‘सा रे ग म प ध नी सा..’ तो हार्मोनियम वाजवत विद्यार्थ्यांकडून स्वर घोटून घेतो. कीबोर्ड नि तबलाही वाजवतो. ‘म्युझिक थेरपी’त त्याला पोस्ट ग्रॅज्युएशन करायचंय. सध्या तो सॉफ्टवेअर इंजिनीअरिंग करतोय. पण आय.टी. फील्डमध्ये अजिबात जाणार नाहीये. नुकतीच त्याला कॉम्प्युटर सायन्सची डिग्री मिळाल्येय. तो इव्हेंट मॅनेजमेंट करतो नि समाजकार्याची त्याला आवड आहे. हा संगीतप्रेमी आहे, आशीष कसबे!
त्यानं लहानपणापासून संगीताची आवड जोपासली. त्यासाठी त्याला घरून पूर्ण पाठिंबा मिळाला. सहावीत त्यानं तबलावादक रवळेकर यांच्याकडं प्रशिक्षण घ्यायला सुरुवात केली. कीबोर्डसाठी त्याला गोसावीसरांचं मार्गदर्शन लाभलं. सध्या तो सुबोध चौकीदार यांच्याकडं तबला नि पूनम देशमाने यांच्याकडं हार्मोनियम शिकतोय. गायनाचं प्राथमिक प्रशिक्षण त्यानं पंडित तुपे यांच्याकडून घेतलंय. तो सांगतो की, ‘या गोष्टींत गाण्यातील मूलभूत गोष्टीचं ज्ञान आहे. ओमकार साधना, गाण्यातल्या सुरांवरून हार्मोनियमखेरीज एखादा सूर वर-खाली कसा घ्यायचा आदी अनेक गोष्टी त्यांनी शिकवल्या होत्या.’ त्यांच्याकडं शिकलेल्या या गोष्टी त्याला आजपर्यंत उपयोगी पडताहेत नि पुढंही पडतील. तो शारदाश्रम शाळेत दोन वर्षे संगीतशिक्षक होता. तिथं त्याला शालेय स्पर्धामध्ये मुंबई स्तरावरचं पहिलं नि दुसरं बक्षीस मिळालंय. याच दरम्यान त्याला उत्कृष्ट संगीतदिग्दर्शक म्हणून पुरस्कारही मिळालाय.
सध्या तो ‘बालमोहन विद्यामंदिर’च्या कम्युनिटी स्कूलमध्ये कीबोर्ड शिकवतोय. आशीष म्हणतो की, ‘एका मित्रानं वीस हजारांचा कीबोर्ड कर्ज काढून मला घेऊन दिला. आता तो सर्व कर्ज फेडतोय. अर्थात मीही त्याला जमेल तसे पसे परत देतोय. पण त्यामुळं माझी प्रॅक्टिस चांगली झाली. मी शक्यतो इंडियन क्लासिकल कीबोर्डच शिकवतो. त्यातल्या सुरावटींमुळं मुलांची बोटं चांगली बसतात. मुलांची मानसिकता ओळखून त्यांना शिकवण्यासाठी पंडित शशांक कट्टी यांच्याकडं शिकलेल्या म्युझिक थेरपीचा मला खूप उपयोग झालाय. संगीतामुळं मन खूप शांत नि एकाग्र होतं. कीबोर्ड वाजवताना एकाग्रतेला खूप महत्त्व आहे. कारण मन एकाग्र नसेल तर मुलांना कीज् वाजवणं कठीण जाईल. ही एकाग्रता अभ्यासासाठीही खूप उपयोगी पडते.’
तो ‘श्री गुरुसमर्थ गायन-वादन विद्यालया’त हार्मोनियम, कीबोर्ड, सुगम संगीत, उपशास्त्रीय-शास्त्रीय गायन शिकवतोय. इथं शिकवताना पंडित तुपे यांनी शिकवलेल्या गोष्टी त्याला उपयोगी पडतात. तो सांगतो की, ‘शिकवण्याचं टेक्निक मला त्यांच्याकडून कळलंय. कारण संगीत शिकवणं हे कमी, पण ते समजून उमजून घेऊन आत्मसात करण्याकडं आपला कल असायला हवा. शिकण्यामुळं आपल्याला एक पद्धत कळू शकते, पण पुढं आपण प्रॅक्टिस करून आपल्या अंगानं ते आत्मसात केलं पाहिजे. एखाद्या झऱ्यासारखं पुढं पुढं वाहत राहिलं पाहिजे..’
