राखी पौर्णिमा हा भाऊ-बहीण नात्याचा प्रतीकात्मक सण असला, तरी आजच्या बदलत्या जीवनशैलीत त्याचा अर्थ अधिक व्यापक होत चालला आहे. कुटुंबीयांमध्ये जवळीक निर्माण करणारा, धावपळीच्या आयुष्यात एकत्र येण्याचा बहाणा मिळवून देणारा हा सण नव्या पिढीने अधिक रंगतदार पद्धतीने साजरा करायला सुरुवात केली आहे. पारंपरिक पद्धती, मिठाई आणि घरी बसून राखी बांधण्याच्या पलीकडे जाऊन आता भावंडं एकत्र येऊन एकमेकांसोबत ‘क्वॉलिटी टाइम’ घालवण्यावर भर देत आहेत.
विशेषतः वेगवेगळ्या शहरांत राहणारी, नोकरी-शिक्षणामुळे दूर असलेली भावंडं, राखी पौर्णिमेला खास प्लॅन करून भेटण्याची संधी साधतात. घरात गोडधोडाचे जेवण करून एकत्र गप्पांची मैफल रंगवली जाते, तर काही जण थिएटरमधील मूव्ही डेट किंवा त्यानिमित्ताने बाहेर भेटण्याचे ठरवतात. काही कुटुंबं तर भावंडांना सोबत घेऊन वीकेंड रिसॉर्टला जाण्याचा ट्रेंड फॉलो करत आहेत, जिथे केवळ रक्षाबंधन साजरा करणं नव्हे तर एकत्र वेळ घालवण्याचा अनुभवच मोठं गिफ्ट ठरतं. या नव्या पद्धतीतून नात्यांना एक वेगळीच ऊब मिळत आहे. हे डेस्टिनेशन रक्षाबंधन या पिढीमध्ये अधिकाधिक रुजत चाललं आहे.

पुण्याची सोनाली बर्वे सांगते, ‘आम्ही सख्खी आणि चुलत सगळी मिळून १३ भावंडं आहोत. राखी पौर्णिमेला धमाल, दंगा असतो. आम्ही सगळे दरवर्षी वेगवेगळ्या गोष्टी प्लॅन करतो. कधी आउटिंग, कधी मूव्ही डेट, या वर्षी आम्ही कलर को-ऑर्डिनेटेड कपडे घालून रक्षाबंधन साजरे करणार आहोत. सगळे बहीण-भाऊ मिळून चिकनकारी फॅशन लुक करणार आहोत. हल्ली पुरुषांसाठीही अतिशय सुंदर चिकनकारी कुर्ते आले आहेत. भेटवस्तूंची देवाण-घेवाण तर असतेच, पण आता आम्ही मोठे झाल्यामुळे खूप कमी निमित्ताने सगळे एकत्र भेटतो. त्यामुळे निदान राखी पौर्णिमेचे २ दिवस एकत्र नाइट आउट, डिनर प्लॅन्स, बॅडमिंटन खेळणं अशा सगळ्या गोष्टी एंजॉय करतो’.

‘आम्ही तर राखी पौर्णिमा अगदी जल्लोषात साजरी करतो, पण आता सगळे मोठे झाले आहेत. काहींची लग्नं झाली, तर काहींना मुलंसुद्धा आहेत. त्यामुळे आम्ही, आमचे आई-बाबा आणि आमची मुलं अशी ३ पिढ्यांची राखी पौर्णिमा या वर्षी साजरी करणार आहोत’ असं पुण्याची साक्षी जैन सांगते. ‘आम्ही डेस्टिनेशन राखी पौर्णिमा कर्जतच्या एका छान रिसॉर्टमध्ये साजरी करणार आहोत. तिथे आम्हाला आमच्या पद्धतीने मजा करता येईल आणि घरातल्या मोठ्यांनाही निवांत वेळ घालवता येईल. असे प्लॅन्स केले की खरंच कुटुंबासोबत वेळ घालवणं किती महत्त्वाचं आणि समाधानरक असतं हे लक्षात येतं’ असं तिने सांगितलं.

