|| तेजश्री गायकवाड
कितीही उन्हाळा असला, अंगाला घामाने चिकचिक होत असली तरी आपण रोजची मिनिमल ज्वेलरी तर घालतोच. त्यामुळे खास उन्हाळ्यात ज्वेलरीमुळे घामाचा त्रास आणखी वाढू नये, आणि स्टाईल स्टेटमेन्टही कायम रहावे यासाठी हलकीफुलकी समर ज्वेलरी बाजारात आली आहे. त्याबद्दल जाणून घेऊ या..
‘बोल्ड इज ब्युटीफुल’ या तत्त्वाप्रमाणे फॅशन विश्वात बदल घडून येत असतात. ज्वेलरीच्या बाबतीतसुद्धा हे सूत्र नक्कीच पाळलं जातं आहे.ओव्हरसाइज इअरिरग्ज, ओव्हरसाइज किंवा प्लस साइज नेकपीस, ओव्हरसाइज अँकलेट, ब्रेसलेट या सगळ्यांच्या बरोबरीने ओव्हरसाइज नोजपिनसुद्धा सगळ्यांच्या पसंतीस उतरत आहेत. केवळ त्यांचा आकार मोठा आहे असं नाही. तर त्याच्या डिझाइनमध्ये अगदी काही फेमस शब्द, गाणी यांचा उत्तम वापर करून घेत ही ज्वेलरी केली असल्याने एखाद्याला असे दागिने परिधान करून आपल्या व्यक्तिमत्त्वातील बंडखोरी दाखवून देण्याची फॅ शनेबल संधी मिळते. ‘माल’ असो किंवा ‘ठरकी’ असे शब्द लॉकेटमध्ये पेरून केलेले नेकलेस किंवा कानातले डूल सध्या पाहायला मिळत आहेत. अशा बंडखोर ज्वेलरीच्या वापराची सुरुवात गेल्या वर्षीपासूनच झाली असली तरी आता ती फॅशन म्हणून व्यक्तिगणिक रुळताना दिसते आहे .
नानाविध धातूंच्या दागिन्यांना पसंती
सोन्या-चांदीच्या दागिन्यांची भारतीय लोकांना असलेली आवड कधीच कमी होणार नाही. आणि उन्हाळा म्हटला की लग्नसराईचा मोसम असल्याने लोकांचा कल हा सोन्या-चांदीच्या खरेदीकडे असतोच असतो. मात्र हल्ली सोन्या-चांदीबरोबरच इतरही धातूच्या ज्वेलरीला लोकांची पसंती मिळू लागली आहे. यामध्ये मुखत्वे प्लॅटिनम ज्वेलरी खूप ट्रेण्डमध्ये आहे. प्लॅटिनम ज्वेलरीमध्ये वेडिंग बॅण्डस, कडे, अंगठय़ा, नेकपीस, बांगडय़ा ट्रेण्डमध्ये आहेत. ग्राहक एरव्ही भेटवस्तू देण्याकरतासुद्धा किंवा प्री वेडिंग गिफ्ट्स म्हणून प्लॅटिनम ज्वेलरी खरेदी करतात. प्लॅटिनम धातू तसेच पाचू आणि माणिक, वेगवेळ्या रंगाचे डायमंड हे कॉम्बिनेशन खूप प्रमाणत दिसून येते आहे. प्लॅटिनमप्रमाणे मोती, वुडन बीड्स, मानवी आकाराचे पॅचेस असलेले, ऑक्सिडाइज्ड, वेगवेगळ्या नॅचरल स्टोनची ज्वेलरीही सध्या बाजारात आहे. अशी ज्वेलरीही वेगवेगळ्या सणांना, पार्टीला, रोजच्या रोज वापरली जाते. यामध्ये मुखत्वे स्टेटमेन्ट नेकपीस, कानातले, कपल अंगठय़ा, अँकलेट्स, ब्रेसलेट हे ट्रेण्डिंग आहेत.
