अंगणातल्या रांगोळीची जागा दारापुढच्या कोपऱ्यात किंवा गॅलरीच्या कोपऱ्यात गेली आहे. हल्ली तर बैठकीच्या खोलीच्या एका कोपऱ्यातही रांगोळी काढली जाते. नेहमीच्या पारंपरिक ठिपक्यांच्या रांगोळीला अनेक पर्याय उपलब्ध आहेत. संस्कारभारतीपासून ‘रेडी टू यूज’ पर्यायांपर्यंत अनेक तऱ्हा घराच्या कोपऱ्यात सजलेल्या दिसतात. रांगोळीनं सजलेल्या या कोपऱ्यांमध्ये मंगलमय वातावरण निर्माण करण्याची क्षमता मात्र तशीच आहे.
एरवीच्या आपल्या बिझी शेडय़ूलमध्ये नियमितपणे दारात रांगोळी काढायला जमलं नाही, तरी दिवाळीच्या दिवसात मात्र आवर्जून रांगोळी काढली जाते. आपल्यातली छुपी कला दाखवण्याची तीच तर संधी असते. हल्लीच्या जमान्यात अंगण नसलं तरी दाराशी, जिन्याच्या कडेला किंवा गॅलरीमध्ये रांगोळीला जागा केली जाते. नेहमीच्या पारंपरिक पद्धतीने रांगोळी काढणाऱ्या अनेक जणी आहेत. पण हल्ली पांढऱ्या रांगोळीच्या पुडीने ठिपक्याची रांगोळी काढण्याला अनेक पर्याय निर्माण झाले आहेत. रेडीमेड रांगोळ्यांमध्ये स्टीकर्सचा पर्याय जुना झाला. लाकडावरची रांगोळी, मोत्याची रांगोळी किंवा कापडी रांगोळीचे नवे पर्याय सध्या दिसत आहेत. अशा वेगळ्या रांगोळ्या ‘मेड टू ऑर्डर’ करून देणाऱ्या काही घरगुती कलाकारही आहेत.
फुलांची रांगोळी
फुलांची रांगोळी ही दक्षिण भारतात परंपरागत आहे. घरातल्या घरात कुठलाही कोपरा सजवण्यासाठी याचा वापर करू शकता. रंगीबेरंगी अ‍ॅस्टर, शेवंती, झेंडू आदी फुलांच्या नैसर्गिक रंगात ही रांगोळी काढली जाते. वेगवेगळ्या रंगांची फुलं मात्र त्यासाठी आणली पाहिजेत. फुलांची रांगोळी काढायला तशी अवघड नाही. मधोमध पणत्या ठेवून सजावट केली की खूपच खुलून दिसते. अगदी छोटय़ा जागेत, जिन्याच्या कडेला, कोपऱ्यात आणि अगदी विस्तीर्ण मैदानात, कुठेही अशी रांगोळी शोभून दिसते.
संस्कार भारती
गेल्या काही वर्षांत हीच रांगोळी जास्त प्रसिद्ध झाली आहे. पाच बोटांचा वापर करून किंवा मुठीनं, चाळणी, गाळणीच्या साहाय्याने काढायच्या या रांगोळीला जागा मात्र मोठी लागते. पण उठून दिसणारी आणि परिसर खुलवून टाकण्याची जादू यामध्ये आहे. ही रांगोळी काढता येण्यासाठी ही कला मुळात अवगत करायला हवी आणि नियमित सरावही हवा.
पाण्यावरची रांगोळी
पाण्यावर तरंगणारी रांगोळी काढण्याची प्रथाही काही भागात परंपरागत आहे. अशी तरंगती रांगोळी काढणं ही तशी अवघड कला. पण याला थोडा सोपा पर्याय किंवा इन्स्टंट पर्याय तुम्हाला करता येईल. एका मोठय़ा आकाराच्या सुबक भांडय़ांमध्ये किंवा तसराळ्यात किंवा घंगाळ्यात (तांब्या किंवा पितळ्याचे असेल तर उत्तम) पाणी घ्यायचं. आकारानं मोठी पण वजनानं हलकी अशी फुलं निवडायची. फुलं किंवा पाकळ्या पाण्यावर तरंगल्या पाहिजे. मोठय़ा आकाराचं भांडं असेल तर जरबेरासारख्या मोठय़ा फुलांचा वापर करता येईल. फुलांच्या रंगाप्रमाणे सजवून तरंगणारी नक्षी पाण्यावर तयार करू शकतो. हल्ली बाजारात मिळणाऱ्या फ्लोटिंग कॅण्डल्स या पाण्यावर सोडल्या की काम झालं. ही सजावट खूपच सुंदर दिसते आणि घर उजळून टाकते.
कापडाची रांगोळी
कायम राहणारी आणि कधीही वापरता येणारी अशी ही रेडी रांगोळी. कापडाचे डिझाइन करून त्यावर मोती, आरसे लावून किंवा भरतकाम करून ही रांगोळी तयार करता येते. हल्ली काही ठिकाणी, प्रदर्शनांमधून अशा रेडीमेड शिवलेल्या रांगोळ्या दिसायला लागल्या आहेत. थोडा वेगळा प्रयोग करायचा असेल तर शंख, कवडय़ा आणि शिंपल्यांचा वापर करून पॅचवर्क स्टाइलची कापडी रांगोळी तयार करता येईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rangoli designs for this diwali
First published on: 24-10-2014 at 01:05 IST