मला वाटतं कामवाले- आणि त्यांचे मॅडम, भाभी, दीदी, दादा, साहेब यांच्याविषयी एक पुस्तकच लिहावं इतका मजेदार मसाला माझ्याकडे जमला आहे एव्हाना. नावही ठरलंय त्याचं- नमुने!
अगदी कालच एकाचा ड्रायव्हर सांगत होता.. विविध हॉटेलांमधून जेवणाच्या, आइस्क्रीम, भेळपुरी ते मसाला पान, फिश काय वाट्टेल त्या ऑर्डरी देतात आणि मला ते पदार्थ घ्यायला पाठवतात. पण एकदासुद्धा या माणसांनी मला भेळ सोडा- साधा चहासुद्धा स्वत:च्या पैशांनी देऊ केलेला नाही. अशा नमुनेदार मालकांबद्दल काय बोलायचं! शहरांमध्ये तर वजन, क्रिकेट, राजकारण्यांना लाखोली. यांच्या बरोबरीने आणखी एक विषय ज्वलंतपणे समोर येतोय- तो म्हणजे कामासाठी माणूस. कुठल्याही रॅण्डम ठिकाणी जा. स्व्ॉन्की कारमधून गॉगल, हील्स घालून हॅलो शांपूच्या जाहिरातीसारखे केस उडवत आलेली शिष्ठ वाटू शकेल अशी एखादी सुंदरा कामाच्या माणसाचा विषय निघाला की, इतकी बापुडवाणी होऊन बोलायला लागते.
तसंच झालं. विश्वासू बाई अचानक सोडून गेल्यामुळे हे दोघं अगदी रंजीला आले होते. कुणी मिळेल का कामाला- अशी घायकुतीला येऊन विनंती करत होते. संभाषणात अगदी चुकीच्या वेळेला- ‘‘मग तू काय करतेस सध्या- असं विचारलं त्यांनी. त्या आधीचं दुसऱ्या कुणाशी तरी बोलताना माझं वाक्य होतं- ‘‘संपलं शूटिंग. आता जरा मोकळी आहे मी.’’ ह्य़ावर परिस्थितीमुळे ते चक्क मलाही- ‘‘येतेस का जरा चार तास आमच्याकडे कामाला.’’ असं म्हणतील ह्या कल्पनेनी मला अनावर हसू यायला लागलं. बदल म्हणून खरंच जावं कामाला आणि ह्य़ा आळशी, ऐदी कुटुंबाला चांगली अद्दल घडवावी असा खटय़ाळ विचार मनात डोकावला- पण कल्पनारंजन आवरत मी त्यांना एका ब्युरोचा नंबर दिला- आणि लगेच पस्तावले.
मागच्याच वर्षी ब्युरोबद्दल प्रचंड घोळ झाला होता. तिथे- मोलकरीण, स्वैपाकी, नर्स, ड्रायव्हर असे वेगवेगळे हेल्पर कमिशन बेसिसवर पुरवले जातात. ब्युरोची ठराविक फी आणि हेल्परचा पगार वेळेवर देणं अनिवार्य असतं. माझ्या ह्य़ा अभिनेता मित्र आणि मैत्रिणीनी काय करावं? त्यांनी माझ्याकडून नंबर घेतला आणि अचानक एक दिवस न सांगता त्या ब्युरोच्या ऑफिसमध्ये जाऊन धडकले. काही गरज होती का?! ह्य़ावर आमच्या ह्य़ा सुप्रसिद्ध मित्रवर्याचं लॉजिक असं- की सगळ्या गोष्टी तपासून पाहाव्या, अनपेक्षितपणे टपकून परिस्थितीची टेहळणी करावी. आता आपण काय युद्धाला निघालो का तो कामवाल्यांचा ब्युरो म्हणजे शत्रुपक्ष आहे. कशाला कारण नसताना गनिमी कावा साधायचा, असो. कुठे, कधी, कशाला जावं. हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. तर उपनगरातल्या कुठल्याशा गल्लीतलं- जुनाट बिल्डिंगमधलं ते ऑफिस मित्राला अगदी अपेक्षाभंगाचा नमुना वाटलं. त्यांनी उगीचच ब्युरोच्या मालकाला फैलावर घेतलं. माझा संदर्भ सांगितला आणि कडी म्हणजे कामाच्या बायका दाखव म्हणून बसला! हा स्वत:ला स्थळ वगैरे समजत होता की काय.
