शाल्मली खोलगडेच्या पहिल्या गाण्यापासून तिचे फॅन असलेल्या व्यक्ती प्रेक्षकांत होत्या तशा तिला प्रथमच प्रत्यक्ष ऐकणारेही होते. शाल्मलीच्या आवाजाबरोबरच तिचा प्रांजळपणा सगळ्यांना भावला. तिची रोखठोक मतं आणि ते मांडायची बेधडक वृत्ती ती जेन नेक्स्ट सिंगर आहे हे ठासून सांगणारी होती.

पायल उन्हेलकर
कार्यक्रम खूपच सुरेख होता. मी स्वत: संगीत शिकतेय. गाण्याच्या नोट्सविषयी थेट शाल्मलीकडून माहिती ऐकायला ग्रेट वाटलं आणि तिने सांगितलेल्या गाण्यातील बारकाव्यांमुळे माझी संगीतातली आवड अजून वाढली.  

आरती कर्नम
शाल्मलीच्या गाण्याची मी चाहती होतेच. ती दिसायलाही तितकीच सुंदर आहे, स्मार्ट आहे आणि इतकं सगळं असूनही ती खूपच विनम्र आहे. तिच्या बोलण्यातून गर्व जाणवला नाही, ते छान वाटलं. या कार्यक्रमानंतर मी गाण्याकडे अजून चांगल्या दृष्टिकोनातून पाहू शकेन.

अमृता नागवेकर
एक गायिका म्हणून शाल्मलीला ऐकता आलं. पण एक व्यक्ती म्हणूनदेखील तिचं बोलणं आणि गाणं भावलं. ती खूप ‘डाऊन टू अर्थ’ आहे. आज बॉलीवूडमध्ये मोठी गायिका म्हणून ओळख असली तरी त्या गोष्टीचा थोडाही गर्व तिच्या बोलण्यातून जाणवला नाही, आणि हीच गोष्ट मला खूप आवडली.

अनुजा सावंत
शाल्मलीच्या पहिल्या गाण्यापासूनच मी तिच्या गाण्याची चाहती आहे. ती आमच्या जनरेशनची असल्यामुळे तिचं बोलणं आणि गाणंही खूप पटकन भावतं. मीसुद्धा संगीत शिकतेय. त्यामुळे शाल्मलीनं सांगितलेल्या टिप्सचा मला नक्कीच माझ्या अभ्यासात उपयोग होईल.      

सुरभी डागा
कार्यक्रम खूप मस्त होता. संगीताविषयी अजून काही गोष्टी शिकायला मिळाल्या. तिचा आयुष्याकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन लक्षात ठेवण्यासारखा आहे. त्याचबरोबर गाण्याविषयी तिची असलेली आत्मीयता प्रेरणादायी आहे.

स्मिता चव्हाण
कार्यक्रम छान होता. माझ्या मत्रिणीने हट्ट केला म्हणून मी या कार्यक्रमाला आले होते. पण शाल्मलीची आयुष्याकडे पाहण्याची रोखठोक वृत्ती माझ्यासाठी प्रेरणादायी ठरली आहे.

मिनाली जाधव
शाल्मली खोलगडेची मुलाखत खूपच छान होती. मला आधी तिच्याविषयी फारशी माहिती नव्हती. परंतु लोकसत्ता व्हिवाच्या माध्यमामुळे मी आज कार्यक्रमाला आले. शाल्मलीची मुलाखत ऐकताना वेळ कसा गेला ते समजलंच नाही. तिने गाऊन दाखवलेल्या गाण्यांमुळे मुलाखत हा ‘एन्जॉयेबल एक्सपीरिअन्स’ होता.

देवश्री गोलांबरे
मला गाण्याची खूप आवड आहे. भारतीय शास्त्रीय आणि वेस्टर्न हे दोन्ही संगीत प्रकार मी शिकतेय. त्यामुळे आजची मुलाखत मला खूप काही शिकवून गेली. शाल्मलीने स्वत: गाऊन दाखवलेल्या तुकडय़ांमुळे लहान लहान जागा आपण कशा घेतल्या पाहिजेत हे कळलं. आता वेस्टर्न संगीत अजून जोमाने शिकण्याची इच्छा निर्माण झाली आहे.

संकलन : मृणाल भगत, अनुश्री फडणीस,
नेहा टिपणीस
छायचित्र : सर्वेश अभ्यंकर