मुंबई विद्यापीठाअंर्तगत येणाऱ्या महाविद्यालयांमध्ये काही वर्षांपासून मराठी वाङ्मय मंडळांची स्थापना करण्यात आली आहे. या माध्यमातून आपापल्या कॉलेजमध्ये विद्यार्थी काही कार्यक्रम राबवत असतात. मराठी दिनानिमित्त या मराठी वाङ्मय मंडळांच्या कार्यक्रमांचा घेतलेला धांडोळा..
सेंट झेवियर्स महाविद्यालयासारख्या ‘इंग्रजाळलेल्या’ कॉलेजमध्ये कितपत मराठी वातावरण असेल याचं सगळ्यांनाच कुतूहल असतं. काहींना मराठी वाङ्मय मंडळ आणि झेवियर्स कॉलेज असं समीकरण आहे, हेदेखील खरं वाटत नाही. मात्र मुंबई विद्यापीठाच्या अंतर्गत असणाऱ्या मराठी मंडळांपकी हे सगळ्यात पहिलं मंडळ आहे. यंदाचं हे या मंडळाचं दहावं वर्ष असल्याने वर्षभर अनेक दर्जेदार कार्यक्रम देण्याचं मंडळाच्या कार्यकारिणीने पक्कं ठरवलंच होतं. वर्षांच्या सुरुवातीला झालेल्या ‘आरंभोत्सव’ या कार्यक्रमापासून नुकत्याच पार पडलेल्या ‘आमोद २०१४’ या वार्षकि महोत्सवापर्यंत वर्षभर विविध प्रकारचे कार्यक्रम या मंडळाने केले. त्यात केवळ स्पर्धाच नव्हे, तर नवोदित दिग्दर्शकांच्या लघुपटांचं सादरीकरण, चर्चासत्र असे वेगळ्या प्रकारचे कार्यक्रमदेखील आयोजित केले गेले. ‘झेवियर्स’मधला बहुतांशी अमराठी रसिक वर्ग लक्षात घेता; त्यांना रुचेल, आकर्षति करेल आणि तरीही मराठी संस्कृती जपेल अशी कार्यक्रमांची मांडणी केली गेली. ‘आमोद’च्या शेवटच्या दिवशी पार पडलेला ‘स्वरनाद’ हा लोकसंगीत वाद्यवृंदाचा कार्यक्रम हे याचं उत्तम उदाहरण आहे. या मंडळाने आमोदच्या निमित्ताने अनोख्या पद्धतीचे कार्यक्रम आयोजित केले. यामध्ये ‘स्वराधार’ या संस्थेतल्या अंध कलाकारांनी प्रस्तुत केलेला वाद्यवृंद हा विशेष लक्ष वेधून घेणारा ठरला. अजिंक्य िशदे आणि ओम पाथरे यांच्या अध्यक्षतेखाली असणाऱ्या या वर्षीच्या कार्यकारिणीने मंडळाला यंदा वेगळ्याच उंचीवर पोहोचवलं. अजिंक्यच्याच शब्दांत सांगायचं झालं तर, ‘माझं असं मत आहे की, ठरवलं की काहीही शक्य आहे. आमचं मंडळ आधी जवळपास कार्यशील नव्हतंच आणि आता मात्र मंडळात १६० सभासद आहेत. या गोष्टीचा खरोखरीच अभिमान वाटतो.’ यावर्षीच्या ‘आमोद’मध्ये २५ महाविद्यालयांचे विद्यार्थी सहभागी झाले. केवळ मुंबईच नव्हे, तर उरण आणि चिपळूण या ठिकाणच्या विद्यार्थ्यांनीदेखील आवर्जून भाग घेतला. तेव्हा एखाद्या अमराठी वातावरणाच्या ठिकाणीसुद्धा अशी मराठी चळवळ उभा करण्याचा हा प्रयत्न यशस्वी ठरतो आहे, असं म्हणता येईल यात दुमत नाही.
सोमया महाविद्यालयाच्या मराठी मंडळाकडून विविध कार्यक्रम तसंच स्पर्धाचं आयोजन करण्यात येतं. २७ फेब्रुवारीच्या मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने २६ फेब्रुवारीला बहिणाबाई चौधरी यांच्या कवितांवर सुचिता नलावडे यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयाचे मराठी मंडळ विविध उपक्रमांचे आयोजन करत असले तरीही त्यामध्ये अनेक अडचणी असतात, त्यामुळे कल्पना असूनदेखील काही वेळा एखाद्या कार्यक्रमाचं स्वरूप मर्यादित ठेवावं लागू शकत.
एस. आय. ई. एस. (सायन) महाविद्यालयातील कनिष्ठ विभागात मराठी मंडळ अनेक उपक्रम करत असून, तिथे पदवी शिक्षणाकरिता स्वतंत्र मराठी मंडळ नाहीये. या महाविद्यालयात मराठीतून पदवी शिक्षण पूर्ण करण्याचा ओघ कमी झाल्याने ‘मराठी साहित्य’ हा विषय तिथून हद्दपार झालाय. या महाविद्यालयात दक्षिणात्य भाषिक विद्यार्थ्यांना आरक्षण असल्यामुळे इथे एकंदरच मराठी भाषकांचा भरणा कमी होऊ लागला. त्यामुळे पूर्वी सुरू असलेले मराठी साहित्याचे पदवी शिक्षण आता बंद झालेय.
