साधारणपणे सणवार आले की नवीन कपडे, दागिने अशी खरेदी सुरू होते. त्यांचे भाव तर वाढतातच आणि ट्रेण्डचा ग्राफही वरवर जाताना दिसतो. पारंपरिकपणे दागिने म्हणजे सोन्याचे अशीच समजूत सर्वमान्य आहे आणि त्याच्याच खरेदीवर जास्तीत जास्त भर दिला जात असे. मात्र आता बदलत्या ट्रेण्डनुसार तरुणाईचा अधिक ओढा हा सिल्व्हर ज्वेलरी म्हणजेच चांदीच्या दागिन्यांकडे पाहायला मिळतो. मार्केटमध्ये चांदीच्या दागिन्यांचे नवनवीन ब्रँड्स लोकप्रिय होण्याचं ते सर्वात मोठं कारण आहे.

बहुतेक साऱ्या मोठमोठ्या ज्वेलर्सच्या ब्रँड्सनी चांदीच्या दागिन्यांमध्ये आपली कलेक्शन्स आणली आहेत. मिया बाय तनिष्क, कॅरटलेन बाय तनिष्क, गार्गी बाय पीएनजी यांसारख्या मोठ्या ब्रँड्सनी सोन्याच्या दागिन्यांइतकंच लक्ष चांदीच्या या ब्रँचेसकडे पुरवलं आहे. जिवा, मोहा, आद्या अशा ब्रँड्सचा तर संपूर्ण फोकस सिल्व्हर ज्वेलरीवर आहे. सेलेब्रिटी ब्रँड्स जसे श्रद्धा कपूरचा पालमोनास, प्राजक्ता माळीचा प्राजक्तराज अशा ब्रँड्सनीसुद्धा सिल्व्हर ज्वेलरीमध्ये वैविध्य आणत तरुणाईला आपलंसं केलं आहे. सोन्याच्या दागिन्यांपेक्षा चांदीच्या दागिन्यांना प्राधान्य देणाऱ्या तरुणाईला केंद्रस्थानी ठेवून हे मार्केट तयार झालं आहे.सोन्यापेक्षा तरुणाईचा कल हा चांदीकडे अधिक आहे. चांदीच्या दागिन्यांवर एवढं प्रेम बसण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे त्यांची अफोर्डेबिलिटी! सोन्याची चार डिझायनर ब्रेसलेट, चेन किंवा मंगळसूत्र घेण्यापेक्षा चांदीचे चार दागिने केव्हाही खिशाला परवडतात. सोन्याच्या एका दागिन्याच्या किमतीत चांदीचे वेगवेगळ्या व्हरायटीचे चार दागिने घेता येतात. त्यामुळे चांदीच्या दागिन्यांना सगळ्यात पहिलं प्राधान्य दिलं जातं. याबरोबरच दुसरा महत्त्वाचा फॅक्टर आहे तो म्हणजे नाजूकपणा. चांदीच्या अत्यंत बारीक तारांचेसुद्धा नाजूक दागिने बनतात. त्यामुळे बारीक बारीक पॅटर्न्ससाठी आणि नाजूक डिझाईन्ससाठी चांदीला प्राधान्य दिलं जातं. चांदीचे दागिने हे सोन्यापेक्षा थोडे हाय मेंटेनन्स असतात. ते काळे पडू नयेत म्हणून त्यांची काळजी घ्यावी लागते, त्यांना सॉफ्ट कॉटनमध्ये गुंडाळून ठेवावं लागतं, वेळोवेळी त्याला पॉलिश करावं लागतं, मात्र ते करूनही त्यांच्या सौंदर्यामुळे त्यांच्याकडे पाहण्याचा तरुणाईचा दृष्टिकोन प्रेमळच राहतो.

चांदीच्या ज्वेलरीमध्ये केवळ लखलखती चांदी नव्हे तर ऑक्सिडाइज्ड ज्वेलरीचाही मोठा पर्याय खुला असतो. साडी, ड्रेस, इंडो-वेस्टर्न, अगदी पूर्ण वेस्टर्न आऊटफिट्सवरही ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी वापरता येते. सिल्व्हर ज्वेलरीच्या बाबतीत खासकरून काही विशिष्ट ट्रेण्ड पाहायला मिळतात जसं की लेयरिंग किंवा पेयरिंग. एकाच ब्रेसलेटऐवजी एक कडं, एक चेन, एक ब्रेसलेट असं पेयरिंग करता येतं किंवा एक सिंगल चेन आणि पेंडंट घालण्याऐवजी एक बीडेड चेन, एक प्लेन चेन, एक पेंडंट असं लेयरिंग करता येऊ शकतं. यामुळे ज्वेलरी ही केवळ स्टाइल न राहता फॅशन स्टेटमेंट बनते. सिल्व्हर ज्वेलरीमध्ये ट्रायबल ज्वेलरी, बोल्ड ज्वेलरी असेही पर्याय मिळतात. वेगवेगळ्या रंगांच्या धाग्यांमध्ये गुंफलेले बोल्ड सिल्व्हर स्टेटमेंट पीसेस हे गळ्यातही घालता येतात किंवा हातातही ब्रेसलेटसारखे वापरता येतात. मणी किंवा धाग्यांमध्ये गुंफलेली मोठी पेंडंट्स ही त्या ज्वेलरीला ट्रायबल लुक देतात. असे लुक्स खासकरून इंडो-वेस्टर्न आऊटफिटवर अधिक वापरले जातात.चांदीच्या ज्वेलरीमध्ये खासकरून ट्रेण्डमध्ये असलेल्या ॲक्सेसरीज म्हणजे टो-रिंग्ज अर्थात जोडव्यांचे प्रकार, नोज-रिंग्स, ईयर पिअर्सिंग, अँकलेट अर्थात पैंजण इत्यादी. सोन्याच्या दागिन्यांमध्ये ज्या बनतच नाहीत अशा ॲक्सेसरीज खासकरून चांदीमध्ये फेमस असतातच, मात्र आताच्या काळात त्या अधिक लोकप्रिय व्हायला लागल्या आहेत. टो- रिंग्जमध्ये वेगवेगळी डिझाईन्स, जशी की मासोळी, फूल, ओम अशा पॅटर्न्समध्ये त्या फेमस आहेत. नोज रिंग किंवा सेप्टम रिंग खासकरून तरुणाईमध्ये अधिक लोकप्रिय आहेत. प्रेस किंवा पिअर्सिंग अशा दोन्ही पर्यायांमध्ये नोज रिंग्सना भरपूर मागणी असते. त्यात जिओमेट्रिक शेप्स, फ्लोरल डिझाईन्स, अशा वेगवेगळ्या स्टाइल्सना पसंती मिळते. पैंजण किंवा अँकलेटमध्ये बीडेड, लटकन, घुंगरू आणि ऑल टाइम फेवरेट प्लेन पैंजण चेन असे ट्रेंड्स पाहायला मिळतात. या सगळ्यांना तरुणाईची प्रचंड पसंती असते.

चांदीच्या लखलखत्या दागिन्यांपासून ते ऑक्सिडाइज्ड ज्वेलरीपर्यंत सगळ्याच स्टाइल, पॅटर्न, व्हरायटीजना तरुणाईची खास पसंती आजकाल मिळायला लागली आहे. त्यामुळे सणासुदीच्या काळातसुद्धा मार्केटमध्ये सोन्याच्या खरेदीसोबतच चांदीच्या ज्वेलरीलाही स्पॉटलाइटमध्ये ठेवलं जातं.