नवरात्रीचे वेध लागले की तरुणाईची उत्सुकता शिगेला पोहोचते. गरबा, दांडियाच्या तालावर नाचायला सगळीकडे अगदी जल्लोष असतो. २०२५ मध्ये हे गरबा नृत्य आता केवळ पारंपरिक राहिलेलं नाही, त्याला तरुणाईची कल्पकता, नृत्याच्या विविध शैली आणि डिजिटल संस्कृतीमुळे वाढलेल्या उत्सवप्रियतेची जोड मिळाली आहे. मोठी शहरे, लहान शहरे आणि अगदी कॉलेज कॅम्पसमध्ये, तरुणाई गरब्याचे फ्युजन व्हर्जन, दांडिया थीम नाइट्ससारख्या ठिकाणी गरब्याच्या ठेक्यावर थिरकताना दिसते आहे. काही वर्षांपूर्वी सार्वजनिक मैदानांवर दांडिया आणि गरबा खेळला जायचा, पण हल्ली प्रत्येक सोसायटीत, ऑफिसेसमध्ये गरब्याच्या स्पर्धा आयोजित केल्या जातात. गरबा खेळण्यासाठी अगदी महिना-दोन महिने आधीपासून त्याच्या प्रॅक्टिसचे वर्कशॉप्स, क्लासेस लावले जातात. काही जण प्रोफेशनल कोरिओग्राफरकडूनही ट्रेनिंग घेतात.

गेल्या काही वर्षांत युवा पिढीचा मोठा सहभाग असलेल्या गरबा किंवा दांडिया उत्सवात मुख्यत: फ्युजन गरबावर अधिक भर दिला जातो आहे. या फ्युजन गरब्यातही यंदाचे ट्रेंड्स काय आहेत याचा आढावा घेण्याचा हा प्रयत्न.

फ्युजन कोरिओग्राफी :

तरुणाई हिप-हॉप, बॉलीवूड, साल्सा, रॉक आणि अगदी फ्रीस्टाइलसह गरबा स्टेप्सचं मिश्रण करत खेळताना दिसते. रास गरबाचं वैशिष्ट्य म्हणजे हा प्रकार सगळ्या समाजात, संस्कृतीत लोकप्रिय आहे. सध्या याची पाईक तरुण मंडळी अधिक दिसत असली तरी सर्व वयोगटांच्या लोकांना खिळवून ठेवणारा हा प्रकार आहे. गरब्यासाठी खास वर्कशॉप्स घेणारे तरुण कोरिओग्राफर्स सांगतात, अगदी ५० वर्षांच्या पुढची मंडळीसुद्धा मनसोक्त गरबा खेळताना दिसतात. गरब्याचे बिट्स, सोप्या स्टेप्स आणि थिरकायला लावणाऱ्या ट्यून्स यामुळे लोक याकडे आकर्षित होतात. सध्याची गरबा कोरिओग्राफी म्हणजे कमीत कमी वेळात तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसं पोहोचू शकता यावर आधारित आहे. त्यासाठी सोशल मीडिया हे एकमेव साधन आहे आणि मुख्यत: गरबा हा प्रकार सोशल मीडियातूनच जास्त प्रचलित होतो आहे. यूट्यूबच्या माध्यमातून हजारो व्हिडीओ सध्या उपलब्ध आहेत, जे पाहून तुम्ही सहज गरबा डान्स शिकू शकता. ग्रुप फॉर्मेशनला यामध्ये खूप महत्त्व आहे.

टेक-लाइट नाइट्स :

कुठल्याही सादरीकरणाचे मोठे इव्हेन्ट कसे करायचे आणि त्याचा ट्रेंड कसा बनवायचा हे तरुणाईला अगदी पक्के माहीत असते. एलईडी फ्लोअर्स, प्रोजेक्शन मॅपिंग आणि सिंक्रोनाइझ लाइटिंग असे आधुनिक प्रकार गरबा आणि दांडियाच्या सादरीकरणात प्रचलित झाले आहेत. गरबा पंडालना लाइव्ह कॉन्सर्टचं स्वरूप प्राप्त झालं आहे. त्याचबरोबर सेलिब्रिटींचा सहभाग वाढल्याने तरुणाईच्या उत्साहाला चार चांद लागतात. नृत्य, गाणं, सेलिब्रिटी हे सगळंच या ठिकाणी पाहायला मिळतं. त्यामुळे गरब्याचे पासधारक इव्हेंट्स अधिक होतात, अशा गरबा इव्हेंट्समध्ये तुम्ही विशेष सादरीकरण करू शकता, ज्यात फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन्ससुद्धा होतात. फाल्गुनी पाठक आणि इतर गुजराती विशेष गायकांचे अनेक कॉन्सर्ट्सही होतात, ज्यामध्ये तरुणाई ठेका धरते.

