|| स्वप्निल घंगाळे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मारीयो, कॉन्ट्रा, टँक्स, ऑलंपिक, सर्कस, डक हण्ट, स्ट्रीट फाइट, एफ वन रेस, टेनिस, फुटबॉल

‘आमचा छोटा मोबाइलवर यूटय़ूब पाहतच जेवतो,’ या संवादावर उत्तर आले ‘तुमचा तरी छोटा आमचा सुपुत्र १२ वीला असूनही सतत त्या मोबाइलमध्येच असतो’. वडिलांच्या ग्रुपवरील या तक्रारीचा सूर एकंदरीतच पोरं बाहेर खेळायला जात नाहीत आणि घरातच मोबाइलवर पडीक असतात यासंदर्भातील असतो. मात्र अशा प्रकारे ‘आमच्या काळात असं नव्हतं बुवा’ प्रकारातील आई-वडीलच नव्हे तर अगदी ९० च्या दशकातील मुलं म्हणजे आता विशीत असलेली तरुणाईही सध्याच्या बालगोपाळांकडे पाहून हेच म्हणताना दिसते. खासकरून उन्हाळ्याच्या सुट्टय़ांमधील खेळ आणि मज्जा मोबाइल आणि सध्याच्या क्लासेसच्या युगात हरवत चालल्याची खंत तरुणाईकडून व्यक्त होते आहे..

‘अरे मी मारिओच्या पुढच्या स्टेजला पोहचलो..’, ‘कॉन्ट्राचा तो शेवटचा टप्पा कसा क्लियर करायचा रे?..’, ‘कालच घेतलेल्या नवीन कॅसेटमध्ये ९,९९९ गेम्स आहेत..’, ‘अरे यार ती पाचव्या लेवलमधील उडी किती कठीण आहे..’, ‘नाही रे तो दुसरा दरवाज्याच्या मागे जास्त पॉइण्ट्स आहेत..’, ‘माझ्या घरी येऊ न माझ्याविरुद्ध खेळून दाखवत तर मानला तुला’, ‘मारीओपेक्षा टॅण्क खेळायलाच जास्त मजा येते..’ दशकभरापूर्वी उन्हाळ्यात बच्चे कंपनीच्या चर्चेत ऐकू येणारे हे संवाद सध्या आऊ टडेटेड झाले आहेत. त्याची जागा आता फेसबुक, व्हॉट्सअप मोबइल अ‍ॅप आणि पालकांनी सक्तीने लावलेल्या प्रशिक्षण शिबिराच्या चर्चानी घेतली आहे. त्यातही आता व्हॉट्सअप किंवा डिजिटली उन्हाळ्याची सुट्टी जास्त सेलिब्रेट केली जाते. म्हणजे मैदाने ओस पडली आहेत अन् पबजीसाठी पोरं ऑनलाइन आहेत, अशी आजची स्थिती आहे.