मालकांनी त्यातल्या त्यात परिस्थिती सावरत साहेबांना चहा-पाणी-ठंडा इ. विचारलं- आणि उमेदवारांना मुलाखतीसाठी घरी पाठवतो असं सांगितलं. बरं, जागा फारशी समाधानकारक वाटली नव्हती तर त्या ब्युरोवर फुली मारायची ना. ते नाही. तिथल्या माणसांना कामावर घेतलं (गरज होती ना.) दर चार-आठ दिवसांनी (अचानक) त्यांची झडती घेतली जायची. पगार अंशत: दिला जायचा (न सांगता नोकरी सोडून जाऊ नये म्हणून!) रात्री झोपल्यावर हळूच त्यांचा मोबाइल चेक केला जायचा. (कुणाकुणाला फोन केले ते बघायला!) देवा. दिवसभर अभिनय करून पुन्हा इतका खेळखंडोबा करायला ह्य़ा दांपत्याला वेळ कसा मिळायचा कोण जाणे!
एका कुटुंबानी सीसीटीव्ही लावून घेतला होता. दोघं नोकरी करणारे. घरी आल्यावर रात्री सगळं फूटेज बघत बसायचे. आणि दुसऱ्या दिवशी स्टाफला ओरडत बसायचे- तुम्ही मुलाला घेण्यापूर्वी हातच का धुतले नाहीत. इतका वेळ जेवत का बसलात. मुलाला रागवलात का. एक ना दोन! दुसऱ्या मैत्रिणीकडे स्टाफला एकमेकांशी बोलायला बंदी आहे. मुलं सांभाळणाऱ्या मुलींनी- कुकशी किंवा ड्रायव्हरशी, कचरा घ्यायला येणाऱ्यांशी अजिबात बोलायचं नाही म्हणे! एक मैत्रिण तिच्या ‘नॅनी’चं लग्न ठरल्यावर हृदयभंग झाल्यासारखी खिन्न झाली होती. तिचा प्रियकर असल्यासारखी लग्न मोडायला निघाली होती. तिचं म्हणणं- माझी मुलगी पाचवीत जाऊ दे.. मग तू लग्न कर. वा रे वा! तुम्ही इस्टेटी वाढवा, प्रगती करा, सिनेमा बघा, अफेअर करा. आणि हाताखालच्या माणसानं मात्र झापड बांधून ‘जैसे थे’ राहावं- हा कुठला न्याय?
एक काका आणि काकू झाडायला-पुसायला येणारीच्या मागेच लागतात- शिवाशिवी खेळल्यासारखे! इथे केर राहिला बघ- तिथे जरा नीट पुस. एक मैत्रीण दिसली कीच तिच्या बिल्डिंगमधले वॉचमन, ड्रायव्हर, बायका पळ काढतात. ती प्रत्येकाला त्यांचा पगार, कामाचं स्वरूप, वेळा. विचारत बसते. हल्ली तर मीसुद्धा ती दिसली की धूम ठोकते, कारण तिच्या गप्पा फक्त- स्टाफविषयी असतात. आधीची बाई कशी दगा देऊन पळाली- नवी मिळेल का- ती चोर वाटते- एका वेळच्या स्वैपाकाच्या पगारात दोन वेळचं करून घेण्याच्या क्लृप्त्या. असली फसवी रेकॉर्ड ऐकवत नाही सारखी! एक मैत्रीण ह्य़ाच्या अगदी विरुद्ध. आलं कुणी कामाला की घेतलाच हिनी ताबा. संपूर्ण कळवळ्यानी घरातल्या प्रत्येकाची डिटेलमध्ये चौकशी. वारंवार नको ते सल्ले. स्वैपाक सुरू झाला की, काय काय घालतेस म्हणत जवळजवळ तडतडत्या फोडणीत डोकं घालते. सारखं तिखट किती- मीठ किती- अय्या- हो. का करत स्वैपाक करणाऱ्याला सुचूच देत नाही काही. आजकाल कुक लोकं ती नसतानाच येतात शक्यतो. काय हे नमुने! आपल्या घरगुती टीमसाठी आपण किती विनोदाचा (आणि वैतागाचाही) विषय असू शकतो ना!