‘त्याचं कॉलेजमध्ये प्रेझेंटेशन होतं दुपारी १२ वाजता नि इनऑर्बटि मॉलमध्ये शो होता संध्याकाळी ६ वाजता. पण प्रेझेंटेशन ३ वाजता घेण्यात आलं. मग प्रॅक्टिस कॅन्सल करून थेट शोच करावा लागला. तेव्हा ‘त्याला‘ थोडं टेन्शन आलं की, कसं काय होणार सगळं.. कॉलेज शिवाजीनगरला, त्यांची प्रॅक्टिस रूम आहे विश्रांतवाडीला नि शो विमाननगरला होता. पण ‘त्यानं’ ते मॅनेज केलं. आतापर्यंतच्या त्यांच्या शोजमधला तो बेस्ट शो होता.. हा बॅण्ड होता ‘वाद्यस्य’.. बॅण्डप्लेअर आहे सिद्धेश सहस्रबुद्धे!
तो पुण्याच्या शिवाजीनगरच्या एसएसपीएमएस इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये फायनल इयर, बी.ई. इलेक्ट्रॉनिक्सला आहे. त्याचे वडील मेकॅनिकल इंजिनीअर नि आई बँकेत ब्रँच ऑफिसर आहे. इंजिनीअिरगला वर्षभर अभ्यास केला जातोच. पण परीक्षेच्या शेवटच्या महिन्याभरात मिळणाऱ्या पीएल अर्थात प्रॅक्टिस लीव्हचा वापर अधिकांशी केला जातो. तेव्हा सिद्धेश म्युझिक अ‍ॅक्टिव्हिटीज बंद ठेवतो. खरं तर इंजिनीअिरगमुळं त्याला म्युझिक सुरू ठेवता आलंय. कारण शनिवार-रविवार कॉलेजला सुट्टी असते नि लाईव्ह कॉन्सर्टही तेव्हा असल्यानं ते त्याला सोईचं पडतं. सध्या त्याची पीएल चालू असल्यानं तो शोज करत नाहीये. हे तो स्ट्रिक्टली फॉलो करतो. त्याला नोटस वगरेंसाठी क्लासमेटसची खूप मदत होते. कॉलेजस्टाफलाही त्याच्या म्युझिकल अ‍ॅक्टिव्हिटी माहीत असल्यानं प्रॅक्टिकल्ससाठी ते मदत करतात. तो प्रोजेक्ट ग्रुपसोबत शनिवार-रविवार ‘पर्ल ऑटोमेशन’ या कंपनीत जातो. हे वार म्युझिकसाठी दिलेले असूनही प्रोजेक्टचं महत्त्व लक्षात घेऊन म्युझिकचा ग्रुप त्याला सांभाळून घेतो. ‘प्रोजेक्टसाठीचा आवश्यक वेळ देऊन तू जँिमगला अर्थात प्रॅक्टिसला ये’, असं ते त्याला आवर्जून सांगतात.
नववीत असताना आईनं त्याला की-बोर्डच्या क्लासला घातलं. तो सांगतो की, ‘आईला म्युझिकची आवड असली तरी बाकी आमच्या घरातल्या कुणाचा वाद्य-संगीताशी फारसा कधी संबंध आलेला नव्हता. त्यामुळं तिथं शिकायचं म्हटल्यावर माझी प्रतिक्रिया होती, ‘म्युझिक नि माझा काय संबंध, त्याचा काय उपयोग वगरे.’ पण पुढं सुरांबद्दल आतून एवढा आपलेपणा वाटू लागला की, म्युझिक प्रचंड आवडायलाच लागलं. मी ‘सरगम’मध्ये की-बोर्डच्या दोन वर्षे परीक्षा दिल्यात. की-बोर्ड शिकतानाच माझी ‘व्हायब्रेशन क्लास’चे गिटारशिक्षक मोहन कुलकर्णी याच्याशी ओळख झाली. ते म्हणाले की, ‘की-बोर्ड बेसिक इन्स्ट्रमेंट आहे. त्यात वेगळं काही नाही. ते यावंच लागतं. गिटारिस्ट खूप कमी आहे. तू गिटार शिक.’ सरांचं बोलणं मनावर घेऊन मी माझा घरीच गिटार शिकलो. पहिलं गिटार माझ्या पशांतून विकत घेतलं. ते शिकण्यासाठी खूप मेहनत घेतली. एकेक गाणं सहा-सात तास बसून वाजवत राहायचो. मला म्युझिकचं बेसिक नॉलेज आहे. वाद्यानुसार ते वाजवण्याची पद्धत बदलते. त्यामुळं ते शिकण्यासाठी आपणच प्रयत्न करायला हवेत, असं वाटलं. एरवी गिटार शिकायला पाच-सहा र्वष लागतात, ते मी २ वर्षांत शिकलो.’