मुंबईची उत्तेजा सांगते, ‘आम्ही मावस आणि चुलत मिळून सगळ्या बहिणीच आहोत. इतर मानलेले कॉलनीतले भाऊ आहेत, मग आम्ही अशी एकत्र राखी पौर्णिमा साजरी करतो. बहिणीसुद्धा अगदी अभिमानाने एकमेकींना राखी बांधतो आणि गिफ्ट्ससुद्धा देतो. आमची एक बहीण पुढील शिक्षणासाठी याच वर्षी ऑस्ट्रेलियात गेली आहे, पण तीही तिकडून आम्हाला गिफ्ट्स पाठवते आणि आम्हीसुद्धा भेटवस्तू आणि खाऊ पाठवतो. खरं तर भाऊ असो किंवा नसो, भावंडांवरचं प्रेम आणि एकत्रित असणं महत्त्वाचं असतं. आमच्या कॉलनीतील भावांनीही इतकी वर्षं नातं जपलं आहे की आमचे सगळ्यांचे लहानपणीचे फोटोसुद्धा एकत्र आहेत. त्यामुळे घरात तीही एक वेगळी मजा असते’.

‘आमच्याकडे मावस-मामे भावंडांमध्ये मी एकटाच भाऊ आहे, चुलत भाऊ आहेत पण आमच्याकडे वहिनीसुद्धा आम्हाला राख्या बांधतात’ असं सांगणारा डोंबिवलीचा अमेय देशपांडे त्याच्या राखी पौर्णिमेचा बेतही सांगतो. ‘भेटवस्तू कोणाला काय घ्यायच्या हे जवळपास महिनाभर माझ्या डोक्यात चक्र सुरू असतं. माझ्या सगळ्या बहिणी आणि वहिनी वेगवेगळ्या वयाच्या आहेत, त्यामुळे त्यांना त्यांच्या वयाच्या हिशोबाने उपयोगी गिफ्ट्स मी देतो. दरवर्षी राखी पौर्णिमा आमच्याच घरी साजरी होत असल्याने २ दिवस घरात इतका माणसांचा राबता असतो की पुन्हा लहान झाल्यासारखं वाटतं. एक दिवस आम्ही बाहेर जेवायला जातो, तर एक दिवस आम्ही सगळी भावंडं मिळून घरी स्वयंपाक करतो. पुन्हा तेच दिवस आठवतात जेव्हा आम्ही लहान असताना एकाच अंथरुणात रात्रभर जागून दंगा करायचो. राखी पौर्णिमेची एक अतिशय जिव्हाळ्याची आठवण सांगायची म्हणजे गेल्या वर्षी या दिवसांत आम्ही सगळे लेह-लडाखला फिरायला गेलो होतो, तेव्हा तिथल्या जवांनांना आमच्या बहिणींनी राख्या बांधल्या. ती आठवण आयुष्यभराची एक सुखद आठवण आहे’ असं अमेयने सांगितलं.

जेन -झी मुलांची डिजिटल युगातली राखी पौर्णिमाही बघायला आणि अनुभवायला मजा येते. इंस्टाग्राम रील्स आणि व्हॉट्सॲप व्हिडीओ कॉल्सच्या जगात राखी पौर्णिमा केवळ हातावर राखी बांधण्यापुरती मर्यादित राहिलेली नाही. हजारो किलोमीटर दूर असलेली भावंडंही आता व्हर्च्युअली तेवढ्याच उत्साहाने हा सण साजरा करतात. बहिणी ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरून खास राखी आणि गिफ्ट बॉक्स पाठवतात, तर भाऊ डिजिटल गिफ्ट्स किंवा मनातल्या भावना व्यक्त करणारे व्हिडीओ संदेश देऊन सरप्राइज देतात. सोशल मीडियावर भावंडांच्या लहानपणीच्या आठवणी, गमतीशीर किस्से आणि जिव्हाळ्याच्या पोस्ट्सने भरलेले रील्स ट्रेंडमध्ये आहेत. ही डिजिटल लाट राखी पौर्णिमेला वैश्विक कुटुंबाच्या उत्सवात रूपांतरित करते, जिथे प्रत्यक्ष राखी बांधणं नसूनही प्रेम व्यक्त करण्याची तीव्रता, जिव्हाळा खूप आहे.

