|| प्रियांका वाघुले

हिंदी मालिका-चित्रपटांमधून रुळल्यानंतर आता मराठी चित्रपटांमध्येही वेगवेगळ्या भूमिका साकारत आपली छाप पाडणारा अभिनेता म्हणून शरद केळकर आज घराघरांत ओळखला जातो. एक कलाकार म्हणून तो सध्या लोकप्रिय असला तरी फिटनेसशी त्याचे आणखी जुने आणि घट्ट नाते आहे. तो स्वत: फिट आहेच मात्र एकेकाळी शरद जिम ट्रेनर म्हणून कार्यरत होता. त्यामुळे फिटनेसबाबतीत त्याचे बोल अधिक महत्त्वाचे ठरतात.

शरदला मुळातच लहानपणापासून मैदानी खेळांची आवड होती. त्यामुळेच त्याचे शरीर कसलेले आणि बळकट असल्याचे तो सांगतो. परंतु फिट राहणे म्हणजे तब्येतीने राहणे किंवा अगदी सडपातळ असणे असा नाही. तर आपल्या शरीराशी आपल्याला संवाद साधता आला पाहिजे, असे शरद म्हणतो.

शरीराशी संवाद साधणे ही माणसाची खरी गरज बनली आहे, असे तो आवर्जून सांगतो. आजच्या जीवनशैलीनुसार अनियमित वेळा, त्यामुळे समोर येईल ते वेळी अवेळी खाणे, काहीही कसेही खाणे यामुळे माणसे स्थूल तर होतातच, पण त्याहीपेक्षा या अनियमितपणामुळे शरीरातील खनिजे, जीवनसत्त्वे या घटकांमध्येही असमतोल निर्माण होतो, जे आपल्या लक्षात येत नाही, याकडे तो लक्ष वेधतो.

म्हणूनच माणसाचा आपल्या शरीराशी संवाद होणे आवश्यक आहे. आपण काय खातोय? किती खातोय? कधी खातोय? हे आपल्या लक्षात असणे महत्त्वाचे. तो नित्यनेमाने आपल्या शरीराशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगतो. आपण जो खातो आहोत ते केवळ जिभेचे लाड म्हणून खातो आहोत की आपल्या शरीराला त्या खाण्याची गरज आहे, अशा अगदी मूलभूत गोष्टींपासून शरिराशी हा संवाद सुरू झाला पाहिजे. गरज आणि इच्छा यातला फरक समजून घेत आपले खाणेपिणे, शरीराचा व्यायाम साधला पाहिजे, असे शरद म्हणतो.

माणसाचे पोट ठीक असेल तर मन खूश राहते. आणि मन शांत असेल तर माणूस फिट राहतो. त्यामुळे नियमित व्यायाम करताना फक्त व्यायाम नाही तर आपली एकंदरीत आहार पद्धती आणि आपला आपल्याशी संवाद होणे महत्त्वाचे आहे. या संवादातूनच आपल्या शरीराला काय खाणे आवश्यक आहे हे जसे समजते, तसेच आपल्या शरीरासाठी नेमका कोणता व्यायाम प्रकार योग्य आहे, कुठल्या पद्धतीने आपले शरीर आणि मन दोन्ही शांत राहतील, हे आपले आपल्यालाच या संवादातून कळत जाते, असे तो सांगतो.

viva@expressindia.com