|| आसिफ बागवान

स्मार्टफोन हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक बनलाय, हे मान्य. परंतु, म्हणून त्याला आपल्या शरीराचाही अविभाज्य घटक बनवायचे, हे मात्र अतिच. गेल्या काही वर्षांत मोबाइलचा अनियंत्रित आणि अनिर्बंधीत वापर सुरू असून त्याचे विपरीत परिणाम वेगवेगळया घटनांमधून दिसून येऊ लागले आहेत. याचे गांभिर्य इतके वाढले आहे की, आता मोबाइलनिर्मितीशी संबंधित कंपन्यांनाही या अतिवापराची धास्ती वाटू लागली आहे.

Loksatta editorial political party Speeches of political leaders criticizing each other
अग्रलेख: घंटागाडी बरी…
Looking For mid range Good smartphone with Best Long stellar battery life Check Out These Five Options
फक्त एकदाच चार्ज करा; बेस्ट बॅटरी लाईफ असणारे ‘हे’ पाच स्मार्टफोन्स स्वस्तात खरेदी करा; संपूर्ण यादी पाहाच
multi asset portfolio, investment, shares, stocks, mutual fund, commodity market, gold, expensive paintings, crypto currency, finance article
मार्ग सुबत्तेचा : मल्टिअ‍ॅसेट पोर्टफोलिओ – काय, का आणि कसा?
Emphsises on right to be free from the adverse effects of climate change
“नागरिकांना हवामान बदलाच्या प्रतिकूल परिणामांपासून मुक्त होण्याचा अधिकार”; सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या निर्णयात महत्त्वपूर्ण काय आहे?

ध्यानसाधनेला जगभरातील प्राचीन संस्कृतींमध्ये महत्त्वाचे स्थान आहे. भारतीय संस्कृतीत तर ध्यानसाधना अगदी मुळाशी आढळते. ‘ध्यानसाधना म्हणजे मनातील सर्व विचारांचे स्वयंमूल्यमापन करणे,’ असे स्वामी विवेकानंद सांगतात. ‘या स्थितीत आपण आपल्या सर्व भौतिक उपाधी त्यागून आपल्याच दिव्य स्वरूपाचा अनुभव घेतो,’ असे वर्णन त्यांनी केले आहे. वेदकाळापासून बौद्ध संस्कृतीपर्यंत प्रत्येक पर्वात ध्यानधारणेला अढळ स्थान असल्याचे आढळून येते. गौतम बुद्धांनी ध्यानाच्या माध्यमातूनच अंतज्र्ञान प्राप्त केले व ती पद्धती आचरण्याचा उपदेश आपल्या शिष्यांना केला. पुढे हीच पद्धती विपश्यना नावाने जगभर प्रसारित झाली. आजघडीला जगभरात असंख्य विपश्यना केंद्रे याच ध्यानसाधनेवर कार्यरत आहेत. रोजच्या धकाधकीच्या, ताणतणावाच्या आयुष्यामुळे आलेला उबग दूर करण्यासाठी असंख्य लोक अशा विपश्यना केंद्रांमध्ये धाव घेतात. काही काळापुरते का होईना सर्व भौतिक गोष्टींचा त्याग करून ते ध्यान आणि मौन यांचे पालन करून मानसिक स्वास्थ्य वाढवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.

हे सगळे इथे, या सदरात सांगण्याचे कारण? ‘वन प्लस’ या आघाडीच्या स्मार्टफोन निर्मात्या कंपनीने गेल्या आठवडय़ात आपल्या मोबाइलमध्ये नवीन अपडेट जारी केले. त्यातून ‘झेन मोड’ नावाची एक सुविधा वन प्लसच्या निवडक मॉडेलमध्ये सुरू झाली आहे. हे ‘झेन मोड’ म्हणजे एक प्रकारची विपश्यनाच. यात काय होते तर, तुमच्या स्मार्टफोनवरील ‘झेन मोड’वर तुम्ही क्लिक करताच, पुढील २० मिनिटे तुमचा मोबाइल समाधीअवस्थेत जातो. या काळात तुम्ही या मोबाइलवर कोणतेही अ‍ॅप चालवू शकत नाही, कोणत्याही मेसेजची देवाणघेवाण करू शकत नाही, फोनचे सेटिंग करू शकत नाही की, व्हिडीओ, गाणी पाहू-ऐकू शकत नाही. केवळ तुम्ही कॉल घेऊ शकता आणि फोटो काढू शकता. हो, मात्र हे काढलेले फोटो पाहायचे असतील तर तुम्हाला ती २० मिनिटे संपायची वाट पाहावी लागेल. आणि या काळात तुम्ही केवळ ‘इमर्जन्सी’ क्रमांकांवरच कॉल करू शकता!

