‘बाई’ हे काय आपल्या घरी २४ तास राहणाऱ्या व्यक्तीसाठी संबोधन झालं? त्या व्यक्तीलाही काही नाव असतं. त्याही पलीकडे. मन असतं..
‘‘हाऽऽऽऽय! कशी आहेस? थँक्स फॉर ड्रॉपिंग इन. काय घेशील? बाऽऽई.. दो चाय लाना और स्नॅक्स में व्हेज टिक्की बनाना, जल्दी. दस मिनिट में रेडी चाहिए!’’ मी तिच्या मिठीतून सुटत म्हटलं- ‘‘अगं हो, हो. आत तरी येऊ दे मला..’’ ती हसायला लागली. ‘‘वाऊव्ह इज दॅट युवर डॉटर? हाऊ स्वीट. व्हॉट विल यू हॅव्ह लिटिल पाय? चॉकी खानाल बेबी? बाईऽऽऽ क्रीम बिस्कीट का डब्बा और कॅडबरीज लेके आओ जल्दी.’’ अक्षरश: दोन मिनिटांत एका प्लेटमध्ये कॅडबऱ्या, मोदकाच्या आकाराचे चॉकलेट्स छान मांडून, सोबत बिस्किटाचा (चोरावासा वाटावा इतका आकर्षक) डबा, पाण्याचे उंची (आणि उंच) ग्लास- असं सगळं पेलत एक वीस-पंचवीस वर्षांची स्मार्ट सावळी मुलगी आली. ते सगळं समोरच्या टीपॉयवर उतरवेपर्यंत मैत्रीण जरबेनं म्हणाली, ‘‘और चाय किधर है?’’ मुलगी ओशाळत उत्तरली. ‘‘रखा है गॅस पे.. दो मिनीट में लाती हूँ.’’ ‘‘अभी तक बनी नहीं चाय? एकसाथ क्यँू नहीं लाया सब? अब टिक्की क्या कल बनेगी…’’
माझा माझ्या कानांवर विश्वासच बसेना. एरवी माझ्याशी अगदी मृदूपणे बोलणारी मैत्रीण दुसऱ्या कोणाशी अशी तोफ डागल्यासारखी कशी बोलू शकते. काही बिनसलं आहे का घरात. असं वाटेपर्यंत स्वत:च एक चॉकलेट खात मैत्रीण माझ्याकडे वळून म्हणाली, ‘‘आय टेल यू. हे सर्व्हट्स म्हणजे डोक्याला हेडेक असतो. काम तर नीट करायचं नाही आणि वर तोंड वेंगाडत सारखे पैसे मागायला मात्र हुषार! वीस हजार उधार घेतलेत हिनी..’’ मला फार गलबलून आलं एकदम. आपल्या घरी काम करणारी व्यक्ती आपल्या कुटुंबाचाच भाग असते ना. आपल्या टीम मेंबरची आर्थिक चणचण आपण आदरानी, सौदार्हानी सांभाळून घेतली पाहिजे. त्यात पाणउतारा करण्यासारखं काय आहे? दोनच हात आहेत त्या मुलीला- जादू केल्यासारखी सगळं कसं दो मिनीट में आणू शकेल ती. एवढं मनाशी बोलून होईपर्यंत ती मुलगी- शीतल चहा घेऊन आली. ‘थँक यू’ म्हटल्यावर जराशी हसली. तेवढय़ात मैत्रीण खेकसली. ‘‘हं. चला. हसण्यात वेळ वाया घालवू नका. टिक्की झाली? तुझ्यासाठी पोहे सांगू का सोनाली?’’ मी आश्यर्यानी विचारलं. ‘‘आत अजून कोणी कुक आहे का हिच्या मदतीला?’’ त्यावर मैत्रीण म्हणाली, ‘‘छे. छे. अजून कुक कुठे परवडायला? हीच सगळं करते. झाडू, भांडी, डस्टिंग, स्वैंपाक. तरी मोकळा वेळ मिळतोच ना. मग टीव्ही बघायला मागते. हे नोकर लोक म्हणजे..’’ मी मैत्रिणीच्या रणगाडय़ाला थोपवत अविश्वासानी म्हटलं, ‘‘एवढी सगळी कामं ही मुलगी एकटी करते?’’ मैत्रिणीचं म्हणणं- ‘‘हो. शिवाय छोटय़ा मुलाला शाळेत सोडायलाही जाते. परवा दहा मिनिटं उशिरा घरी आली. म्हणजे नक्की कुणाशी तरी बडबडत बसली असणार. आता हिला बॉयफ्रेंड वगैरे मिळाला तर माझी वाट लागेल.’’
