लग्न हा तरुण वयातला एक मोठा, आणि लाइफ चेंजिंग डिसिजन. गेल्या आठवडय़ात लग्न ठरवताना तरुणाईच्या मनात असलेल्या संमिश्र भावना मांडायचा प्रयत्न केला होता. अनिशा आणि तिच्या ‘लग्नाळू’ वयातील मैत्रिणींच्या गोष्टीतून त्यांच्या मनातील गोंधळ दिसला होता. या गोष्टीचाच हा पार्ट टू.
लग्न हा तरुण वयातला एक मोठा, टाळायला अवघड आणि लाइफ चेंजिंग डिसिजन याबाबतीत अनिशा आणि तिच्या मैत्रिणींचा उडालेला गोंधळ आपण मागच्या आठवडय़ात पाहिला. यूथ क्लबच्या ग्रुपमधल्या या दोघी-तिघीजणी सध्या लग्नाच्या प्रोसेसमध्ये होत्या. साहजिकच हा हाँट टाँपिक या वेळी चर्चेला आला. अर्थात संपूर्ण विषय एका बैठकीत संपवणं शक्य नसल्यामुळे फक्त काही पॉइंट्सच डिस्कस करायचे ठरले. सुरुवातीला कुणी जास्त बोलत नव्हतं. खूपसा संकोच, बरचसं अज्ञान. विशेषत: मुलांपैकी बहुतेकांनी यावर फारसा विचार केलेला नव्हता. ‘काय बोलायचं त्यात? बघू वेळ येईल तेव्हा असा अॅटिटय़ूड.’
कुणाल : मी नाही याबाबत विचार करत. आईबाबा पाहून घेतील लग्नाबिग्नाचं. मैत्रीण ठीक आहे, पण लग्न? मला तर ती फार दूरची गोष्ट वाटतेय.
अनिशा : अरे, मला वाटलं होतं की लग्न हा विषय निघाला की माझी आईच पारंपरिक होते, पण इथे तर माझे मित्रही तसे होताना दिसतायत. अशी कशी तुमच्या लग्नाची, बायको शोधायची जबाबदारी आईबाबांवर टाकताय तुम्ही? कधी तुमचं यावर स्पष्ट बोलणं तरी झालंय का? की त्यांच्या आड लपून नवरदेवाचा मान उपभोगायचाय तुम्हाला?
आशय : ए, तू असं जनरलाइज करू नकोस हं. पण तरीही अनिशा, तू सांगतेयस ते काही कम्प्लीटली खोटं नाहीये. माझं धाडस नाही झालेलं अद्याप हा विषय काढायचं त्यांच्यासमोर.
आरती : चेतन भगतचं ‘वन इंडियन गर्ल’ वाचून मला वाटलं की शक्य आहे मुलींना निर्णयस्वातंत्र्याचा हक्क मिळवणं, पण खूप झगडायला लागणार त्यासाठी. आणि मुळात मुलींना शिक्षणानं, विचारांनी आणि पैशानं भक्कम व्हायला लागेल त्याआधी. मग आपण जरा बाहेर पडू आपल्या ट्रॅडिशनल माइंडसेटमधून.
कुणाल : बायकोचा पगार नवऱ्याहून जास्त असणं यात तसं काही वावगं नसलं तरी ते सगळ्यांच्याच पचनी पडेल असं नाही. अशा वेळी निदान बायकोनं ही काळजी घ्यायला हवी की ती त्याचा टेंभा तरी मिरवणार नाही. म्हणजे नवऱ्याला कॉम्प्लेक्स यायला नको.
आरती : हो, पण ही काळजी पार्टनर म्हणून दोघांनीही घ्यायला हवी, जेव्हा नवऱ्याचा पगार जास्त असतो तेव्हाही. आणि मुळात असा कॉम्प्लेक्सच का यावा?
सौरभ : मला खरंच, अगदी मनापासून वाटतं की मुलींना त्यांच्या मनासारखं जगता यावं, पण माझी एक शंका आहे. किती मुली आपल्याला नक्की काय हवंय याबाबतीत स्वत: क्लिअर असतात? एकीकडे त्यांना स्वातंत्र्य हवं असतं, करिअरमधे अडथळे नको असतात. दुसरीकडे नवऱ्यानं आपली काळजी घ्यावी, आपल्याला प्रोटेक्ट करावं, आपला वाढदिवस लक्षात ठेवून भारी गिफ्ट्स आणाव्यात अशीही अपेक्षा असते. माझ्यासारखा मुलगा कन्फ्यूज होतो अशानं. जेव्हा मला एखादी व्यक्ती सांगते की तिला स्वातंत्र्य हवंय, तेव्हा मला नाही वाटत की पावलोपावली तिनं माझी मदत अॅक्स्पेक्ट करावी. म्हणजे मी हे बाहेरच्या कामांबद्दल बोलतोय हं. घरातली कामं कशी वाटून घेता येतील हे काही माझ्या लक्षात येत नाहीये खरंच.