पुण्यातल्या फिरोदिया करंडक आंतर महाविद्यालयीन स्पर्धा प्रसिद्ध आहेत. ‘फिरोदिया’तील एकांकिकेला त्यांच्या ग्रुपनं संगीत दिलं होतं. त्यात त्यानं की-बोर्ड वाजवला होता. तिथं त्यांच्या ‘वाद्यस्य’ बॅण्डचा जन्म झाला. ‘फिरोदिया’मध्ये आलेल्या ड्रमर आणि गिटारिस्टशी ओळख होऊन ‘जॅिमग करायचं’, म्हणजे प्रॅक्टिस करायचं ठरलं. त्यांच्याच ओळखीनं तो ‘ब्रह्म-पुत्र’ बॅण्डला जॉइन झाला. सध्या तो ‘वाद्यस्य’मध्ये गिटार, ‘ब्रम्ह-पुत्र’मध्ये की-बोर्ड नि ‘एसआर-७१’मध्ये बेसगिटार वाजवतोय. बेसगिटारही स्वतच शिकलाय. तो म्हणतो की, ‘लाईव्ह परफॉरमन्सच्या वेळी नेमकं काय वाटतं हे शब्दांत सांगणं कठीण आहे. इतर वेळी आपण आपल्या ग्रुपमध्ये असतो तेव्हा आपल्याकडं कुणाचं लक्ष नसतं. पण स्टेजवर आम्ही आलो की, जणू एक ट्रान्सफॉरमेशन होतं. त्या दोन तासांसाठी मी एक आर्टस्टि होतो. ऑडियन्सचं मनोरंजन करण्यासाठी आपण वाजवतोय, हे लक्षात ठेवून वाजवावं लागतं. ऑडियन्सशी मित्रत्वाचं नातं साकारावं लागतं.’
लाइव्ह कॉन्सर्टमध्ये ऑडियन्सला बॅण्डचा परफॉरमन्स किती आवडलाय, ते त्यांच्या चिअिरगवरून कळतं. परफॉर्म करताना एखाद्या वेळी गायक गात नसेल, तेव्हा ऑडियन्स गातो, त्यावेळी बॅण्डला पूर्ण रिसन्पॉन्स मिळाल्याचं कळतं. शोमध्ये काही अप-डाऊन्सही असतात. शो आवडत नाहीये, असं कळल्यावर लगेच ऑडियन्सनुसार गाण्यांत बदल केला जातो. सिद्धेश सांगतो की, ‘कॉन्सर्टमधलं म्युझिक बहुतांशी बॉलिवूडचं असतं. पण मी हॉलिवूडकडून अधिक शिकतो. माझ्यावर ‘मेटालिका’ या बॅण्डचा सर्वाधिक प्रभाव आहे. त्यातला ‘जेम्स हेटफिल्ड’ ऱ्हिदम गिटारिस्ट माझं दैवत आहे. ‘गन्स अ‍ॅण्ड रोझेस’, ‘मेगाडेथ’, ‘एसी/डीसी’ इत्यादी बॅण्डही माझ्या गिटारवादनात प्रेरणादायी ठरल्येत. ‘अग्नी’ नि ‘इंडियन ओशन’ या भारतीय बॅण्डना मी फॉलो करतो. ए. आर. रहमान, अमित त्रिवेदी, राम संपथ हे माझे आवडते बॉलिवूड आर्टस्टि आहेत. पण माझी हॉलिवूड म्युझिकची आवड थोडी बाजूला ठेवून लोकांना आवडेल, ते मी वाजवतो. आमच्या ग्रुपची ‘रॉक ऑन’, ‘सोचा है’ वगरे गाणी लोकांना आवडल्यानं ती आम्ही परफॉर्म करतोच. ‘वाद्यस्य’तील रहमानची ‘हम्मा’, ‘रोजा’ही आम्ही रॉक पद्धतीनं वाजवलेली गाणी ऑडियन्सला खूपच आवडतात, तर ‘ब्रह्म-पुत्रा’, ‘सड्डा हक’, ‘अलविदा‘ इत्यादी नवीन गाणी परफॉर्म करतो.’
