वैष्णवी वैद्य मराठे

थंडीचा कडाका उन्हाच्या चटक्यांमध्ये कधीच विरून गेला आहे. घामाच्या धारांनी हैराण होत असताना अंगावरची फॅशन सोईचीही हवी आणि नीटनेटकीही हा विचार अधिक काळजीत टाकतो आहे. त्यामुळे या तीन महिन्यांसाठी वॉर्डरोब उन्हाळी फॅशनच्या दृष्टीने तयार असायला हवा.. 

उन्हाळा आता अगदीच जाणवू लागलाय. एखाद-दीड महिन्यापूर्वीचे ब्लँकेट, स्वेटर, मोजे सगळे माळय़ावर जाऊन आता शॉर्ट्स, हलकेफुलके गाऊन, हॉट पॅन्ट, जम्पसूट असे प्रकार कपाटात दिसू लागले असतील. मागच्या एखाद दोन वर्षांत पाहिले तर पिंट्र फॅशनचा प्रसार जोरदार आहे. सर्व प्रकारच्या कपडय़ांमध्ये पिंट्रेड फॅशनचा बोलबाला आहे. समर फॅशनचे कपडे पिंट्रेड असल्याशिवाय मजा येत नाही असे तरुणांचेही म्हणणे आहे. यात नेचर-इन्स्पायर्ड पिंट्र्स, अ‍ॅक्वा- अ‍ॅनिमल पिंट्र्स अशा थीम डिझाइन दिसून येतात. याचा आढावा घेताना असे लक्षात आले की उन्हाळय़ात तरुणाईला बीचसाईड किंवा जरा निसर्गरम्य आणि थंड हवेच्या जागांवर फिरायला आवडते आणि अशा जागांवर पिंट्रेड फॅशनचे कपडे खुलून दिसतात, त्यावर फोटो छान येतात आणि उन्हाळी कपडे शक्यतो कॅरी करायला सोपे असतात. पिंट्र फॅशन सोबतच उन्हाळी फॅशनमध्ये अजून काय काय प्रचलित आहे.. 

जम्पसूट : हा प्रकार तरुणाईच्या फॅशनमध्ये नवीन नसला तरी एरवीपेक्षा उन्हाळय़ात जास्त लोकप्रिय असतो. उन्हाळय़ात शक्यतो जास्त सावरायला न लागणारे कपडे घालणे सोपे असते आणि जम्पसूट त्यासाठी अगदी परफेक्ट फिट आहे. टॉप आणि पॅन्टच्या स्टाइलचे सरसकट एक असलेले हे कपडे अर्थातच पिंट्रेड लुकमध्ये अतिशय छान दिसतात. फिरायला जाताना, बाहेर जेवायला जाताना, रात्री, दिवसा कधीही घालता येतील असे हे कपडे असतात. यामध्ये आता वेगवेगळे प्रकार उपलब्ध आहेत. पॅन्ट स्टाइलचे नको असेल तर फ्रॉक आणि मॅक्सी प्रकारातले जम्पसूटसुद्धा चांगले दिसतात. सध्या हा प्रकार इतका लोकप्रिय झालाय की डेलीवेअरपासून ते फॉर्मल्स आणि पार्टीवेअर जम्पसूटसुद्धा फार लोकप्रिय झाले आहेत. डेलीवेअरसाठी घालायचे असेल तर यासोबत तुम्ही स्पोर्ट्स शूज किंवा स्नीकर्स घालू शकता.

ओव्हर साइझ कपडे : हा प्रकार तरुणांमध्ये सध्या अतिशय लोकप्रिय आहे. उन्हाळय़ात मोकळेढाकळे कपडे घालण्याच्या उद्देशाने केलेला हा एक आधुनिक प्रकार आहे. आपल्याला चक्क लूज होतील आणि लांबीला जवळपास घुडघ्याच्या खाली येतील असे शर्ट्स आणि मॅक्सी उन्हळय़ात घालायला तरुण मुलींना आवडतात. जेंझी भाषेत याला बॉयफ्रेंड शर्ट म्हणतात. हे अगदी घरात दिवसभर घालण्यापासून ते परदेशात फिरायलासुद्धा घालता येऊ शकतात. यात शक्यतो कॉटन किंवा अंगाला लूज बसणारे कापड निवडावे, जेणेकरून तुम्हाला आरामदायी वाटेल आणि गरम होणार नाही. रंगसुद्धा लाइट असावेत.