हे ऐकल्यावर काहींना फार विचित्र वाटेल किंवा काहींना ‘यात काय नवीन’ असेही वाटेल. दुसऱ्या प्रकारची भावना असलेल्यांचे काही अंशी खरेही आहे. तुम्हाला मोबाइलचा संपर्क तोडायचा असेल तो सरळ ‘फ्लाइट मोड’ला टाकला की झाले. अगदीच वीट आला असेल तर सरळ मोबाइल ‘स्विच ऑफ’ करायचा. अशा ‘झेन मोड’ची काय गरज? असा प्रश्न त्यांना सहज पडू शकतो. पण यातला महत्त्वाचा फरक हा स्वेच्छा आणि सक्तीचा आहे. ‘फ्लाइट मोड’ किंवा ‘स्विच ऑफ’ केल्यानंतर पुढच्या पाच मिनिटांनी तुमचा विचार बदलला तर तुम्ही मोबाइल पूर्ववत करू शकता. पण ‘झेन मोड’मध्ये तुम्हाला माघार घेता येणार नाही. २० मिनिटे तुम्हाला अजिबात काही म्हणजे काहीच करता येणार नाही.

सध्या इंटरनेट विश्वात वन प्लसच्या या झेन मोडची जोरात चर्चा सुरू आहे. स्मार्टफोनच्या सर्व सुविधा काही काळापुरत्या का होईना वापरता येणार नसतील, तर ‘झेन मोड’ची गरजच काय, असा या चर्चेतला एक मोठा सूर आहे. त्याचे उत्तर जाणून घ्यायचे असेल तर तुमच्या वन प्लस मोबाइलवर एकदा हा ‘झेन मोड’ सक्रिय करून पाहाच. फोनवरील ‘झेन मोड’चे बटण दाबताच डिस्प्लेवर ‘फोन डाऊन, एन्जॉय लाइफ’ हे वाक्य झळकते. ‘तुमच्या फोनमधून २० मिनिटांचा ब्रेक घ्या. तेवढय़ा वेळात आराम करा, निवांत व्हा आणि मन शांत करा,’ असे हा संदेश सांगतो. ‘झेन मोड’ची गरज या वाक्यांतून लगेच स्पष्ट होते.

सध्या मोबाइल हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक बनला आहे. सकाळी झोपेतून डोळे उघडताच आपले हात पहिल्यांदा उशीजवळ ठेवलेला मोबाइल चाचपडतात. नाश्त्याच्या टेबलावर एका हातात चहाचा कप आणि दुसऱ्या हातात मोबाइल हे चित्र घरोघरी दिसते. कामावर जाताना रेल्वेत किंवा बसमध्ये मोबाइलमध्ये खुपसलेल्या माना सर्रास पाहायला मिळतात. कामावरही कुणाचे लक्ष नाही पाहून सोशल मीडियावर चार-पाच ‘फेऱ्या’ मारून होतातच. तेथून घरी परतताना पुन्हा खुपसलेल्या माना, रात्री जेवताना ताटापेक्षा मोबाइलकडे लागलेले डोळे आणि बिछान्यात अगदी हातातून मोबाइल निसटेल इतकी पेंग येईपर्यंत सुरू असलेली कसरत, हे सगळे असेच आणि याच क्रमाने सुरू असते. काही कारण नसतानाही उगाच मोबाइलशी चाळा करणारे तर वेगळेच.