मला माझ्या मैत्रिणीच्या आक्रमक विचारांनी गुदमरल्यासारखं झालं. मला आजतागायत मदत करणाऱ्या सगळ्याजणी आठवल्या. घरी काम करणारी माणसं किती प्रेमळ. तसेच मायेची भुकेली असतात. मी शीतलच्या बाजूनी काही सांगायला गेले तर मैत्रीण फणकारली. ‘‘व्हॉट शीतल अॅण्ड ऑल यार. आय जस्ट से बाई. त्यांना स्वत:च्या पंक्तीला बसवण्याचा मूर्खपणा कधीच करणार नाही मी. नोकरांना नोकरांच्या लायकीनीच.’’ माझी कानशीलं गरम झाली. २०१३ मध्ये आहोत आपण आणि इतकी निंदनीय विचारसरणी? वीस हजार रुपये फेडू शकत नाही तोपर्यंत एका तरुण मुलीला असं मिंधं करून ठेवायचं? जेवण देतो म्हणजे उपकार करतो अशी भावना बाळगायची? त्या मुलीचं मन, भावना स्वत: असं कवडीमोल करून पायदळी तुडवायचं? चार समजुतीच्या गोष्टी सुनावूनच बाहेर पडले मी त्या दिवशी.
माझी मैत्रीण खऱ्या अर्थाने ‘स्टिकिंग रीच’ आहे. घरात सगळ्या डिझायनर, ब्रॅण्डेड गोष्टी. दारात तीन गाडय़ा. इतकी सुबत्ता असून दुसऱ्या माणसाशी वागताना इतका कद्रू- कपटीपणा? पगार कापणे, अपमान करणे, स्वैंपाघरात डांबून कामाला लावणे. इतकंच काय ‘नोकर’ हा शब्दसुद्धा आता आपल्या जीवनशैलीतून हद्दपार झाला आहे- केलाच पाहिजे. एखादी व्यक्ती आपल्या घरातला कचरा ऊर्फ घाण स्वच्छ करण्यासाठी आपल्याला वेळ देते- ह्य़ाबद्दल आपण कृतज्ञच राहायला पाहिजे. भारतातच ही मदतीच्या हातांची चैन आहे. नाहीतर इतर देशांमधे स.ग.ळी. कामं स्वत: करावी लागतात किंवा हेल्पर्ससाठी गगनचुंबी पगार मोजावे लागतात. आपल्याकडे अजूनही स्वेच्छेने/ परिस्थितीमुळे माणसं पडेल ती कामं करायला तयार होतात. पण त्यामुळे आपण स्वामित्वाची भूमिका घेण्याची अजिबात गरज नाही. एकतर स्वत: बूड उचलून काम करावं, नाहीतर घरी काम करणाऱ्या माणसांना सन्मानानी वागवायला शिकावं. आपण कुणाला तरी गुलामासारखं हिणवतोय, आपल्याला बॉसिंग करण्याचा चस्का लागतोय- हे वेळीच ओळखावं. नाहीतर- कुणी काम करेल का काम माझ्या घरी. असं दारोदार विनवत फिरण्याची पाळी येईल.
संग्रहित लेख, दिनांक 22nd Feb 2013 रोजी प्रकाशित
सो कुल : नो नोकर!
‘बाई’ हे काय आपल्या घरी २४ तास राहणाऱ्या व्यक्तीसाठी संबोधन झालं? त्या व्यक्तीलाही काही नाव असतं. त्याही पलीकडे. मन असतं.. ‘‘हाऽऽऽऽय! कशी आहेस? थँक्स फॉर ड्रॉपिंग इन. काय घेशील? बाऽऽई.. दो चाय लाना और स्नॅक्स में व्हेज टिक्की बनाना, जल्दी. दस मिनिट में रेडी चाहिए!’’ मी तिच्या मिठीतून सुटत म्हटलं- ‘‘अगं हो, हो. आत तरी येऊ दे मला..’’
First published on: 22-02-2013 at 01:01 IST
मराठीतील सर्व Show Cool बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: So cool respect your servent