एक-दीड दशकापूर्वी अशी परिस्थिती नव्हती. तेव्हा उन्हाळ्याची सुट्टी खऱ्या अर्थाने साजरी व्हायची. मुलं आतुरतेने वाट पाहायचे उन्हाळ्याच्या सुट्टीची. अर्थात, तेव्हा तंत्रज्ञान आजच्या इतकं पुढारलेलं नव्हतं. त्यामुळे गावच्यांशी सतत फोनवरून संपर्क नसल्यामुळे वगैरे गावचा ओढा अधिक असायचा आणि आता सतत कनेक्टेड असल्याने तो कुठे तरी कमी झालाय असंच दिसून येतं आहे. मुळात त्या वेळी मोबाइल फोन्सच नव्हते. त्यामुळे पहिले डिजिटल गेम्स ठरले ते टीव्हीवरील व्हिडीओ गेम्स. १९९५ ते २००५ या दहा वर्षांच्या काळात टीव्हीवर खेळता येणाऱ्या व्हिडीओ गेम्सने मुलांवर अक्षरश: गारुड केले होते. १९९१ नंतर भारताने जागतिकीकरणाला आपलेसे करत आर्थिक धोरणांमध्ये बदल करत अनेक नवीन गोष्टी आपल्याशा केल्या. याच ट्रेण्डमध्ये मनोरंजन क्षेत्राची भरमसाट वाढ झाली. त्यातही उपभोग घेणारे म्हणजेच प्रेक्षक वाढले. परदेशातून अनेक गोष्टी भारतात पहिल्यांदाच दाखल झाल्या त्यापैकीच एक म्हणजे टीव्ही व्हिडीओ गेम्स. नव्वदचे दशक संपता संपता हा ट्रेण्ड बाजारात आला. अगदी दीड हाजाराला मिळणाऱ्या मेड इन चायनापासून हजारो रुपयांचे ब्रॅण्डेड व्हिडीओ गेमसेट हातोहात विकले गेले होते या काळात. अंदाजे २००२ ते २००५ दरम्यान शहरी भागांमध्ये तर या व्हिडीओ गेम्सचा ट्रेण्डच होता. म्हणजे लहान शाळकरी मुले असणाऱ्या घरांमध्ये असा व्हिडीओ गेम सेट दिसणे काही विशेष राहिले नव्हते. अनेक जण तर प्रत्येक वर्षी प्रत्येक सुट्टीसाठी एक याप्रमाणे सर्व प्रकारचे व्हिडीओ गेम्स यूज अ‍ॅण्ड थ्रो बेसिसवर वापरल्याचे सांगतात. त्यातील बहुतेक जणांनी बालपणीच्या आठवणीच्या वस्तूमध्ये तो कॅसेटचा स्लॉट असणारा बॉक्स, कन्ट्रोलर संग्रहित ठेवले आहेत, ९०’ज कीड्स मेमरी म्हणून.

उन्हाळ्याची सुट्टी लागली रे लागली की पालकांकडे हट्ट करून हा गेमसेट मिळवण्याची परीक्षा मुलांना पार करावी लागत असे. मात्र एकदा अशा प्रकारे आई-वडिलांना मस्का मारण्यात यश मिळाले की मुलांची सुट्टी सुखात जात असे. बरं ज्यांचा हा खर्चीक हट्ट आई-वडिलांनी पुरवला नाही ती मुलं मित्राच्या आई-बाबांचा आशीर्वाद म्हणून त्यांच्या घरी जाऊ न गेम खेळायचे. पण त्या काळी हे व्हिडीओ गेम्स मर्यादेत खेळले जायचे. म्हणजे कॉलनीतील सगळी पोरं दुपारी एखाद्याच्या घरी जमायची अन् आलटून पालटून आळीपाळीने स्पर्धा लावत हा गेम खेळायची. दुपार सरली की संध्याकाळी मैदानी खेळ व्हायचे. या डिजिटल आणि रिअल खेळांमध्ये सुट्टी कधी संपायची कळतच नसे. या गेमसेटबरोबर मिळालेल्या कॅसेटमधील गेम्स खेळून खेळून कंटाळा आला की, नवीन कॅसेटसाठी हट्ट आणि ही कॅ सेट घेताना त्यातील गेम्सपेक्षा त्यांच्या रंगाला प्राधान्य दिले जात असे. शंभर दीडशे रुपयांना मिळणारी कॅसेट आणली की पुन्हा नव्या जोमाने टीव्हीसमोर गेम खेळण्याचा उत्साह संचारत असे. मात्र ९,९९९ इन वन असे ठळक अक्षरात लिहिलेले असताना प्रत्यक्षात त्या कॅ सेटमध्ये मोजके २० ते २५ गेम्स असायचे. उन्हाळा संपून शाळा सुरु होईपर्यंत अनेकांचा दिनक्रम आणि हट्टांचा पॅटर्न ठरलेला असायचा. जुनच्या दुसऱ्या आठवडय़ात शाळा सुरू झाल्यावर काही नवीन मिळाल्याच्या आनंदात दिवाळीपर्यंत मारियो आपल्या दोस्तासह कपाटात कायमचा बंद व्हायचा.

