कडधान्य म्हटलं तर उसळीशिवाय अजून काय, असा प्रश्न पडतो आणि तृणधान्यापासून पोळी, भाकरीशिवाय आपण काही करत नाही. पुढील काही भागात कडधान्य आणि तृणधान्याच्या थोडय़ा वेगळ्या रेसिपीज बघूया. तुमच्यासाठी घरबसल्या चटपटीत मेन्यू कार्ड आम्ही घेऊन आलोय.
पुढील काही दिवस आपण वेगवेगळी कडधान्ये, तृणधान्ये, त्याचे महत्त्व व त्यापासून तयार होणारे पदार्थ यांचा आस्वाद घेऊ. आपल्या शरीराला आवश्यक अशी पोषणमूल्ये कडधान्यातून जास्त प्रमाणात मिळतात. कडधान्य म्हटले तर उसळीशिवाय अजून काय, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडतो आणि तृणधान्यापासून पोळी, भाकरीशिवाय आपण काही करत नाही. या आठवडय़ात आपण ज्वारीबद्दल माहिती व पदार्थ जाणून घेऊया.  ज्वारी ही आहारासाठी वापरल्या जाणाऱ्या अन्नधान्यांपकी एक सामान्य धान्य आहे. ज्वारीला मध्यम प्रतीची काळी जमीन लागते. त्याचे रोप तीन-चार हात उंच वाढते. ज्वारीच्या ताटांना कणसे लागतात, त्यांत ज्वारीचे दाणे तयार होतात. ज्वारीचे हिवाळय़ात व पावसाळय़ात अशा दोन्ही ऋतूंत पीक काढले जाते. हिवाळय़ात ज्वारीचे सुमारे दोन तृतीयांश पीक होते तर, पावसाळय़ात एक तृतीयांश  इतके पीक होते. पावसाळी पिकाची साधारणत:  श्रावण महिन्यात पेरणी करतात.
भारतात ज्वारी सर्वत्र होते. बुंदेलखंड, माळवा, गुजरात, खान्देश, वऱ्हाड, धारवाड व तामिळनाडूमध्ये ज्वारीचे पुष्कळ पीक होते. दक्षिण गुजरातमध्ये ज्वारीचे पीक मोठय़ा प्रमाणात होते. ज्वारीला लवकर कीड लागते, परंतु कणसांमध्ये ती दीर्घकाळपर्यंत टिकते. ज्वारीचा कोवळी कणसे भाजून हुरडा बनवला जातो. ज्वारीचा हुरडा खूपच स्वादिष्ट व पौष्टिक असतो. गुजरातमधील सुरत जिल्हय़ात तर ज्वारीच्या हुरडय़ाचा खास मोसम असतो.
लाल ज्वारी व पांढरी ज्वारी असे ज्वारीचे दोन प्रकार असतात. सोलापुरी व खान्देशी ज्वारी महाराष्ट्रात अत्यंत प्रसिद्ध आहे. ज्वारीमध्ये बाजरीइतकेच पोषक घटक व चरबीचा भाग असतो. रोजचा वापर करणाऱ्यांसाठी ज्वारी आरोग्यास चांगली असते. महाराष्ट्रात खेडय़ांमध्ये ज्वारी हाच मुख्य दैनंदिन आहार असतो. सौराष्ट्र व गुजरातमधील कित्येक खेडेगावात लोक ज्वारीवरच स्वत:चा उदरनिर्वाह करतात. उत्तर गुजरातपेक्षा दक्षिण गुजरातमध्ये ज्वारीचा उपयोग अधिक प्रमाणात करतात. ज्वारीपासून पेज बनवली जाते. ज्वारीच्या लाहय़ाही बनवल्या जातात. ज्वारीपासून कांजीही बनवली जाते. ज्वारीचे पापड, आंबील इत्यादी पदार्थसुद्धा बनविले जाते. ज्वारीची हिरवी ताटे उसासारखीच गोड लागतात. त्यामुळे खेडय़ातील लोक व लहान मुले उसाप्रमाणे ही ताटे खातात. महाराष्ट्रात ज्वारीची भाकरी व लाल मिरच्यांचा ठेचा फार प्रसिद्ध आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ज्वार भाटा
साहित्य : मोड आलेली ज्वारी १ वाटी, धने-जिरे १-१ चमचा, हळद, तिखट चवीनुसार, मीठ चवीनुसार, लिंबू, साखर चवीनुसार, ज्वारीचा पापड १ नग
कृती : मोड आलेली ज्वारी उकडून घ्या. त्याला फोडणी देऊन बाजूला ठेवा. ज्वारीचा पापड भाजून लगेच उलटय़ा ग्लासवर ठेवून त्याला वाटीचा आकार दय़ा. या वाटीत ज्वारीची उसळ भरून खायला दय़ा.

आंबोला भात
साहित्य : ज्वारी १ वाटी, ताक पाव वाटी
कृती : ज्वारी तीन दिवस पाण्यात भिजवून ठेवावी. त्यानंतर पाण्यातून उपसून त्याची कापडाच्या साहाय्याने साले काढून घ्यावीत. नंतर त्याला भारतासारखे शिजवून कच्चं तेल, कढी किंवा ताकाबरोबर खावं.

ज्वारीच्या लाहय़ांच्या वडय़ा
साहित्य : ज्वारीच्या लाहय़ा १ वाटी, जिरे १ चमचा, हिंग पाव चमचा, दही अर्धी वाटी, मीठ चवीनुसार
कृती : लाहय़ा, जिरे, हिंग, मीठ, लाहय़ा भिजतील एवढे दही घ्यावे (दही साईचे घेऊ नये). ज्वारीच्या लाहय़ांमध्ये कचकच असते म्हणून त्या पाण्यातून काढून घ्याव्यात. म्हणजे त्यातील वाळू पाण्यात निघून जाते. हे सर्व मिक्स करून त्याच्या बारीक बारीक वडय़ा कराव्यात व उन्हात वाळवाव्यात. वाळल्यावर त्या बरणीत भरून ठेवाव्यात. तळून व न तळता खायला छान लागतात.

ज्वारीचे धापोडे
साहित्य : ज्वारी १ किलो, तीळ ४ चमचे, मीठ चवीनुसार, तिखट पाऊण चमचा, दही १ चमचा
कृती :- ज्वारीचे पीठ, दही पाणी एकत्र करून रात्रभर भिजत ठेवा. दुसऱ्या दिवशी पिठाच्या दुप्पट पाणी उकळून त्यामध्ये तीळ, मीठ घालून आंबवलेले पीठ घालून चांगले शिजवून घ्या. साधारण डोश्याच्या पिठाएवढे घट्ट करा. नंतर एका कापडावर पळीच्या साहाय्याने पीठ गोल पापडाच्या आकारासारखे पसरवा. दिवसभर उन्हात वाळून ते कापड पालथे करा व त्यावर पाणी िशपडून दोन मिनिटांनी हलक्या हाताने पापड काढून परत एक दिवस वाळवत ठेवा.

ज्वारीच्या कळणाची भाकरी
साहित्य : ज्वारी ४ वाटय़ा, उडीद १ वाटी, खडे मीठ ४ चमचे
कृती : ज्वारी, उडीद व खडे मीठ एकत्र करून दळून घ्यावे व साध्या भाकरीप्रमाणे त्याच्या भाकरी बनवून खावे.

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Millet food
First published on: 27-09-2013 at 01:04 IST