जिमच्या कपडय़ांची फॅशन : जिमची संस्कृती सध्या सेलिब्स आणि तरुणाईत बऱ्यापैकी रुळली आहे. त्यासाठीच्या वेगळय़ा कपडय़ांचे कलेक्शन जिमला जाणाऱ्या प्रत्येकाकडे असते. टीशर्ट, सिंगलेट, ट्रॅक पॅन्ट असे विविध कपडे जिमसाठी घातले जातात जे आता रोजची उन्हाळी फॅशन म्हणून प्रचलित आहेत. हे दिसायलासुद्धा एकदम स्टायलिश दिसतात, घराव्यतिरिक्त बाहेर जातानासुद्धा आहे त्याच कपडय़ांवर तुम्ही जाऊ शकता. उन्हाळय़ात स्वििमग करायची आवड अनेकांना असते, तिथे जातानादेखील हे कपडे घालून जाऊ शकता. यावर अर्थातच स्पोर्ट्स शूज स्टायलिश दिसतात.

मॅक्सी ड्रेस : हा अगदी नव्वदीच्या काळापासून प्रचलित असलेला प्रकार आहे ज्याला पिढय़ानपिढय़ा मरण नाही. काळानुसार यातली फॅशन बदलली, पण आवड आणि लोकप्रियता मात्र तेवढीच आहे. उन्हाळय़ासाठी पोषक अशा कापडाचा छान रंगाचा मॅक्सी ड्रेस अगदी स्टायलिश दिसतो. कुठल्याही वयाच्या स्त्रीला हा प्रकार अगदी खुलून दिसतो. उन्हाळय़ासाठी शक्यतो फिकट रंग निवडावे जे दिसायलाही फ्रेश दिसतात. अनेक प्रकार सध्या मॅक्सी ड्रेसमध्ये पाहायला मिळतील. तुम्हाला हव्या त्या फॅशनचा ड्रेस तुम्ही निवडू शकता. तसेच अगदी स्वस्त किमतीपासून ते लक्झरी ब्रॅण्डपर्यंत विविध पर्याय यात उपलब्ध असतात.

लेयिरग स्टाइल : काही लोकांना एकावर एक असे टॉप, जॅकेट किंवा श्रग असे लेयिरग करायला आवडते, जे दिसायला एलिगंट दिसते. उन्हाळय़ात हे करताना विशिष्ट प्रकारचे कपडे वापरा ज्याने गरम होणार नाही. लेयिरग करणार असाल त्या वेळी जॅकेट्स, केप जॅकेट्स, स्कार्फ वापरून लेयिरग करा. एखादा छानसा क्रॉप टॉप आणि त्यावर पलाझो पँट, स्ट्रेट पँट किंवा शॉर्ट्स टीम अप करून त्यावर केप जॅकेट घालता येईल. एखादा मस्त सिंगल स्टाइप टॉप आणि त्यावर मलचा शर्ट घाला. खूपच सिंपल आणि क्लासी लुक मिळेल. कॉटनचा जरा मोठय़ा हाताचा कुर्ता आणि त्यावर श्रग असे लायिरगसुद्धा कॅज्युअल आऊटिंग साठी छान दिसेल. 

स्ट्रेट पँट्स : जीन्स आणि लेगिंग्ज हे आपले नित्याचे कंफर्टेबल वेअर झाले आहेत. यामध्ये बदल म्हणून कधी तरी स्कर्ट किंवा पलाझो वापरले जातात. वर टी-शर्ट, टॉप, कुर्ती, कुर्ता, टयमुनिक, शर्ट यापैकी शोभेल ते घालायचं असा हा ट्रेण्ड. यात बदल होतोय बॉटम्समध्ये. घट्ट जीन्सऐवजी हलक्याफुलक्या कापडाच्या स्ट्रेट पँट्स सध्या इन आहेत. स्ट्रेट पँट्सवर वरीलपैकी काहीही टॉप म्हणून घालता येईल. शॉर्ट कुर्ता – लाँग कुर्तापासून क्रॉप टॉपपर्यंत सर्व काही यावर शोभून दिसतं आणि मुख्य म्हणजे उन्हाळय़ात स्ट्रेट पँट्सचा पर्याय सगळय़ात कंफर्टेबल असू शकतो.

