पावसाळी निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी नेहमीच्या ऐकिवातल्या ठिकाणांपेक्षा थोडी वेगळी जागेच्या शोधात सगळेच असतात. अशी ठिकाणं तुमच्या माहितीत असतील तर, फोटोसह आम्हाला कळवा.
टकमक किल्ला
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर असलेलं आणि पावसाळ्यात हमखास भेट देता येण्यासारखं हे ठिकाण. विरार आणि वरई फाटा यामधला टोलनाका ओलांडला की उजवीकडे गर्द वनराईने नटलेला एक प्रचंड डोंगर दिसतो, तो म्हणजे टकमक किल्ला होय. त्या टोलनाक्यानंतर पहिल्या उजव्या वळणावरून टकमक किल्ल्याकडे जाता येतं. टकमक बुरुजावर जाताना नवीन ट्रेकर्सनी खालच्या गावातून एखादा वाटाडय़ा घेणं सोयीचं; जेणेकरून वाट चुकायची शक्यता कमी होते. टकमक बुरुजाची उंची साधारण १८५० फूट आहे. बुरुजाकडे जाणारी वाट किंचित कठीण आहे. पायथ्यापासून बुरुजाच्या टोकावर जायला साधारण अडीच-तीन तास लागतात. बुरुजावर जाण्याकरता मोठे दगड, चिखल, गवताळ भाग, दाट जंगल यामधून जावं लागतं खरं, पण वर पोहोचल्यावर समोरचं अलौकिक दृश्य पाहून आलेला थकवा कुठच्या कुठे जातो.
बुरुजावरून खालची छोटी छोटी गावं, मुंबई-अहमदाबाद महामार्ग, सभोवतालचे डोंगर, दाट जंगल, वैतरणा खाडी आणि त्यावरील रेल्वेचा पूल, तसंच जर आभाळ स्वच्छ असेल तर क्षितिजावर अगदी समुद्रसुद्धा दिसतो. बुरुजावर जाताना खाण्याचे पदार्थ जवळ बाळगलेले उत्तम. बुरुजाच्या माथ्यावर पाण्याची दोन टाकी आहेत, तसंच ते शंकराचे स्थानही आह
तांदुळवाडी
तांदुळवाडी डोंगर हा आधी टेहळणी बुरुज म्हणून उपयोगात होता. मुंबईच्या अगदी जवळच्या ठिकाणांपकी हे एक ठिकाण. तसं पाहायला गेलं तर हल्ली हे ठिकाण प्रकाशझोतात आलेलं. दर शनिवार-रविवारी एक ग्रुप तरी तिकडे हटकून वळतोच. मुंबईपासून ६५ ते ७० किमीवर असलेलं हे ठिकाण. मुंबईहून डहाणू लोकलने सफाळे स्टेशनला उतरून तांदुळवाडी गावाकडे जायला रिक्षा किंवा जीपची सोय आहे. तांदुळवाडी गावाहून पुढे चालत तांदुळवाडीच्या डोंगरावर जाता येतं. कारने जाताना मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील वरई फाटय़ाहून तांदुळवाडीला जाता येतं. तिकडे काहीही खायची सोय नसल्याने खाण्याचे पदार्थ जवळ बाळगलेले उत्तम. डोंगरावरून खाली दिसणारे अलौकिक सौंदर्य डोळ्याचे पारणे फेडणारे असते. त्यामुळे वरती जाताना आलेला थकवा हा कुठच्या कुठे जातो.
प्रबळगड
प्रबळगडावर जाण्यासाठी पनवेलला जाऊन पुढे पनवेल-ठाकूरवाडी बसमाग्रे जाता येतं. तिथून पुढे चालत जायला दोन ते अडीच तास लागतात. मुंबई ते प्रबळगड अंतर साधारण ५० किमी आहे. वरती प्रबळमाचीवर जेवणाची सोय आहे आणि तिथून उत्तम सौंदर्य दिसते. कलावंतीण सुळका हे प्रबळगडावरील आणखी एक सौंदर्यस्थळ आहे. प्रबळगडावरील आणखी एक प्रसिद्ध गोष्ट म्हणजे त्या डोंगरावर वाऱ्याच्या आघाताने तयार झालेलं नसíगक नेढं. हे नेढं ९० फूट लांब आहे व त्यातून रांगत डोंगराच्या दुसऱ्या टोकाला जाता येतं. प्रबळगड हे पावसाळ्यात जाण्यासाठी एक उत्तम ठिकाण आहे.
विसापूर
लोणावळ्याजवळच्या मळवली गावातला लोहगड आता चांगला प्रसिद्ध आहे. अनेक लोक तिकडे जातात. पण त्याचा भाऊ विसापूर अजूनही तेवढी गर्दी खेचत नाही. अजून ही जागा कॉमन झालेली नाही, तोपर्यंतच या निवांत किल्ल्याचं रांगडं सौंदर्य अनुभवता येईल. लोणावळ्यापासून गाडीने विसापूर पायथ्यापर्यंत जाता येतं. लोणावळा-पुणे लोकल मार्गावर मळवली स्टेशनला उतरून तिथूनही चढाई सुरू करता येते. इथे जाताना जवळ पुरेसे खाण्याचे पदार्थ आणि पाणी असलं पाहिजे. हिरवाईनं नटलेल्या डोंगराची चढाई दमछाक करणारी, पण तितकीच आनंद देणारी आहे.
संग्रहित लेख, दिनांक 18th Jul 2014 रोजी प्रकाशित
डोंगरातला पाऊस
पावसाळी निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी नेहमीच्या ऐकिवातल्या ठिकाणांपेक्षा थोडी वेगळी जागेच्या शोधात सगळेच असतात. अशी ठिकाणं तुमच्या माहितीत असतील तर, फोटोसह आम्हाला कळवा.

First published on: 18-07-2014 at 03:34 IST
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rain in the mountains