प्रियांका वाघुले
फिटनेस ही एक प्रकारची साधनाच असल्याचे मराठी ‘बिग बॉस सीझन २’चा विजेता शिव ठाकरे म्हणतो. कोणत्याही गोष्टीची इच्छा असेल तर त्यासाठी पुरेपूर मेहनत घ्यायलाच लागते. ती मेहनत घेतली नाही तर तुमची इच्छा सत्यात उतरू शकत नाही. कडी मेहनत ही हर चीज का इलाज हैं, असे मानणारा शिव त्यासाठी वाट्टेल ते करायला तयार असल्याचे सांगतो. मात्र फिटनेसच्या बाबतीतला त्याचा फंडा वेगळा आहे.
बिग बॉसच्या घरात सर्वाना मात देत अव्वल ठरलेल्या शिवचा फिटनेस कसा असेल, याबाबत सगळ्यांनाच उत्सुकता आहे. तो मात्र या फिटनेसचे रहस्य उलगडाला तयार नाही. शिवच्या मते फिटनेस रुटीन हे प्रत्येकाच्या शारीरिक रचना आणि गरजेनुसार बदलते. मात्र त्यात फार वैविध्य नाही. कोणता व्यायाम केला जातो यापेक्षाही तो कसा केला जातो आणि नियमितपणे के ला जातो आहे ना, हे महत्त्वाचे असते. त्यामुळे व्यायामासाठी एक नियमित वेळ ठरवणे अतिशय उत्तम, असे तो म्हणतो. पण त्या दिवसातली ती वेळ पाळणे शक्य नसल्यास व्यायाम करणे टाळले जाते. अशा वेळेस कसलाही संकोच न करता आपण गणपती डान्स करत असल्याचे शिव म्हणतो. गणपती डान्स हा प्रकार सगळ्यांना माहिती असून आपल्याला येईल तसे आणि त्या पद्धतीने बिनधास्त नाच करत त्याचा आनंद घ्यायचा, असे शिव म्हणतो.
फिटनेससाठी नृत्याचा फार चांगला उपयोग करून घेता येतो, असे तो सांगतो. त्याला स्वत:ला नाचण्याचे भयंकर वेड आहे. त्यामुळे जेव्हा केव्हा फिटनेस रुटीन सांभाळणे अवघड जाते, त्या वेळी अशा प्रकारे मुक्त नृत्य करण्यानेही तुम्हाला फिटनेस साधता येतो. अर्थात, तसे करतानाही आपण कशा पद्धतीने आणि काय प्रकारे नाचणार आहोत, याचा विचार करावाच लागतो, हेही तो स्पष्ट करतो. गणपतीत विसर्जनात आपण जसे मोकळ्या मनाने नाचतो तसेच आनंद घेत नाचता आले पाहिजे. घरी किंवा जिथे आपल्याला शक्य आहे तिथे मनसोक्त नाचणे हा शरीरासाठी अतिशय उपयुक्त प्रकार शिव करत असल्याचे सांगतो. याचसोबत नियमित व्यायाम करणे हा कानमंत्र इतरांप्रमाणे फॉलो करत असल्याचेही त्याने सांगितले. फिट राहण्यासाठी नेहमीच अवघड अशा गोष्टींचा विचार करावा लागतो, असे नाही. तर आवडीच्या गोष्टींमधूनही चांगला पर्याय आपण निवडू शकतो, असे अस्सल अमरावतीकर असलेला शिव सांगतो.
viva@expressindia.com