हे गेम्स खेळण्याआधी करावी लागणारी कसरत एखादा इलेक्ट्रिशियनचा कोर्स करण्याइतकीच किचकट होती. आई-वडिलांनाही कळणार नाही इतकी वायरिंग करता येत असल्याने मुलांची कॉलर एकदम टाइट असे. सर्व वायर्स बरोबर लावणे, एव्ही टीव्हीची सेटिंग चेक करणे, गेमचा चार्जर एक्सटेन्शनला लावणे. वायर आखूड असल्यास खाली उशा, पुस्तकं, गेम बॉक्सच्या कव्हरचा टेकू देऊन त्याला लाल, पिवळ्या, पांढऱ्या कलरच्या वायर योग्य जागी जोडणे, पुढे पोर्टल नसेल तर टीव्हीमागून वायरिंग करण्यासाठी धडपडणे, ही सर्व सेटिंग झाल्यानंतर दिवसभर या सेटअपला धक्का न लावता त्याच्या आजूबाजूलाही कोणी फिरकणार नाही याची काळजी घेणे, यामध्ये गेम खेळण्यापेक्षा जास्त मज्जा येत असे. महाग गेम असला तर डक हण्टसारखे गेम खेळण्यासाठी दिलेली ती गन वापरण्याचा अनुभव आपल्याला नेमबाज असल्याचा भास देऊन जाई.

मात्र २००५ नंतर टीव्हीला सोबत करायला संगणक आणि मोबाइल्स आले. या दोन्ही गोष्टींनी वाऱ्याच्या वेगाने प्रगती करत अगदी आजच्या दिवसापर्यंत मजल मारली. या शर्यतीमध्ये व्हिडीओ गेम्स खूप मागे राहिले. त्यामुळेच व्हिडीओ गेम्सला घरा आणि मनाबाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. त्यानंतर रोड रॅशपासून सुरू झालेला गेमचा सपाटा आता पबजीपर्यंत येऊन पोहोचला आहे. त्यामुळेच घरातील टीव्हीवर खेळता येणारे व्हिडीओ गेम पुढच्या पिढीपर्यंत पोहोचलेच नाहीत. आज ते व्हिडीओ गेम्स ९० च्या दशकात जन्मलेल्या आणि सध्याच्या तरुणाईच्या कपाटांमध्ये पडून आहेत. (अर्थात अनेकांच्या नाही अगदी मोजक्या लोकांकडे ते आठवण म्हणून आहेत.) फेसबुकवर अधूनमधून या गेम्सची आठवण येत असल्याचे फोटो आणि स्टेटस अपडेट होत असतात. विशेष म्हणजे उन्हाळ्यात अशा स्टेटसला ऊत येतो. फेसबुकवरून येणारी या गेम्सची आठवण इतकीच काय ते या गेम्सचे अस्तित्व शिल्लक राहिले आहे. आजची मुले उन्हाळ्यात ऑनलाइन गेम्स खेळतात, फेसबुकवर टाइमपास करतात आणि शिबिरांमध्ये अडकून आहेत त्यामुळे त्यांच्यापर्यँत हे गेम्स पोहोचणे तसेही शक्यच नाही आहे.

व्हिडीओ गेम्स खेळतानाचे ठरलेले जुगाड

  • बॉक्स हलणार नाही याची स्पेशल काळजी घेणे
  • कॅसेटचे कव्हर तुटले तर फक्त त्या पांढऱ्या आकृत्या असणाऱ्या हिरव्या चिप वापरून नवीन कॅसेट मिळेपर्यंत दिवस ढकलणे.
  • चीपही चालत नसेल तर ती खोडरबरने साफ करणे (कारण हा प्रिय मित्राचा सल्ला असतो)
  • डक हण्ट खेळताना गनमुळे वायर कनेक्शन तुटणार नाही म्हणून टीव्ही स्क्रीनच्या एकदम जवळ जाऊन नेम साधणे.

 

viva@expressindia.com

मराठीतील सर्व व्हिवा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Most popular video games
First published on: 17-05-2019 at 00:12 IST