‘कर लो दुनिया मुठ्ठी में’ असे सांगत दाखल झालेल्या मोबाइलनेच आज अवघ्या दुनियेला आपल्या मुठ्ठीत बंद केले आहे. ‘ईमार्केटर’ या संस्थेने या वर्षी एप्रिलमध्येच केलेल्या पाहणीनुसार, भारतीयांच्या दिवसभरातील वेळेच्या २५.२ टक्के इतका वेळ मोबाइलवर खर्च होतो. ‘नेल्सन’ या अन्य एका संस्थेच्या निरीक्षणानुसार भारतीयांच्या मोबाइल वापरातील निम्म्यापेक्षा अधिक वेळ हा व्हिडीओ स्ट्रीमिंग, इंटरनेट ब्राऊजिंग किंवा सोशल मीडियावर खर्च होतो. हे आकडे केवळ दिशादर्शक आहेत. पण मोबाइलच्या अतिवापराचे विपरीत परिणाम आपल्याला वेगवेगळ्या घटनांतून सहज दिसून येतात. मोबाइल न मिळाल्याने आत्महत्या, मोबाइलसाठी चोरी, मोबाइलच्या सतत वापरामुळे जडलेल्या शारीरिक व्याधी, वाहन चालवताना मोबाइल वापरामुळे घडलेले अपघात अशा घटनांबाबत आपण नेहमीच ऐकत असतो. याखेरीज मोबाइलमध्ये तल्लीन झाल्यामुळे घरात किंवा ऑफिसात होणारे दुर्लक्ष आणि त्यामुळे निर्माण होणारे ताणतणावाचे प्रसंग या घटनांची तर नोंदच नाही. मोबाइलच्या अनियंत्रित वापरामुळे आपल्या जीवनशैलीत अनेक आव्हाने निर्माण झाली आहेत.

वापरकर्त्यांमधील मोबाइलचे हे वेड आता मोबाइल निर्मात्यांनाही भीतिदायक वाटू लागले आहे. त्यामुळेच की काय, ‘वन प्लस’ने ‘झेन मोड’ सुरू केला. पण हे करणारी ‘वन प्लस’ ही एकटी कंपनी नाही. गेल्या वर्षी गूगलच्या डेव्हलपर कॉन्फरन्समध्ये ‘डिजिटल वेलबिइंग’ नावाची संकल्पना मांडण्यात आली. ही संकल्पना म्हणजे, मोबाइलमध्ये तुम्ही किती आणि काय वापरता, याचा आरसा आहे. ‘डिजिटल वेलबिइंग’ सुरू करताच ते अ‍ॅप तुम्हाला तुमचा फोन दिवसभरात कोणत्या कारणासाठी किती वापरण्यात आला, याचे आकडेच सादर करते. एवढेच नव्हे तर, तुम्हाला दिवसभरात किती नोटिफिकेशन आले, हेही ते दर्शवते. तुम्ही मोबाइल लॉक-अनलॉक किती वेळा केला हेही ते नोंदवून ठेवते. ही सगळी माहिती पाहिल्यावर तुम्हालाच तुमच्या मोबाइल वापरावर नियंत्रण आणायची इच्छा व्हावी, अशी ‘गूगल’ची इच्छा. पण तसे वाटत नसल्यास या अ‍ॅपच्या माध्यमातून तुम्ही काय किती वापरायचे, याची मर्यादाही आखून घेऊ शकता. मध्यंतरी यूटय़ूबनेही तो प्रकार करून पाहिला होता. पण त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही.

‘झेन’ हा शब्द चिनी बौद्ध संस्कृतीतून आला असला तरी, त्याचा उगम जपानी भाषेतला आहे. ‘ध्यान’ या शब्दाचा तो जपानी समानार्थी शब्द आहे. ‘झेन मोड’ हे एकप्रकारे मोबाइलची ध्यानसाधना आहे. अर्थात ही ध्यानसाधना मोबाइलपेक्षा तो वापरणाऱ्याला शांती मिळवून देणारी आहे. या शांतीची सध्या आपल्याला सर्वाधिक गरज आहे.

viva@expressindia.com