लहानपणापासून विज्ञान विषयाची आवड असलेला, तितकाच मनापासून वाचनात रमणारा अक्षय भविष्यात शास्त्रज्ञ होईल हे भाकीत त्याच्या मित्रमंडळींनीही केलं होतं. मात्र, विज्ञान विषयातील ही आवड अक्षयने इंजिनीअर किंवा इतर पारंपरिक क्षेत्रातून जोपासली नाही. तर त्याने वनस्पती वर्गीकरण या नव्याच क्षेत्राशी ओळख करून घेतली. विज्ञानप्रेमी आणि निसर्गाची जाण असलेल्या वनस्पती वर्गीकरण शास्त्रज्ञ अक्षय जंगम याचा या वेगळ्या क्षेत्रातला प्रवास जाणून घेण्यासारखा आहे.
मूळचा कोल्हापूर जिल्ह्यातील केर्ले गाव येथील अक्षय जंगम याला लहानपणापासून विज्ञान विषयाची आवड होती. शाळेत असताना त्याला वाचनाचेही प्रचंड वेड होते, अक्षय सहावीत असताना डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे ‘अग्निपंख’ हे पुस्तक त्याच्या वाचनात आले. ‘हे पुस्तक वाचत असताना त्यातले बरेच सायंटिफिक आणि टेक्निकल शब्द मला कळले नव्हते, पण त्या पुस्तकाने एक वेगळीच प्रेरणा दिली’ असं अक्षय सांगतो. अक्षयचा महाविद्यालयीन प्रवास कोल्हापूरच्या न्यू कॉलेजपासून सुरू झाला.
तिथे त्याने लाइफ सायन्सला प्रवेश घेतला. त्या वेळी अक्षय झूओलॉजी या विषयात जास्त रमायचा. या विषयाच्या अभ्यासातून प्राणी, पक्षी यांचा अधिवास, त्यांचे महत्त्व या सगळ्याबद्दल त्याला आकर्षण वाटू लागलं. आणि झूओलॉजी हा विषय अधिकच आवडू लागला, असं त्याने सांगितलं. मात्र, दुसऱ्या वर्षात शिकत असताना शिक्षणाच्या बाबतीत त्याला नवी दिशा मिळाली. त्या वेळी महाविद्यालयात वनस्पतीशास्त्र विभागामार्फत प्राध्यापक डॉ. एस. आर. यादव यांचे लेक्चर आयोजित करण्यात आले होते. या लेक्चरमध्ये पश्चिम घाटातील वेगवेगळ्या वनस्पती, त्यांची छायाचित्रं, माहिती पाहून अक्षय अचंबित झाला. प्राध्यापक यादव यांच्या संपूर्ण भाषणाने अक्षयला एक वेगळी ऊर्जा मिळाली आणि त्यादिवशी सह्याद्रीसाठी, तिथल्या निसर्गासाठी काही तरी करावं अशी खूणगाठ त्याने मनाशी बांधली.
सह्याद्रीतील निसर्गाचा अभ्यास करण्याची त्याची इच्छा इतकी प्रबळ होती की अक्षयने शेवटच्या वर्षाला बॉटनी या विषयाची निवड केली. त्याच वेळी त्याने आजूबाजूच्या जैवविविधतेविषयीही जाणून घेण्यास सुरुवात केली, त्याचा अभ्यास सुरू केला. त्यानंतर अक्षयने शिवाजी विद्यापीठात एमएस्सीसाठी प्रवेश घेतला. या प्रवेश परीक्षेत अक्षयने चौथा क्रमांक पटकावला. अक्षयचा खरा प्रवास इथून सुरू झाला. ‘मी ज्या प्राध्यापक यादव यांना आदर्श मानत होतो, त्यांचा सहवास मला दररोज लाभला. याच वेळी रोहित माने, जगदीश दळवी या प्राध्यापकांचेही मार्गदर्शन मला मिळाले.
या प्राध्यापकांबरोबर कधी आंबा, कधी आंबोली, कधी राधानगरी तर कधी बदामी अशा विविध वनक्षेत्रात जाण्याची संधी मिळाली’ असं तो सांगतो. ‘यादव सरांबरोबर बऱ्याच ठिकाणी जाता आलं, बरीच माहिती होत गेली, त्यांची झाडांविषयीची तळमळ कळू लागली. त्यांच्याबरोबर दौरा म्हणजे एक पर्वणी असायची. केरळ, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक-बदामी असे बरेच दौरे त्यांच्याबरोबर मी केले आहेत. त्यांनी पाया रोवलेल्या लीड बोटॅनिकल गार्डनमध्ये कामं करायची, बिया गोळा करायला जायचे, रोज गार्डनमध्ये फेरी मारून येणं, निरीक्षण करणं अशा चांगल्या सवयी या अभ्यास काळात लागल्या ज्याचा फायदा पुढच्या अभ्यासात झाला’ असं अक्षयने सांगितलं.
