मी १८ वर्षांची असून माझी उंची ४.८ फूट आहे आणि वजन ३९ किलो आहे. मी तशी बारीक आहे. कुठली ड्रेसिंग स्टाइल मला चांगली दिसेल? मला फॉर्मल्स घालायला आवडतं. – कृतिका, मुंबई
प्रिय कृतिका,
तू वर्णनावरून सडपातळ असावीस असं वाटतं. पण तुझ्या उंचीचा विचार करता वजन योग्य वाटतं. तुझ्यातल्या प्लस पॉइंट्सकडे आधी लक्ष द्यायला हवं. तू बारीक आहेस आणि ही चांगलीच गोष्ट आहे. कारण बारीक मुलींना बहुतेक सगळ्या स्टाइल्स चांगल्या दिसतात.
एका गोष्टीचं मात्र मला कुतूहल वाटतं. तुला फॉर्मल ड्रेसिंग आवडतं असं तू लिहिलंस, पण मुली फॉर्मल घालण्यासारखे प्रसंग किती वेळा येतात तुझ्या आत्ताच्या रुटीनमध्ये? तू मुंबईत राहतेस आणि आत्ता केवळ १८ वर्षांची आहेस. म्हणजे खरंतर लेटेस्ट ट्रेंड मला तुझ्याकडून कळले पाहिजेत.. हो ना! विनोदाचा भाग सोडला तरी मुद्दा हा आहे की, तुझ्या वयाचा विचार करता तू आता बारावीत असणार किंवा जास्तीतजास्त फर्स्ट इअरला. फॉर्मल ड्रेसिंग स्टाइल अधिक करून ऑफिसला जाताना, मीटिंगसाठी, सेमिनार, कॉन्फरन्स किंवा प्रेझेंटेशनच्या वेळेसाठी वापरले जाते. तू मला विचारशील तर मी म्हणेन, तुझ्या वयाच्या मुलींनी अधिकाधिक ट्रेंडी कपडे घातले पाहिजेत.
एक गोष्ट महत्त्वाची. ज्या कपडय़ांमध्ये तू सगळ्यात जास्त कम्फर्टेबल असशील असेच घाल. फॅशनेबल राहणं म्हणजे कमी कपडय़ात वावरणं असं अजिबात नाही. तू पंजाबी ड्रेस आणि कुर्ता घालत असशील तर तोसुद्धा ट्रेंडी असू शकतो. तू लेटेस्ट फॅशनचे कुर्ते वापरायला हवेस. तुझ्याच कॉलेजच्या आसपासच्या मुलींकडे बघ. लेटेस्ट ट्रेंड लगेच लक्षात येईल. वृत्तपत्र, मासिकं, टीव्ही अशा माध्यमांमधून येणारे फॅशनविषयक कॉलम्स वाचलेस तरी लेटेस्ट स्टाइल लक्षात येईल. मुंबई ही झपाटय़ानं बदलणारी बाजारपेठ आहे. फॅशनची पंढरी आहे. त्यामुळे याकडे लक्ष दे.
सर्वप्रथम तुला शोभून दिसतील असे रंग कोणते ते सांगते. तुझा मीडियम स्कीन टोन लक्षात घेता काळा, पांढरा, निळा, हिरवा, बेज, सगळे पेस्टल कलर, लेमन यलो, मरून, ब्राऊन, रोझ पिंक, ग्रे हे सगळे रंग चांगले दिसतील. केवळ नियॉन ग्रीन टाळायला हवा. तुझ्या वयाला थोडे गडद रंग वापरायला हरकत नाही. कापडाचा विचार करता, मीडियम आणि हेवी वेट फॅब्रिक्स तू वापरायला हवीत. म्हणजे जॉर्जेड, शिफॉनसारखी झुळझुळीत आणि हलकी आणि ट्रान्स्परंट फॅब्रिक्स शक्यतो टाळ. कारण ती अंगासरशी बसतात आणि त्यामुळे तू आणखी काठीसारखी बारीक दिसशील. त्याऐवजी कॉटन, लिनन, सिल्क, सॅटिन, इटालियन क्रेप, डेनिम, टिश्यू, वेल्वेट, ब्रोकेड अशी वजनाला जड असणारी फॅब्रिक्स तुला शोभून दिसतील. निटेड वेअर, होजिअरी किंवा लायक्रा तुझ्यासाठी बेस्ट. सलवार कमीज, जीन्स-टॉप, ड्रेस. स्टाइल्स कुठल्याही चालतील. कॉलेजच्या मुली जनरली जीन्स वापरतात. तुला आवडत असतील तर तूदेखील वापर. पण त्यावर कुर्ती किंवा त्या स्टाइलचा टॉप घालणं टाळ. सध्या ती फॅशन नाही. स्पगेटी आणि त्यावर लेटेस्ट स्टाइलचं जॅकेट, श्रग असे काही प्रयोग करू शकतेस. फ्लोइंग स्कर्ट सध्या अनेक मुली घेताहेत. पण ते फॅशनपेक्षा फॅड अधिक आहेत. तू म्हणतेस त्याप्रमाणे फॉर्मल स्टाइल तुला आवडत असेल तर एखादा स्मार्ट शर्ट आणि जीन्स असा पेहराव करू शकतेस. यातून सगळेच परिणाम साधतील.
कपडय़ाबरोबर सुयोग्य अॅक्सेसरीज असणं आवश्यक असतं. त्यामध्ये हेडवेअर, स्लोल, स्कार्फ, हँडबॅग, पर्स, क्लच, बेल्ट, वेस्टबेल्ट, फुटवेअर हे सगळं आलं. यातलं काय आणि कसं आवश्यक आहे हे विचारपूर्वक ठरव. बेसिक नेकपीस, हूप रिंग्ज, कडं आणि ब्रेसलेट हे इतपत दागिने कॉलेजच्या मुलींच्या अंगावर शोभून दिसतात. यातलीही लेटेस्ट स्टाइल बघून घे. आपल्याला काय चांगलं दिसेल याचा विचार करून स्टाइल फॉलो कर. अशा प्रकारे स्वत:चं ग्रूमिंग केलंस तर छान प्रभाव पडेल.
संग्रहित लेख, दिनांक 4th Jul 2014 रोजी प्रकाशित
फॅशन पॅशन – सुयोग्य ड्रेसिंग स्टाइल
मी १८ वर्षांची असून माझी उंची ४.८ फूट आहे आणि वजन ३९ किलो आहे. मी तशी बारीक आहे. कुठली ड्रेसिंग स्टाइल मला चांगली दिसेल? मला फॉर्मल्स घालायला आवडतं. - कृतिका, मुंबई

First published on: 04-07-2014 at 04:37 IST
मराठीतील सर्व व्हिवा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Style advice and fashion tips for girls