आजच्या डिजिटल युगात, भावंडं दूर असूनही जवळ आहेत हे खरंच आहे आणि सुखद अनुभव आहे. जे वेगवेगळ्या शहरांत विखुरले गेलेत ते अगदी आग्रहाने राखी पौर्णिमेच्या निमित्ताने एकत्र येण्याचा प्रयत्न करताना दिसतात याचं कारण, आपला माणूस आपण जवळून पाहिला, त्याच्यासोबत जेवढा मिळेल तेवढा वेळ घालवला तर पुढच्या धकाधकीच्या जीवनासाठी आनंददायी आठवणींची संजीवनी मिळते, असं तरुणाई सांगते. यानिमित्ताने सगळे ताण विसरून निखळ आनंद साजरा करता येतो, पुन्हा लहान होणं तर शक्य नाही, पण त्या काळात गेल्यासारखं वाटतं, आठवणींना उजाळा मिळतो. परंपरा आणि आधुनिकतेची योग्य सांगड तरुणाई साजरी करत असलेल्या सणांमध्ये दिसते आहे हे सुखावणारे चित्र आहे. रक्षाबंधनाच्या सगळ्यांना खूप शुभेच्छा.

राखी गिफ्टिंग ट्रेंड्स – नात्यात नव्या आठवणी जोडणारी भेट

कस्टमाइज्ड राखी हॅम्पर्स : सध्या बहिणी भावांसाठी खास कस्टमाइज्ड गिफ्ट हॅम्पर्स तयार करत आहेत. यात त्याच्या आवडीनुसार गॉरमेट चॉकलेट्स, स्किनकेअर, फिटनेस गॅझेट्स किंवा पर्सनलाइज्ड कप्स, टी-शर्ट्स यांचा समावेश असतो.

एक्सपिरियन्स गिफ्ट्स : वस्तू देण्याऐवजी आज अनेकजण ‘एक्सपीरियन्स’ भेटवस्तू पसंत करत आहेत. जसं एकत्र एखादं वर्कशॉप अटेंड करणं, ट्रेकिंग टूर, मूव्ही डेट किंवा वीकेंड रिसॉर्ट बुकिंग.

इको-फ्रेंडली राखी गिफ्ट्स : पर्यावरणपूरक गिफ्टिंगचा ट्रेंडसुद्धा वाढतोय. बीज राखी, हँडमेड राखी आणि प्लांटिंग किट्ससह ग्रीन थीम गिफ्ट्स लोकप्रिय होत आहेत.

डिजिटल गिफ्टिंग : ज्या भावंडांना प्रत्यक्ष भेटणं शक्य होत नाही, त्यांच्यासाठी डिजिटल गिफ्ट कार्ड्स, ऑनलाइन ओटीटी सबस्क्रिप्शन्स किंवा व्हर्चुअल सरप्राइज व्हिडीओ गिफ्टिंग लोकप्रिय होत आहे.

DIY (Do It Yourself) राखी आणि गिफ्ट्स : अनेक बहिणी स्वतः हाताने तयार केलेल्या राखी, क्राफ्ट गिफ्ट्स देण्यावर भर देत आहेत. यामुळे भेटवस्तूंना वैयक्तिक स्पर्श मिळतो आणि त्यामागचं प्रेम अधिक गडद होतं. यूट्यूब, इंस्टाग्रामवर DIY राखी वर्कशॉप्सचे व्हिडीओ बघून सृजनशील गिफ्ट तयार करण्याचा ट्रेंड वाढतो आहे.