बलून स्कर्ट : हा प्रकारसुद्धा पिढय़ानपिढय़ा लोकप्रिय आहे. मधल्या काळात लोप पावत चाललेला हा प्रकार या पिढीच्या तरुणांनी पुन्हा उचलून धरला आहे. मस्त लॉन्ग स्कर्ट आणि त्यावर क्रॉप किंवा साधा तुमच्या आवडीप्रमाणे टॉप घालून स्टायिलग करू शकता. उंची फार नसेल, तर स्टिलेटोज् किंवा हाय हिल्स सँडल घालून या पेहरावाची शोभा तुम्ही वाढवू शकता आणि व्यक्तिमत्त्वही अधिक खुलवू शकता. हे प्रकार कमरेपर्यंत घट्ट असतात आणि खाली त्यांना एखाद्या फुग्यासारखा घेर दिला जातो. या घेरसाठी चुण्या/प्लेट्सचा आधार घेतला जातो. या प्लेट कमी अंतराच्या किंवा जास्त अंतराच्याही असतात. या चुण्यांवरच ड्रेसचा खालचा ‘फॉल’ अवलंबून असतो. कॉटन किंवा सिल्कमध्ये असे बलून फ्रॉक किंवा स्कर्ट उठून दिसतात.

स्ट्रीट शॉपिंग : डिझायनर वेअर्सना पर्याय म्हणजे स्ट्रीट शॉपिंग. स्ट्रीट शॉपिंगमध्ये तुम्ही ओव्हरसाइज टी-शर्ट्स, लूज ड्रेसेस, पलाझो पँट्स, क्रॉप टॉप्स, स्कार्फ हमखास विकत घेऊ शकता; परंतु हे सगळे कपडे घेताना फॅब्रिक नक्की तपासून बघा. स्ट्रीट शॉपिंग करताना तुम्हाला खूप पर्याय असतात. उन्हाळय़ात आपल्याला स्वस्तातले टाकाऊ कपडे वापरणे जास्त सोयीचे ठरते त्यामुळे स्ट्रीट शॉपिंग हा अगदी उत्तम पर्याय आहे. त्याचा पुरेपूर वापर करा. एकाच दुकानातून सगळं घेण्यापेक्षा सगळीकडे फिरून मगच शॉपिंग करा.

पिनाफोर ड्रेसेस : यंदाच्या उन्हाळय़ात तुम्ही पुन्हा एकदा लहानपण एन्जॉय करू शकता. प्लीट्स असलेले फ्रॉक्स आपण लहानपणी वापरायचो. पिनाफोर तर अनेकींच्या शाळेच्या गणवेशाचा भाग होता. यंदा याच स्टाइल्सना पुनरुज्जीवन देऊन बऱ्याच कलाकारांनी नवं कलेक्शन लाँच केलं आहे. फ्रॉक स्टाइलमध्ये यंदा खूप प्रयोग केले गेले आहेत. डे ड्रेसेस, पिनाफोर ड्रेसेस, फ्लेयर्ड ड्रेसेस, स्ट्रेट ड्रेसेस डिझायनर्सनी बनवले आहेत. तुम्हीही तुमच्या आवडीपणाने अशा प्रकारचा ड्रेस शिवून घेऊ शकता. हे ड्रेस वापरायला कम्फर्टेबल आणि दिसायला क्लासी दिसतील.

सणावारांसाठी साडी आणि ट्रॅडिशनल स्टायिलग करायचे असेल तर खालच्या काही टिप्स फॅालो करू शकता.

पेस्टल कुर्ती आणि पँट्स, त्यावर मस्त रंगीत दुपट्टा.

साडी नेसणार असाल तर मराठमोळा खणाचा ब्लाउज आणि प्लेन साडी टीमअप करा.

नेहमीचीच पैठणी किंवा साउथ सिल्क साडी वापरण्यापेक्षा इरकल साडी आणि त्यावर रंगीत ब्लाऊज छान दिसेल.

क्रॉप टॉपही या साडयमंवर मस्त दिसेल. ऑफशोल्डर्स, कोल्ड शोल्डर्स, स्लीव्हलेस किंवा फुल स्लीव्हस ब्लाऊझ सध्या ट्रेण्ड इन आहेत. छोटी नथ सध्या ट्रेण्डमध्ये आहेच.

फ्लेअर्ड कुर्ती आणि बरोबरीने पलाझो पँट्स खूपच क्लासी आणि कुल लुक मिळवून देईल. सोबत मोठी कलरफुल टिकली लावून लुक पूर्ण करा.

लाँग स्ट्रेट कट कुर्ती आणि बरोबरीनेच एखादी ब्रॉड बॉटम पँट हासुद्धा खूप परफेक्ट लुक आहे. यावर छानसे हेवी इयिरग्स क्लासी लुक मिळवून देतील.

viva@expressindia.com