पुणेरी पाटय़ा, पुणेरी टोमणे, पुणेरी संस्कृती, पुण्याच्या पेठा, पुण्याचं सगळंच नेहमी प्रसिद्धच असतं. तर अशा पुण्याचा एक प्रसिद्ध रस्ता म्हणजे फर्गसन महाविद्यालय रस्ता. हल्ली आम्ही त्याला एफसी रोड म्हणतो. अनेक महाविद्यालयं या भागात असल्याने हा रस्ता कायम तरुणाईनं फुललेला असतो. तुळशीबाग, लक्ष्मी रोड, कँपनंतर शॉिपगसाठी पण याच रस्त्याचा नंबर लागतो बरं का! खाबूगिरी करण्यासाठीही इथे भरपूर खाऊचे कट्टे आहेत. पुण्याची प्रसिद्ध (आता हे खरं तर वेगळं सांगायला नको) वैशाली, रुपाली ही हॉटेल्स इथलीच. पण आज इथल्या काही तुलनेनं कमी प्रसिद्ध पण लोकप्रिय चहाअड्डय़ांविषयी सांगणार आहे. ही ठिकाणं एफसी रोडच्या गजबजाटातही निवांत आहेत. त्याला त्या ठिकाणची संस्कृती आहे आणि मुख्य म्हणजे इथे ३० ते ५० रुपयांच्या रेंजमधले पदार्थ आहेत.
रुपाली हॉटेलच्याच समोर, बी.एम.सी.सी कॉर्नरला पुणे विद्यापीठाचाच विभाग असणारी रानडे इन्स्टिटय़ूट आहे. इथे विद्यापीठाचा पत्रकारिता आणि परकीय भाषा विभाग आहेत. तसंच ‘यूजीसी’ची लायब्ररीदेखील आहे, परंतु इथे येणाऱ्या लोकांच्या दृष्टीने या सगळ्या बरोबरच अजून एक महत्त्वाची जागा म्हणजे ‘रानडेचं कँटीन’. रानडेचं कँटीन हे इतर कँटीनपेक्षा अनेक दृष्टीने आगळंवेगळं आहे. हे खरं तर ओपन कँटीन. म्हणजे थोडक्यात झाडाखालची जागा. जर्नालिझम डिपार्टमेंटच्या मागे अगदी साधं असं हे कँटीन आहे. पत्रे लावून तिथे किचन आणि लाकडाची बुटकी बाकं टाकून बसण्यासाठी जागा केली आहे. कँटीनची ना इमारत ना स्वतंत्र खोली. झाडाखाली चार प्लॅस्टिकच्या खुच्र्या आणि जुनी-पुराणी बाकडी तेवढी टाकलेली. तरीही हे कँटीन लोकप्रिय का? सामाजिक-सांस्कृतिक-राजकीय-आíथक-साहित्यिक-वैचारिक आणि वैश्विक चर्चाचं अनोखं केंद्रच इथे आहे अस म्हटलं तर वावगं ठरणार नाही. रानडेचं कँटीन ही जागा अशा गप्पांना, चर्चाना, वादाला अगदी आयडियल जागा. जुन्या मित्रांचा ग्रुप इथे बसून गप्पा मारतो, पत्रकार इथे हमखास सापडतातच. लायब्ररीतले स्कॉलर विद्यार्थी चहा प्यायला, जरा विश्रांती घ्यायलाही इथंच येतात.
इथला चहा आणि मॅगी विशेष लोकप्रिय आहे. बऱ्यापकी लिमिटेड पदार्थ असूनही भरपूर लोकांची फेव्हरेट कॉम्बिनेशन्स इथे पाहायला मिळतात. चहा-पोहे, चहा-मॅगी, चहा-बिस्किटं, चहा- समोसा, चहा-क्रीमरोल, चहा-नानकेट या कॉम्बिनेशन्सचे नियमित आणि मोठमोठ्ठे फॅन क्लब आहेत! केसरी उकाला नावाचं वेगळंच पेय इथे मिळायचं. अगदी रोज रोज-तेच तेच पदार्थ आवडीने खाणारे लोकही इथे आहेत. फक्त युनिव्हर्सटिीतली मुलंच नाहीत तर प्रोफेसर्स, वेगवेगळ्या कॉलेजचे स्टुडन्ट्स, पासआऊट स्टुडन्ट्स, आजूबाजूला राहणारे किंवा मग नाव ऐकून आलेले अशा एक ना अनेक नात्यांनी ‘रानडे’शी परिणामी कँटीनशी बांधले गेलेले लोक इथे आवर्जून येतात. एफ.सी. रोडसारख्या रहदारीच्या आणि गोंगाटाच्या ठिकाणी असूनही या कँटीनने स्वत:चा आणि लोकांच्या मनाचा शांत कोपरा जपलाय! आजूबाजूला असलेली हिरवी झाडी आणि इन्स्टिटय़ूटची दगडी इमारत या वातावरणात अगदी एकटय़ाने जरी चहा प्यायला तरी खूप छान आणि मस्त वाटायला लागतं. मुख्य म्हणजे बाहेरच्या लोकांना इथे सहज एन्ट्री आणि पाìकग फॅसिलिटी आहे. (खरं तर ऑफिशिअली बाहेरच्या व्यक्तींना इथे गाडी लावण्याची परवानगी नाही.) कँटीनमधले बाकं कायम लोकांनी गजबजलेले असतात आणि तुम्ही ग्रुपसोबत गेलात व तुम्हाला टेबलासकट जागा बसायला मिळाली तर तुमच्यासारखे भाग्यवान तुम्हीच!
    पत्रकारिता करणाऱ्या अनेक तरुणांचे युक्तिवाद आणि गप्पांचा अखंड ओघ याचं हे कँटीन साक्षीदार आहे. इथे बसून अनेक गप्पांच्या मफिली रंगल्यात आणि भान हरपून तावातावाने आपली मतं समोरच्याला पटवून दिली गेलीयेत. फॉरेन लँग्वेज डिपार्टमेंटला भेट देणाऱ्या फॉरेनर्सनाही हक्काने चहा पाजलाय या कॅँटीनने. तसंच तासन्तास लायब्ररीत बसून अभ्यास करणाऱ्यांचा ताणही इथल्या चहाने हलका केलाय. तुम्ही एकटे जरी तिथे गेलात तरी आजूबाजूला चालणाऱ्या अफाट विषयांवरच्या चर्चा तुम्हाला ऐकू येतात आणि पोटाच्या भुकेसोबतच, वैचारिक भूकही आपसूकच भागवली जाते. अनेक व्यक्तिमत्त्वांचा महानतेचा प्रवास या कँटीनने अनुभवलाय. सुधीर गाडगीळांसारखी दिग्गज मंडळी आजही इथे चहाची चव चाखण्यासाठी येतात आणि जुन्या आठवणींना उजाळा देतात. कँटीनची जागा, पाìकगची सोय, प्रेमळ रमेश काका, शांतता, मस्त चहा अशा एक ना अनेक गोष्टींमुळे हा कट्टा अनेकांच्या पसंतीला उतरलेला आहे.
एफसी रोडवरून जात असाल तर रानडे कँटीनमध्ये चहा प्यायला थांबावंसंच वाटतं ते तिथल्या वातावरणामुळं! शेवटी अशा छोटय़ा-छोटय़ा स्रोतांतूनच आपल्याला जगण्यासाठी ऊर्जा मिळत असते ना!