रुईया महाविद्यालयातील मराठी वाङ्मय मंडळ दरवर्षी नवनवीन उपक्रम राबवते. यंदाच त्यांनी ‘मावा’ (मेन अगेन्स्ट वॉयलेंस अ‍ॅंड अब्युज) समवेत महाविद्यालयात सामाजिक प्रश्नांवर आधारित चित्रपट उत्सव आयोजित केला होता. तसेच गेली ४२ वष्रे प्रा. विष्णुशास्त्री चिपळूणकर यांच्या स्मरणार्थ चालणाऱ्या व्याख्यानमालेस आजही चांगला प्रतिसाद मिळतो. महाविद्यालयातील मराठी मंडळाला मोठी परंपरा लाभल्याने आजही तिथे प्रश्नमंजुषा स्पर्धा असो व एखादी कार्यशाळा, विद्यार्थ्यांचा भरभरून प्रतिसाद येतो.
घाटकोपरमधील झुनझुनवाला महाविद्यालयातील मराठी विभागसुद्धा वर्षभर कार्यरत असतो. त्यांची ‘सहित्यचित्रवेध’ स्पर्धा मोठय़ा प्रमाणावर गाजते. साहित्य व चित्रकलेच्या जुन्या नात्याचा प्रत्यय या उपक्रमातून येतो. त्याचप्रमाणे काळाची गरज लक्षात घेऊन संगणकाचेसुद्धा प्रशिक्षण देणे सुरू आहे. ज्यात युनिकोड तसेच नव्याने जन्मलेली ‘ब्लॉिगग’ची संकृती यांच्याशी ओळख करून दिली जाते. या सर्व महाविद्यालयांत स्वत:ची ओळख पटवून देणारे असे उपक्रम होत असले, तर काव्यवाचन, निबंधलेखन व वक्तृत्व स्पर्धा या सर्वच ठिकाणी होताना दिसतात.
रुईया, रुपारेल, ठाण्याचं जोशी-बेडेकर, डोंबिवलीचं पेंढरकर कॉलेज, पाल्र्याचं साठय़े कॉलेज या महाविद्यालयांमध्ये मराठी विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय असल्याने स्पर्धा आणि इतर कार्यक्रम होतच असतात. रुपारेल कॉलेजच्या श्रेयस मेहेंदळेला मराठी वाङ्मय मंडळाबाबत विचारल्यावर तो म्हणाला की, मी तरी विज्ञान शाखेचा असूनही हा असा विभाग आहे जिथे जास्त अ‍ॅक्टिव्ह असतो. मराठी मंडळांतर्गत अनेक उपक्रम, स्पर्धा आणि कार्यक्रम दर वर्षी राबविले जातात. अगदी मराठी भाषा दिनाचा कार्यक्रमही होतो. त्यांना मिळणारा प्रतिसादही चांगला असतो. पण यावर तो पुढे म्हणाला की या सगळ्या उपक्रमांमध्ये जर इतर कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा सहभाग असेल, तर कॉलेज-कॉलेजमधल्या मराठी वाङ्मय मंडळांचं इन्टरॅक्शन वाढायला मदत होईल. काही कॉलेजमधल्या मराठी वाङ्मय मंडळांची स्थिती जरी निराशाजनक असली तरीही अशा देवाण-घेवाणीमुळे ती वाढू शकते आणि मराठी वाङ्मय मंडळांचा खरा हेतू साध्य होऊ शकतो.
तर आशीष गाडे या साठय़े महाविद्यालयाच्या मित्राला विचारल्यावर तो म्हणाला की, मराठीबद्दल अभिमान असलाच पाहिजे, पण िहदी बोलणं हे आज एक प्रकारचं स्टेटस् झालंय. पण हे चित्र मराठी वाङ्मय मंडळाच्या माध्यमातून नक्कीच बदलता येऊ शकतं. आणि त्यासाठी मराठी वाङ्मय मंडळातर्फे कार्यक्रम होण्याची गरज आहे. शिवाय मराठी वाङ्मय मंडळामध्ये मराठी न येणारीसुद्धा मुलं असतात, त्यांच्याद्वारेही मराठी भाषेचा प्रसार होण्यास नक्कीच मदत होऊ शकते आणि आपण एकप्रकारे मराठी भाषेचं संवर्धन आणि जतन करू शकतो. कारण मराठी भाषेत नक्की काय चाललंय हे जाणून घेण्यासाठी मराठी वाङ्मय मंडळ गरजेचं आहे.
रचना ससंद अ‍ॅकॅडमी ऑफ आíकटेक्चरच्या काही विद्यार्थ्यांनी नेहमीच्या रुटीन अभ्यासासोबतच विचारांची व कलेची देवाणघेवाण व्हावी यासाठी एक हक्काचं व्यासपीठ उपलब्ध व्हावं या उद्देशाने आíकटेक्चरच्या प्रांगणात मराठी मंडळ सुरू केलं. मराठी महिन्यांतील मराठमोळे सण वेगळ्या पद्धतीने साजरे करून त्याद्वारे कलेचा आविष्कार आणि मराठी संस्कृतीचा प्रसार करावा हा विचार काही विद्यार्थ्यांच्या समोर होता; परंतु नंतर हळूहळू उत्साहाचे वारे शांत होऊ लागले. महाविद्यालयाच्या शिक्षकांनी या प्रकल्पासाठी मदत करावी आणि इतर विद्यार्थ्यांनाही या प्रकल्पात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन द्यावं, अशी अपेक्षा विद्यार्थ्यांची आहे.