‘सिद्धार्थ कॉलेज’मधून त्यानं अकरावी-बारावी सायन्स केलंय. पुढं ‘डी. जी. रुपारेल कॉलेज’मध्ये कॉम्प्युटर सायन्सला त्यानं अॅडमिशन घेतले. तिथं तो एनसीसी युनिटचा हेडही होता. इतर धावपळीमुळं अभ्यासात त्याची तारांबळ उडत होती. पण सगळ्यांच्या सहकार्यानं ते निभावलं. नुकतीच त्याला कॉम्प्युटर सायन्सची डिग्री मिळाल्येय. सध्या तो ‘एन.आय.आय.टी.’त सॉफ्टवेअर इंजिनीअिरग करतोय. पुढं इन्स्टिटय़ूटमधून मिळणारी एक वर्षांची एन्ट्रन्सशिप तो करणारेय. मात्र आय.टी. फील्डमध्ये जाणार नाहीये. तो म्हणतो की, ‘आय.टी. हा माझा िपड नाही. मला संगीताचीच आवड आहे. आय.टी. फील्डच्या क्रेझमुळं तिकडं वळलो खरा, पण त्यातले सततचे तणाव, वेळ-अवेळ आणि त्याचा तब्येतीवर होणारा परिणाम लक्षात आल्यानं त्यात करिअर न करण्याचा निर्णय घेतला. वर्षभराच्या एन्ट्रन्सशिप अनुभव गाठीशी बांधून मला ‘म्युझिक थेरपी’ शिकण्यासाठी चेन्नईला जायचंय.’
‘चेन्नई स्कूल ऑफ म्युझिक’ या भारतातल्या एकमेव इन्स्टिटय़ूटमध्ये म्युझिक थेरपी शिकवली जाते. याआधी त्यानं मुंबईत पंडित शशांक कट्टी यांच्याकडं सहा महिन्यांचा बेसिक कोर्स केलाय. सहा महिने इंटरनेटवरून आणि सहा महिने तिथं जाऊन शिकणं असा हा ‘पोस्ट ग्रॅज्युएशन इन म्युझिक थेरपी’चा वर्षांचा कोर्स आहे. पुढं त्याला त्यातच पीएच.डी. करायचंय. आशीष म्हणतो की, ‘संगीतप्रेमी विद्यार्थ्यांसाठी हा चांगला पर्याय उपलब्ध होईल. या क्षेत्रात इन्स्ट्रमेंटर्स, सिंगर्स, डॉक्टर्स, फिजिशियनना जाता येईल. म्युझिक थेरपी ही एक सपोर्टव्हि ट्रीटमेंट असून तिचे चांगले रिझल्ट मिळतात. म्युझिक थेरपीतले सूर स्पेसिफिक नि टाइम रिलेटेड असतात. त्यात रुग्णाला उपयुक्त असणाऱ्या रागतले काही विशिष्ट सूर विशिष्ट प्रकारे आळवावे लागतात. ते गायन अथवा वादनानं शक्य होतं. म्युझिक थेरपी शिकून परत आल्यावर मी एखादी एनजीओ किंवा विद्यापीठाला अॅप्रोच होणार आहे.’
आशीषनं काही महिने ‘एलिट पल्स’ कंपनीत इंटरनॅशनल लेव्हलच्या कॉन्फरन्ससाठी काम केलंय. संबंधित कंपन्यांच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून कॉन्फरन्सची माहिती देणं, कॉन्फरन्सच्या दिवशी रजिस्ट्रेशन नि अरेंजमेंट बघायचा. डिनरच्या वेळी कीबोर्ड प्ले करायचा. तो सांगतो की, ‘या कामामुळं मला या क्षेत्रातले एथिक्स-एटीकेटस् कळले. परदेशी क्लाएंटशी संवाद साधल्यानं भाषिक ज्ञानात भर पडली. कीबोर्ड वाजवल्यावर त्यांनी दिलेल्या ‘यू डन अ गुड जॉब’ या अभिप्रायानं मानसिक समाधान मिळालं. संगीताला कोणत्याही सीमारेषा नसतात, ही खूणगाठ मी मनाशी बांधली. अजूनही या कंपनीशी माझा चांगला रॅपो आहे.’ सुशांत पोळ, आशीष कसबे, विश्वनाथ या कॉलेजमधल्या मित्रांनी ‘सॅव्ह’ या इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीची स्थापना केली. त्यांनी ‘मुंबई विद्यापीठा’च्या कॉन्फरन्सेस, काही वृत्तपत्रांचे इव्हेंटस्, ‘रुपारेल कॉलेज’चा ‘विहंग फेस्टिव्हल’ आदी इव्हेंटस् मॅनेज केलेत.