एमएस्सी झाल्यानंतर अक्षयचं पुढचे ध्येय होतं ते अर्थातच पीएचडी करायचं… या निमित्ताने त्याची ओळख डॉ. नीलेश पवार या प्राध्यापकांशी झाली. ‘तू किल्ल्यांवरील वनस्पतीवर काम करशील का?’ असे प्राध्यापक पवार यांनी विचारल्यावर क्षणाचाही विलंब न करता अक्षयने होकार दिला आणि त्याचा पीएचडी अभ्यासाचा प्रवास सुरू झाला. यानंतर अक्षयने कोल्हापूर जिल्ह्यातील किल्ल्यावरील वनस्पतीचा अभ्यास सुरू केला. ‘कोल्हापूर जिल्ह्यात १३ किल्ले आहेत आणि ते सर्व किल्ले आमच्या अभ्यासात होते. वर्षातले तीनही ऋतू उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळ्यात आमचा किल्ल्यांवरच मुक्काम असायचा. या वेळी मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी जवळपास ९०० वनस्पतींची नोंद केली. त्यामधील जवळपास २०० प्रजाती या प्रदेशनिष्ठ आहेत, म्हणजे त्या जगात दुसरीकडे कुठेच मिळत नाहीत’ अशी माहिती अक्षयने दिली.
या कालावधीत अक्षयने आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये ९ पेपर पब्लिश केले. अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्समध्ये सहभाग नोंदवला व आपले काम सादर केले. संशोधनाच्या काळात बऱ्याच ठिकाणी अभ्यास दौरे केले, त्यात महाराष्ट्र, कर्नाटक, तमिळनाडू, केरळ, उत्तराखंड, पश्चिम बंगाल, सिक्कीम आणि अंदमान-निकोबार येथे जाऊन केलेल्या तिथल्या जैवविविधतेच्या अभ्यासाचा समावेश आहे. ‘बॉटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडिया’च्या सेंटरना भेटी देऊन तेथील हर्बेरियमचा अभ्यास करण्याची संधीसुद्धा अक्षयला या कालावधीत मिळाली. या कामामध्ये सर्वात ठळक गोष्ट होती ‘सिरोपेजीया शिवरायाना’ ही त्यांनी शोधलेली नवीन प्रजाती.
‘कंदीलपुष्प कुळातील ही वनस्पती आम्हाला अभ्यास करत असताना विशाळगडावर आढळून आली. कंदीलपुष्प ही जात तशी दुर्मीळ झालेली आहे आणि त्यामध्ये ही नवीन प्रजाती मिळाली. जेव्हा त्या वनस्पतीला नाव द्यायची वेळ आली त्या वेळी क्षणाचाही विलंब न करता याचं नाव छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावावरूनच असावं असा विचार माझ्या मनात आला. माझे सहकारी रतन मोरे, डॉ. नीलेश पवार, डॉ. शरद कांबळे आणि डॉ. एस. आर. यादव या प्राध्यापकांशी चर्चा करून महाराजांचं नाव द्यायचं निश्चित करण्यात आलं. याआधी शिवाजी महाराजांच्या नावाने कुठल्याही सजीवाला नाव दिलं गेलं नव्हतं आणि ती संधी आम्हाला मिळाली. हीच आमच्या कामाची पोचपावती आहे’ अशी भावना अक्षयने व्यक्त केली.
सध्या अक्षय न्यू कॉलेज, कोल्हापूर येथे सहायक प्राध्यापक म्हणून काम करतो आहे. त्याने पीएचडीचा शोधनिबंधही सादर केला आहे. भविष्यात महाराष्ट्रातील विविध किल्ल्यांवर असलेल्या जैवविविधतेचा अभ्यास करून त्यांचं जतन आणि संवर्धन यासाठी प्रयत्न करायचे आहेत, असा मानस अक्षयने व्यक्त केला. एखाद्या विषयाने झपाटून टाकलं की त्याचा शोध आणि अभ्यासातून आपल्याला पुढची वाट सापडल्याशिवाय राहात नाही, याचं उत्तम उदाहरण म्हणजे अक्षयची आजवरची वाटचाल आहे.
viva@expressindia.com