मी : थँक्स सौरभ. तुझ्या मनातला गोंधळ मोकळेपणानं मांडल्याबद्दल.
आशय : हे बघा, तुम्ही जर DINK (Double Income, No Kids) फॅमिली असाल तर ठीक आहे. पण जर मुलं झाली तर काय? त्यांची काळजी घ्यायला तरी घरी नको का राहायला बायकोनं?
मी : मला वाटतं की काही बायॉलॉजिकल घटक आपण नाही बदलू शकणार. उदा. मूल जन्माला घालणं आणि त्याला दूध पाजवणं हे फक्त स्त्रीच करू शकते. पण त्यापुढच्या जबाबदाऱ्या काही निसर्गानं ठरवलेल्या नाहीत. पण आशय, तुला जर असं मनापासून वाटत असेल, तर तुला यावर नीट विचार करावा लागेल. हे विचार पटणारी बायको हवी.
आशय : पण काही जणींना खरंच आवडतं घर सजवायला-सांभाळायला, मुलांची काळजी घ्यायला.
अनिशा : अगदी मान्य आहे हे विधान. पण त्याच न्यायानं, काही जणी अशाही असतील की त्यांना नाही आवडत फक्त घर सांभाळायला. त्यांचा स्किल सेट जरा वेगळा असतो. काही जणी उत्तम स्वयंपाक करू शकतात तर काही जणी प्रभावी प्रेझेंटेशन्स करू शकतात. यात कुठलीही गोष्ट अधिक सुपिरिअर नाही. ज्याला जे आवडतं ते करायची संधी मिळायला हवी इतकंच आहे माझं म्हणणं.
मी : सौरभचं म्हणणं पटतंय मला. तुमच्या ज्या काही अपेक्षा आहेत त्या आधीच क्लॅरिफाय करून घ्यायला हव्यात, आधी स्वत:शी आणि मग होणाऱ्या पार्टनरशी. नाहीतर मध्यम वयाला आले तरी आपल्याला एकमेकांकडून नक्की काय हवंय हे नवराबायकोंना ठाऊक नसतं. मग फक्त ब्लेम गेम सुरू राहतो आणि नकोशा नात्यात अडकल्याची भावना मन कुरतडत राहते. अशा नात्यात काय मजा? या अपेक्षा लवचीक असल्या तर सोन्याहून पिवळं. आपल्यासारखाच इतरांनाही विचारस्वातंत्र्याचा हक्क आहे हे लक्षात ठेवून त्या मॉडिफाय करता येऊ शकतील मग.
अनिशा : हं, कुछ पाने के लिये कुछ खोना पडता है. यातलं काय ‘पाना है’ आणि काय निसटलं तर चालणार आहे हे व्यवस्थित ठरवायला हवं हेच खरं.
लग्न जुळण्याच्या प्रोसेसमधले ताण कोणते आणि का?
लग्न ठरवताना जॉब, पगार, लुक्स, फॅमिली यापलीकडे जातच नाही का आपण? मुलांच्या मनात खरं काय असतं? वरून लिबरल दिसले तरी ते खरंच असतात का? आपल्या नक्की अपेक्षा काय असतात त्यांच्याकडून? मुलींच्या मनात तरी लिबरल म्हणजे काय याबाबत स्पष्टता असते का? तरुण मनांत लग्न ठरवताना नेमके गोंधळ कशामुळे निर्माण होतात?गेल्या आठवडय़ातील पहिल्या भागातल्या गोष्टीतल्या अनिशा, मधुरा यांचं चुकतंय की बरोबर आहे ? त्यांच्या आई- वडिलांची भूमिका पटते का याविषयी तुमची मतं कळवा असं म्हटलं होतं. या आवाहनाला भरभरून प्रतिसाद मिळाला. त्याबद्दल धन्यवाद! या प्रतिसादाची दखल पुढच्या आठवडय़ातील लेखात नक्कीच घेऊ.
डॉ. वैशाली देशमुख viva@expressindia.com