समाजसेवेची पाश्र्वभूमी त्याच्या घरीच आहे. त्याच्या वडिलांनी स्थापन केलेल्या ‘नवभारत अभियान प्रतिष्ठान’ या तरुण, मुलं नि स्त्रियांसाठी काम करणाऱ्या एनजीओसाठी आशीष काम करतो. समाजसेवेचा खारीचा वाटा उचलताना या माध्यमातून समाजमन जागृत करता येईल, असं त्याला वाटतं. रेनवॉटर हार्वेिस्टगच्या संदर्भात ‘मॉब’ संस्थेच्या अमित जठार यांच्याशी ओळख होऊन त्याचा ग्रुप त्यांना जॉइन झाला. जुहूची नालंदा संस्था, शिवाजी पार्क आदी ठिकाणी ‘मॉब’तर्फे रेनवॉटर हार्वेिस्टग केलं जाणार आहे. सध्या त्यांची टीम महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांतल्या काही गावांत पाणीप्रश्नाशी निगडित सर्वेक्षण करतेय.
या सगळ्या धडपडीत आशीषला अनेक व्यावहारिक अनुभव येत गेले. तेव्हा मनातल्या भावना व्यक्त करण्यासाठी त्यानं शब्दांचं माध्यम निवडलं. तो खूप लिहायचा नि त्या गाण्यांना चाली लावायचा. ‘पर्णिका’ संस्थेच्या ‘महाराष्ट्र उत्सव स्पध्रे’त त्यानं रचलेल्या गाणं-संगीताला प्रथम क्रमांक मिळाला होता. शिवाजी महाराजांवरचं मराठी रॉक प्रकारातलं गाणं अनेकांना आवडलं होतं. ‘डी. वाय. पाटील’ कॉलेजमधल्या स्पध्रेत लिरिक्ससाठी दुसरा क्रमांक मिळाला होता. ही गाणी प्रकाशित करायची त्याची इच्छा आहे. संगीताला आपलं मानणारा आशीष त्यावर भरभरून बोलतो. तो म्हणतो की, ‘संगीताची आवड व्यक्तिपरत्वे बदलते, हे मान्य आहे. त्या अनुषंगानं बघता, जुन्या गाण्यांतल्या मेलडीमुळं ती अजूनही लोकप्रिय आहेत. त्यात शब्द, चालीला महत्त्व होतं. अलीकडंच्या चालीत मात्र ऱ्हिदमवर फोकस केलेला असतो. या पाश्र्वभूमीवर जुन्या गाण्यांचं महत्त्व जाणवतं. माझ्या लिखाण नि संगीतात जुन्या गाण्यांतला गोडवा जपण्यावर मी भर देतो. हे हरवणारे सूर कुठंतरी जपायला हवेत.. सध्याच्या लहान मुलांची पहिली आवड बऱ्याचदा ढिंच्याक संगीतच असतं. कारण त्यांना मेलडी माहीतच नसते. गाणं शिकवताना मेलडीची ओळख त्यांना करून देतो. नवीन गाण्यांच्या हॅमिरगमुळं त्यांचं मार्केटिंग होतं. त्याच धडाक्यानं जुन्याचा गोडवा जाणवून देऊन दोघांचा मेळ घातला तर सुरांना अधिक बहार येईल..’ आशीषच्याच शब्दांत सांगायचं तर, ‘सारे खचले, सारे संपले, कुणी रंजले, कुणी गांजले. आज स्वत:च्या बळावरती, असाच जा तू पुढे, आशेचा बघ किरण निघाला, घेऊन ये नवचतन्याला, पाश तमाचे तोडून आता, असाच जा तू पुढे..’
लर्न अॅण्ड अर्न या नव्या कॉलममधून तुम्हाला तुमच्या अशा काही मित्रांना आणि मैत्रिणींना भेटायला मिळणारेय जे शिकताना स्वतची आवड जपत आहेत. अर्थात ही आवड म्हणजे केवळ छंद जोपासण्याइतपत मर्यादीत नाही तर ही आवड आर्थिकदृष्टय़ा सक्षम होण्याची आहे. तरूणांमध्ये अलीकडे लर्निग प्लस अर्निग हे चित्र दिसून येत आहे. पूर्वी केवळ समर जॉब करणारे चेहरे आता कॉलेजच्या लेक्चर्ससह इतर जॉबसाठीही वेळ देत आहेत. अशाच तरूणांची आणि त्यांच्या कामाची महती आपण जाणून घेऊया. यासंदर्भात आपणास मेल करावयाचे असल्यास viva.loksatta@gmail.com या संकेतस्थळावर माहिती पाठवावी.