कम्फर्टसह फॅशन :

गरब्याची फॅशन हाही तितकाच लोकप्रिय विषय आहे. पारंपरिक चनिया चोळीसारख्या ड्रेसेसमध्येही आता फ्युजन प्रकार ट्रेंडी झाले आहेत. गुजराती फॅशनमध्ये क्रॉप टॉप, वेस्टर्न साडी, जीन्स, केप दुपट्टे, डिटॅचेबल लेहेंगा लेयर्स आणि पेस्टल मिरर वर्क ट्रेंडिंग आहेत. बिल्डिंग आणि सोसायटीमधले गरबा डान्स थीमवर आधारित असतात, त्यामध्ये बऱ्याचदा पौराणिक आणि पारंपरिक संकल्पना अधिक असल्याने तिथं पारंपरिक पेहरावावर अधिक भर असतो, पण अशाच ठिकाणी रेट्रो, निऑन अशा थीमही सध्या लोकप्रिय आहेत.

सोशल मीडिया रील्स :

सध्या गरबा डान्स म्हणजे कुठल्या तरी मैदानात किंवा गरबा इव्हेंटमध्येच रंगतो असं नाही, तर ग्रुप डान्स, मिनी-सोलो आणि स्लो-मोशन स्पिन गरबा नाइट्स असे अनेक प्रकार ऑनलाइनही व्हायरल होत आहेत. शिवाय, बॉलीवूडची अनेक गाणी, विशेषत: हृतिक रोशन आणि कियारा अडवाणीवर चित्रित झालेलं ‘आवन – जावन’ हे गाणं सध्या फ्युजन गरबामध्ये ट्रेंडिंग आहे; ठुमक-ठुमक, खलासी कोक स्टुडिओ ही गाणी रील्समध्ये ट्रेंडिंग आहेत. त्याचबरोबर थोडं क्लासिक फील द्यायचा तर ढोलीदा, नगाडा संग ढोल बाजे, ढोली तारो ढोल बाजे, ही टिपिकल पारंपरिक गाणी तर तरुणांची ऑल-टाइम फेव्हरेट आहेत. अशा अनेक गाण्यांवर सध्या तरुणाई थिरकते आहे. महाराष्ट्रात आणि भारतातच नव्हे तर रास गरबा, रील्स, दांडिया हे सगळे ट्रेंड्स परदेशातातही प्रचलित झाले आहेत. तिथले भारतीय आणि परप्रांतीयही यावर दिलखेचक नृत्य करताना दिसतात. सगळ्यात महत्त्वाचं गरबा असो किंवा इतर कुठलाही नृत्य प्रकार, मराठमोळ्या लावणीचा कधीच विसर पडत नाही. कोरिओग्राफर्स लावणी आणि गरबा असा फ्युजन डान्ससुद्धा खास गरबा-दांडियासाठी बसवत आहेत.

ग्रुप फॉर्मेशन :

तरुणाईला नॉन-स्टॉप आणि बीट्सचं नृत्य आवडतं. गाण्यांचे मॅशअप (लोकगीतं रीमिक्स बॉलीवूड) ज्यात एका वेगाने गाणी बदलत असतात, अशा गाण्यांवरची कोरिओग्राफी लोकप्रिय आहे. संगीताचा वेग किंवा शैली बदलू शकते, हे लक्षात ठेवून नृत्यदिग्दर्शन केलं जातं. गरबा हा प्रकार सामूहिक पद्धतीने खेळला जातो, या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून ग्रुप फॉर्मेशन केलं जातं. हे ग्रुप फॉर्मेशन वेगवेगळ्या प्रकारात दिसतं, जेणेकरून मोठमोठे ग्रुप सहजरीत्या गरब्याच्या स्टेप्स करू शकतील. तीन-ताली स्टेप्स, गरबा स्पिन, ग्रुप ट्रिओ असे विविध प्रकार सध्या लोकप्रिय आहेत. या स्टेप्स फक्त स्टायलिश नाहीत, तर त्या कॅमेरा-फ्रेंडलीही असल्याने त्यांना अधिक पसंती मिळते.

गरबा हे केवळ नृत्य नसून तो परंपरेचा, भक्तीचा आणि आनंदाचा उत्सव आहे. बदलत्या काळानुसार तरुणाई त्यात नवीन ताल, नवीन रंग आणि आधुनिक स्पर्श आणत राहते, पण या सर्व बदलांमध्येही एक धागा कायम राहतो – तो म्हणजे एकत्र नाचण्याचा, आनंदाने उत्सव एकत्र साजरा करण्याचा. म्हणूनच, काळ कितीही बदलला आणि कितीही ट्रेंड आले-गेले तरी ‘ए हालो…’ची हाळी सगळ्या वयाच्या लोकांना तन-मन हरपून गरब्याच्या तालात रंगून जायला लावते.

viva@expressindia.com