बिश्केक (किर्गिझस्तान) : टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत पदकापासून थोडक्यात वंचित राहिलेला दीपक पुनिया, तसेच सुजित कलकल या भारतीय कुस्तीगिरांना पॅरिस ऑलिम्पिक प्रवेशाच्या पहिल्या संधीला मुकावे लागले. आशिया ऑलिम्पिक पात्रता कुस्ती स्पर्धेला किर्गिझस्तानातील बिश्केकमध्ये शुक्रवारपासून सुरुवात झाली. यासाठी शुक्रवारी सर्व मल्लांची वजने घेण्यात आली. मात्र, वजनासाठी दोघेही भारतीय मल्ल वेळेत पोहचू न शकल्यामुळे संयोजकांनी त्यांची प्रवेशिका अपात्र ठरवली.
रशियातील सराव संपवून दुबईमार्गे बिश्केकला पोहोचण्याच्या वाटेवर असणाऱ्या या दोघांनाही वादळी पावसामुळे दुबईत अडकून राहावे लागले. दीपक (८६ किलो) आणि सुजित (६५ किलो) हे दोघेही मंगळवारपासून दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरच अडकले होते. पावसामुळे विमानसेवा पूर्ववत होण्यास उशीर झाला. त्यामुळे दोघे शुक्रवारी सकाळी ८ वाजता बिश्केक येथे स्पर्धेच्या ठिकाणी पोहोचले. मात्र, तोवर सहभागी मल्लांच्या वजनाची प्रक्रिया सुरू झाल्यामुळे संयोजकांनी त्यांना प्रवेश नाकारला. स्पर्धेत दीपकच्या जागी ५७ किलो वजनी गटातून अमन सेहरावतने भारताचे प्रतिनिधित्व केले. महिला विभागात विनेश फोगटची लढत शनिवारी होईल.
हेही वाचा >>> अॅथलेटिक्स संघटनेच्या रोख पारितोषिकाच्या भूमिकेला वाढता विरोध
उशीर होण्याची कारणे दीपक आणि सुजित यांनी संयोजकांना सांगितली. मात्र, संयोजकांनी त्यांना सूट देण्यास नकार दिला. दीपक आणि सुजित यांना या स्पर्धेत खेळता आले नसले, तरी आता त्यांच्यासह अन्य भारतीयांना पुढील महिन्यात होणाऱ्या जागतिक ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेतून अखेरची संधी मिळणार आहे.
दीपक आणि सुजित त्यांच्या वैयक्तिक प्रशिक्षकांसह मंगळवारपासून दुबईत अडकले होते. शुष्क वाळवंट असलेल्या संयुक्त अरब अमिरातीत विक्रमी पाऊस झाला. दुबई विमानतळाच्या परिसरात पूरसदृश परिस्थिती झाली होती. त्यामुळे हे दोघे मंगळवारपासून तेथेच अडकले होते. त्यांना विमानतळावर फरशीवर झोपावे लागले. हे दोघे वैयक्तिक प्रवास करत होते. त्यांनी रशियातील दागेस्तान येथे २ ते १५ एप्रिल या कालावधीत सराव केला. त्यानंतर दोघांनी १६ एप्रिल रोजी मकाचकाला येथून दुबईमार्गे बिश्केक असा विमानप्रवास सुरू केला. मात्र, दुबईतील अतिमुसळधार पावसाने सर्व विमानसेवा ठप्प झाल्या होत्या.
पहिल्या दिवशी निराशा
आशिया ऑलिम्पिक पात्रता कुस्ती स्पर्धेत पहिल्या दिवशी फ्री-स्टाईल प्रकारात भारताच्या पदरी निराशा पडली. ५७ किलो वजनी गटात भारताचा अमन उपांत्य फेरीत उझबेकिस्तानच्या अब्दुल्लाएवकडून १०-० असा पराभूत झाला. दीपकचा ९७ किलो वजनी गटात जपानच्या योशिदाकडून मानांकन फेरीतच पराभव झाला. १२५ किलो वजनी गटात सुमितनेही अशीच निराशा केली. सुमितला मंगोलियाच्या खाग्वागेरेल मुंखतरने पराभूत केले. ६५ किलो वजनी गटात किर्गिझस्तानच्या ओरोझोबेक तोक्तोमाम्बेतोवकडून जयदीपला पराभव पत्करावा लागला. ही लढत २-२ अशी बरोबरीत होती. मात्र, अखेरचा गुण मिळविणाऱ्यास विजेता घोषित करण्यात येते. या नियमानुसार ओरोझोबेक विजयी ठरला.