दोन्ही बॅण्डमधले बहुतेक जण जॉबला जाणारे असल्यानं त्यांची प्रॅक्टिस संध्याकाळी ७ ते १० या वेळेत चालते. बऱ्याचदा एक जण गाणं ऐकतो. ते व्हॉटस् अ‍ॅपवर टाकलं जातं. ते ऐकून त्यावर सगळ्यांचं मत घेतलं जातं. सर्वानुमते ठरल्यावर लगेच दुसऱ्या दिवसापासून ग्रुप ते करायला घेतो. त्याची प्रॅक्टिस केली जाते. तो दोन्ही बॅण्डमध्ये असल्यानं त्याला सगळं वाजवायला मिळतं. माझ्या सगळ्या अ‍ॅक्टिव्हिटींना घरच्यांचा खूपच सकारात्मक पािठबा असतो. जे करशील ते टॉपचं कर, एवढंच त्यांचं मत असतं. कामाच्या व्यवधानांमुळं आई-बाबा अद्याप माझ्या कॉन्सर्टना आले नसले, तरी ते यू टय़ूब-फेसबुकवर आमची कॉन्सर्ट बघतात. कॉलेज नि म्युझिकच्या प्रॅक्टिसमुळं घरी मी खूपच कमी वेळ देतो. काही वेळा आमची प्रॅक्टिस माझ्या घरीही होते.‘  
आठवणीतल्या शोजविषयी तो सांगतो की, ‘ब्रम्ह-पुत्र बॅण्डचा ‘फिनिक्स मॉल’मधील ‘जिओ लाऊंज’मध्ये परफॉरमन्स अरेंज करण्यात होता. आतापर्यंतच्या आमच्या परफॉर्मन्समधला बेस्ट शो होता. ‘सिंदबाद द सेलर..’ हे ‘रॉकऑन’मधलं चार मिनिटांचं गाणं आम्ही १८ मिनिटं व्हेरिएशन्सनं असं काही वाजवलं की, सगळा ऑडियन्स त्यात एकदम रंगून गेला होता.. दुसऱ्या एका शोमध्ये आमच्या वाद्यांचं चित्रं असलेले टी शर्ट गिफ्ट देत मनपूर्वक दाद दिली. ऑडियन्सनी दिलेली दाद नि केलेलं कौतुक आम्हाला कायमच प्रेरणा देतं..कारण ऑडियन्स अ‍ॅण्ड बॅण्डस् ऑलवेज रॉक…

‘लर्न अँड अर्न’चे प्रयोग आम्हाला कळवा
शिकता शिकता आपला छंद जोपासणारे आणि त्यातून पैसे कमावणारे काही विद्यार्थी आपल्या आसपास असतील, आपल्या परिचयाचे असतील तर आम्हाला नक्की कळवा. त्यांच्याबद्दलची थोडक्यात माहिती  viva.loksatta@gmail.com  या पत्त्यावर पाठवा. सब्जेक्ट लाईनमध्ये लर्न अॅण्ड अर्न  असा उल्लेख नक्की करा.