मिस केलं असेल.        

वर्क फ्रॉम होमची तर कथाच न्यारी! ऑनलाइन कामामुळे प्रवासाचा वेळ वाचला म्हणून कित्येक कंपन्यांनी कामात अधिक भर घातली. कामाची वेळ आणि घरच्यांसोबत घालवायचा वेळ यातील रेषा हळूहळू पुसट होत गेली. तुम्ही घरीच बसून काम करत आहात, तर तुम्हाला सुट्टय़ांची गरज काय, अशी काही जणांना ऑफिसमधून विचारणासुद्धा होऊ लागली. अनलॉकनंतर जवळपास सुट्टीवर गेलो तरी लॅपटॉप घेऊन जा आणि वर्क फ्रॉम व्हेकेशन करा अशीही मागणी करण्यात आली. लॉकडाऊनचे र्निबध कालांतराने शिथिल झाल्यावर ऑफिसला प्रवास करताना कित्येकांच्या मनी सार्वजनिक वाहतूक वापरताना करोनाबद्दल भीती होती आणि अजूनही आहे. ऑफिसमध्ये सहकाऱ्यांसोबत जेवताना एकमेकांच्या डब्यातलं जेवण चाखलं तर चालेल का अशी धाकधूकही अनेक जणांच्या मनात होती. यातल्या कितीतरी गोष्टी आपण कोव्हिडपूर्व काळात सहजतेनं करत होतो. खरंच, कोव्हिड-१९ मुळे आपलं जग किती बदलून गेलं, नाही?         

गेल्या दीड-दोन वर्षांत कित्येक नात्यांची गणितंही बदलली. या काळात लॉकडाऊनमुळे बऱ्याच जणांना लाँग डिस्टन्स रिलेशनशिपची चव चाखायला मिळाली. यानिमित्ताने काही जणांना आपल्या नात्याबद्दल जोडीदारापासून थोडं दूर राहून विचार करता आला, तर काही जणांना हा दुरावा असह्य झाला. या अवघड परिस्थितीतही कामाच्या रगाडय़ात काही दुरावलेली माणसं जवळ आली, तर करोनामुळे काही जणांना अकाली निरोप द्यावा लागला. अशा कठीण प्रसंगात आपल्यापैकी काही जणांना लहान वयात मोठय़ा जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागल्या. एकूणच या काळात तरुणाईच्या मानसिक आरोग्यावर परिणाम करणाऱ्या अनेक गोष्टी घडल्या. तरीही आपल्यापैकी कित्येक जणांनी केवळ स्वत:लाच नव्हे तर इतरांनासुद्धा मानसिक आधार दिला. आपण आता ‘मन:स्पंदने’ या सदराच्या निमित्ताने दर पंधरवडय़ाने भेटू, तेव्हा अशा अनेक गोष्टींवर चर्चा करू. हे सदर जरी मानसिक आरोग्याबद्दल असले तरी या सदरातून तुम्हाला शुअर शॉट सल्ले मात्र मिळणार नाहीत, कारण आपल्या प्रत्येकाचं आयुष्य वेगळं आहे. त्यामुळे हे सल्ले जसेच्या तसे आपल्या सगळय़ांच्याच कामी येतील असं नाही. पण या सदरामधून आपलं मानसिक आरोग्य जपण्यासाठी काही सजेशन्स देण्याचा प्रयत्न मी नक्की करणार आहे. चला तर मग, भेटूया लवकरच!

viva@expressindia.com