स्टेटमेन्ट ज्वेलरी
असं म्हणतात हा स्टेटमेन्ट ज्वेलरीचा प्रकार म्हणजे ज्या व्यक्तीने ती घातली आहे तिचं/त्याचं व्यक्तिमत्त्व त्या ज्वेलरीच्या माध्यमातून सहज उमटावं असा असतो. ही ज्वेलरी आपण कोणत्याही प्रकारच्या आउटफिट्सवर सहज घालू शकतो. अगदी कोणत्याही कार्यक्रमाला जाताना तुम्ही या ज्वेलरीला प्रध्यान देऊ शकता. स्टेटमेन्ट ज्वेलरीमध्ये स्टोन्सचा, खडय़ांचा, डायमंड्सचा वापर जास्त केला जातो. ही ज्वेलरी दिसायल कधी कधी जड दिसते, पण ती शक्यतो हलकीच असते. नाजूक स्टेटमेन्ट ज्वेलरी घालण्यावर अनेकांचा भर आहे. त्यामुळे बाजारात नाजूक हलक्याफुलक्या ज्वेलरीच जास्त पहायला मिळतात. स्टेटमेन्ट ज्वेलरीमध्ये नेकपीस, अंगठी, कानातले असा सेटही उपलब्ध आहे.
चंकी आणि सिल्वर ज्वेलरी
नेहमी आपण बेसिक ज्वेलरी वापरतोच, पण बऱ्याचदा हीच ज्वेलरी वापरून रोजच्या जीवनातही आपल्याला फॅशनेबल आणि हटके लुक हवा असतो. आणि म्हणूनच अनेक ब्रॅण्ड्सनी चंकी ज्वेलरी आणि सिल्वर ज्वेलरी बाजारात आणली आहे. या ब्रॅण्ड्स अंतर्गत तुम्हाला नोजरिंग, खुडी, नेकपीस, कानातले, अंगठी, कंबरपट्टा अशा सगळ्याच प्रकारची ज्वेलरी बघायला मिळेल. कलेक्शनमध्ये तुम्हाला जुने ट्रेडिशनल मोटिफ, डिझाइन नवीन लुकमध्ये मिळतात. यामुळे इंडोवेस्टर्न असा या ज्वेलरीचा लुक तुम्ही ट्रेडिशनल, वेस्टर्न अगदी जीन्स, वनपीस अशा सगळ्याच आऊटफिट्सवरती मेन्टेन करू शकता. याशिवाय, लोकल ते ग्लोबल सगळ्याच मार्केटमध्ये चंकी ज्वेलरीचा ट्रेण्ड काही महिन्यांपासून खूप प्रमाणात आहे. ही चंकी ज्वेलरी लवकर खराब होत नाही आणि ती सगळ्या प्रकारातही उपलब्ध आहे. आणि याच्या किमतीही तरुणाईसाठी पॉकेट फ्रेंडली आहे. त्यामुळे तरुणवर्ग रोजच्या वापरात या ज्वेलरीचा जास्त वापर करताना दिसतो.
उन्हाळ्यात घालायची ज्वेलरी शक्यतो दुकानातून, चांगल्या ब्रॅण्डचीच खरेदी करावी, असं मत ‘चिकमेला’ या ज्वेलरी ब्रॅण्डच्या ज्वेलरी डिझायनर जॉयस मॅथ्यू सांगतात. अनेकदा मुली, महिला या ब्रॅण्डेड कपडेच घेतात, पण ज्वेलरीची वेळ येते तेव्हा मात्र त्या स्ट्रीट शॉपिंग करतात. परंतु उन्हाळ्यात तरी स्ट्रीट ज्वेलरीला पसंती न देता दुकानातून ती खरेदी करा. नाही तर ज्वेलरीचा रंग जाणे, ती ज्वेलरी अंगाला लागून त्वचेला त्रास होणे असे प्रकार होतात. त्यामुळे वॉटरप्रूफ, चांगला दर्जा असलेली ज्वेलरी घालण्याचा सल्ला जॉयस देतात. मात्र, उन्हाळ्यात खरोखरच स्टाईल स्टेटमेन्ट सांभाळताना शरीराला त्रासदायक ठरणार नाही, अशी ज्वेलरी निवडणेच योग्य ठरते. त्याला अनुसरून अनेक प्रकारची समर ज्वेलरी बाजारात आली आहे. त्याचा पुरेपूर वापर करत खास समर लुक डिझाइन करणे शक्य झाले आहे.
viva@expressindia.com