पारंपरिक महाराष्ट्रीय वस्त्रप्रावरणांना थोडासा आधुनिक टच दिला तर
एकदम वेगळाच लूक मिळेल. मराठमोळ्या तरीही मॉडर्न लूकसाठी
काय करता येईल? सांगतेय मृणाल भगत
हिंदी सिनेमा आणि मालिकांमधून दिसणारी मराठी स्त्री व्यक्तिरेखा आठवून पाहिली तर नऊवारीतली कामवाली, बाचाबाची करत भांडणारी भाजीवाली किंवा मासेवाली, पांढऱ्या साडीतली म्हातारी विधवा शेजारीण किंवा जास्तीतजास्त ‘मला जाऊ दे’ म्हणत लावणीत ठुमके देणारी विद्या बालन डोळ्यासमोर येईल. त्यामुळे मराठी किंवा महाराष्ट्रीय पेहराव म्हटलं की, नऊवारी आणि कल्चर म्हटलं की लावणी हीच आणि एवढय़ापुरतीच आपली समजूत मर्यादित झालेली दिसते. ही समजूत फक्त इतर भाषिक लोकांमध्येच नाही तर आजच्या स्वत:ला मराठी म्हणवून घेणाऱ्या पिढीचीदेखील आहे. त्यामुळे आजची तरुणी नऊवारीच्या पुढे मराठी पेहरावाचा विचार करू शकत नाही. पण आता आपल्याकडे असलेल्या परंपरेला एका नवीन स्तरावर नेण्याची वेळ आली आहे. परंपरेतून आधुनिकता साधायचा हा काळ आहे. नुकत्याच मुंबईत पार पडलेल्या लॅक्मे फॅशन वीकमध्ये डिझायनर श्रुती संचेती आणि हर्षतिा चॅटर्जी देशपांडे या दोन डिझायनर्सनी त्या दृष्टीने प्रयत्नांची मुहूर्तमेढ रोवली आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
मराठी, तरीही आधुनिक आणि ट्रेंडी लूकसाठी आता आपल्याला कुठे दूर जायला नको. आपापल्या आई-आजीच्या कपाटातल्या खास ठेवणीतल्या साडय़ा बाहेर काढून त्यांना एक नवीन ‘लूक’ द्यायला आपणही सुरुवात करू शकतो. त्यासाठी काही टिप्स.
डिझायनर जॅकेट* सुरुवात पठणीने करूया. पठणी म्हणजे पदारावराचा मोर. या पदराचा वापर करून तुम्ही एक छानसं जॅकेट शिवून घेऊ शकता. या जॅकेटला इतर कोणत्याही जादा सजावटीची गरज नाही, सिम्पल गोल गळ्याचं जॅकेट तुम्हाला हव्या त्या उंचीत शिवून घेता येईल. आवश्यक असल्यास जॅकेटला गोल्ड बटन्स लावू शकता. हे जॅकेट्स तुम्ही प्लेन कुर्तीपासून एखाद्या अनारकलीपर्यंत सगळ्यावर घालू शकता. चापूनचोपून नेसलेल्या कॉटनच्या साडीवर हे जॅकेट घातल्यास एकदम हटके लूक येईल.
ट्रेंच कोट
* बरं, आता उरलेल्या साडीचं काय, असा विचार करत असाल तर त्याचा मस्त ट्रेन्च कोट शिवू शकता. हा कोट ‘आऊट ऑफ फॅशन’ कधीच जात नाही. शक्यतो गडद लाल, हिरवा, जांभळा, काळ्या रंगाची साडी असल्यास प्रश्नच नाही. हा कोट तुम्ही नुसता तर घालू शकताच, पण एखाद्या ड्रेसवर घातल्यास याचा अंदाजच निराळा असतो.
डिझायनर अनारकली
* आता वळूयात कॉटन साडय़ांकडे. आयतीच ५ मीटरची साडी लागली आहे हातात तर तिचा ‘अनारकली’ पॅटर्नचा ड्रेस शिवूनच टाका. नेहमीच्या नेटच्या अनारकलीला तो मस्त ऑप्शन ठरेल. फक्त गळ्याचा भाग प्लेन ठेवून त्याला एक पेशवाई बटनपट्टी करून घेतली तर झक्कास. कमरेभोवती, स्लीव आणि बॉटमला साडीची बॉर्डर फिरवा की अगदी खास डिझायनर अनारकली रेडी!!!
* सध्या असिमेट्रिक ड्रेसची फॅशन आहे. या असिमेट्रिक स्टाइलमध्ये अनारकली शिवल्यास तो वन पीस ड्रेस म्हणून पण वापरता येतो.
चेक्ड शर्ट* जर रोज ऑफिसला जाण्यासाठी एखादा कुर्ता किंवा शर्ट तुम्हाला हवा असेल तर नागपुरी काठपदराच्या साडय़ा कधीही चांगल्या. यांच्यावरील चौकडीमुळे शर्टला रिच लूक येईल. लांब बाह्य़ांच्या शर्टला तुम्ही हवं असल्यास कॉन्ट्रास्ट बटनपट्टी आणि कॉलर लावू शकता.
घागरा चोळी
* तीन काँट्रास्ट फॅब्रिक्सचा वापर करून छान घागरा चोळी शिवू शकता. फक्त असं करताना कपडय़ाचा पोत एकच ठेवा. कॉटन कधीही चांगलं. चोळी प्लेन ठेवून बुट्टेदार किंवा इतर िपट्र असलेलं फॅब्रिक घागऱ्यासाठी वापरा. बोल्ड बॉर्डरनी त्याला उठाव आणू शकता.अॅक्सेसरीज
* आता वळूयात दागिन्यांकडे. नथीला सध्या प्रचंड डिमांड आहे. अगदी कान फेस्टिवलच्या रेड कार्पेटपर्यंत ती पोचली आहे. त्यामुळे आता तुमच्याकडे स्वत:ची नथ असणं मस्ट आहे. त्याचबरोबर कोल्हापुरी साज तर असलाच पाहिजे. मोत्याचे दागिने सध्या इन आहेत. तुमच्या सोन्याच्या हारासोबत एखादी मोत्याची सर घालू शकता. कंबरपट्टा तर हवाच. साडी चापूनचोपून घातल्यास कंबरपट्टय़ाने मस्त ग्लॅमरस लूक येतो.
* सध्या फ्लोरोसेंट रंगाच्या कोल्हापुरी चपला पाहायला मिळतात. त्यातल्या गोल्ड आणि सिल्वर चप्पल तुमच्याकडे असल्याच पाहिजेत.
* या सगळ्याबरोबर केसाचा मस्त अंबाडा किंवा साइड बन बांधून एखादी छान पिन किंवा गजरा माळा. बस.. एक अस्सल मराठी लूक तयार.
मग करा सुरुवात! डिझायनर्सनी दिलेल्या क्लूमधून तुमच्या कल्पनाशक्तीला जोर दिलात तर पुढच्या समारंभासाठी तुमचा हटके लूक स्वत:च तयार करू शकता.