tradition of making forts in diwali conservation of forts fort building competition zws 70 | Loksatta

रचू या इतिहास

पुण्यातील सेवा मित्रमंडळ व शिवसूर्य प्रतिष्ठान यांच्या वतीने दरवर्षी शुक्रवार पेठेतील मित्रमंडळ चौकामध्ये नेत्रदीपक किल्ला तयार केला जातो.

रचू या इतिहास
(संग्रहित छायाचित्र)

मितेश रतिश जोशी

दिवाळीतील किल्ले बनवण्याची परंपरा ही आपल्या पूर्वजांनी आपल्या गौरवशाली इतिहासाच्या जवळ जाण्यासाठी निर्माण केलेली एक संधी आहे. किल्ले बनवणं ही लहान मुलांसाठी आनंदाची आणि पाठय़पुस्तकातील इतिहासाच्या जवळ नेणारी गोष्ट. मात्र गेल्या काही वर्षांत गड-किल्ले संवर्धनासाठी प्रत्यक्ष झटणाऱ्या तरुणाईनेही यात रस घेतलेला दिसतो. लहान मुलांबरोबर समरसून गड-किल्ले बनवणं, स्पर्धा आयोजित करणं यातून ही परंपरा पुढे नेण्याचं काम तरुणाई करते आहे..

दिवाळी आणि फराळ, दिवाळी आणि रांगोळी, दिवाळी आणि अभ्यंगस्नान, दिवाळी आणि फटाके ही व अशी अनेक नाती दिवाळीने स्वत:शी जोडून घेतली आहेत. आणखी एक अतूट आणि मधल्या काही काळात दुर्लक्षित झालेलं नातं आहे ते दिवाळी आणि किल्ल्यांचं. दिवाळीच्या सुट्टीत किल्ले बनवणं हा मुलांचा पिढय़ानपिढय़ा सुरू असलेला उद्योग.. दिवाळीची सुट्टी सदुपयोगी ठरावी आणि या गड-किल्ले बनवण्यातून पाठय़पुस्तकापलीकडे जात इतिहासाची ओळख मुलांना करून द्यावी या हेतूने असेल कदाचित.. पण दिवाळीच्या सुट्टीत मुलांनी किल्ले बनवणं ही आता परंपरा झाली आहे जणू.. पूर्वी सुट्टीत मुलांना शहराजवळ असलेले मोजके गड-किल्ले दाखवले जायचे वा माहिती सांगितली जायची. तेव्हा मोबाइलसारखं व्यसन नसल्याने गोष्टीतून- धडय़ातून, मोठय़ा माणसांनी दिलेल्या माहितीतून ऐकलेल्या गड-किल्ल्यांची प्रतिकृती साकारण्याचा प्रयत्न मुलांकडून केला जायचा. ही परंपरा अजूनही सुरू आहे.

पुण्यातील सेवा मित्रमंडळ व शिवसूर्य प्रतिष्ठान यांच्या वतीने दरवर्षी शुक्रवार पेठेतील मित्रमंडळ चौकामध्ये नेत्रदीपक किल्ला तयार केला जातो. त्यांच्या किल्ल्याचे वैशिष्टय़ असे की, हे दरवर्षी दुर्मीळ किल्ला तयार करतात व त्याची माहिती मुलांपर्यंत पोहोचवतात. वसुबारसच्या दिवशी किल्ला बघण्यासाठी सर्वाना खुला केला जातो. दहा दिवसांच्या कालावधीत साधारण दहा ते पंधरा हजार पुणेकर मंडळाचा किल्ला बघण्यासाठी एकच गर्दी करतात. किल्ला बनवण्यासाठी नेमकी काय पूर्वतयारी केली जाते, याबद्दल सांगताना शिवसूर्य प्रतिष्ठानचा सुरेश तरलगट्टी हा युवक म्हणाला, ‘‘आम्ही जो किल्ला बनवणार आहोत त्या किल्ल्याला पहिल्यांदा गणेशोत्सवानंतर एकदा प्रत्यक्ष भेट देतो. तेथे जाऊन तिथल्या वास्तूचा अभ्यास करून त्याच्या नोट्स तयार करतो. अश्विन महिन्यातल्या संकष्टी चतुर्थीला माती व भूमीचे पूजन करून आम्ही किल्ला बनवायला सुरुवात करतो. किल्ला बनवणारे सर्व सवंगडी हे नोकरी करत असल्याने सगळे जण संध्याकाळी सातच्या सुमारास एकत्र येतात व त्यानंतर कामाला सुरुवात होते. आम्हाला किल्ला बनवताना दरवर्षी सर्वात पहिली अडचण येते ती म्हणजे वाहतूक कोंडीची. मुख्य चौकात किल्ला बनवत असल्यामुळे आम्हाला सर्वप्रथम पार्किंगचे व्यवस्थापन करावे लागते. त्यानंतर माती गोळा करावी लागते. नर्सरीमधून माती विकत घेऊन ती साफ करावी लागते. मातीतून बी आणि गवत काढून घेतलं नाही तर किल्ल्यावर गवत उगवण्याची भीती असते. माती साफ करून ती तुडवण्याची जबाबदारी आमच्या मंडळातील बच्चे कंपनीवर असते. मुलंसुद्धा आनंदाने यात सहभागी होतात. यंदा पुण्यात ऐन दिवाळीच्या आधी पावसाने धुमाकूळ घातल्याने आमचे तीन दिवस वाया गेले. पुण्यात अनेकांनी ढगफुटीसदृश पावसामुळे यंदा किल्ले बनवले नाहीत, तर काहींनी उशिरा बनवले’’, असे सुरेश सांगतो. त्यांच्या मंडळाने या वेळी ज्या गडावर शिवरायांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले. जिथे त्यांचे बालपण गेले असा शहाजीराजे यांच्या कर्तृत्वाची शान अंगाखांद्यावर मिरवणारा, परंतु काळाच्या प्रवाहात दुर्लक्षित राहिलेल्या अशा पेमगिरी गडाची प्रतिकृती उभारली.

मुंबईत दोन प्रकारे किल्ले बनवले जातात. पहिला प्रकार म्हणजे दगड, विटा, माती गोळा करून त्यापासून किल्ला तयार केला जातो, तर दुसरा बाजारातून लाकडी किंवा प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा तयार किल्ला विकत आणायचा. ज्यांना जागेची, वेळेची आणि मुख्य म्हणजे किल्ल्यासाठी लागणाऱ्या दगड-मातीची अडचण आहे, त्यांच्यासाठी दुसरा प्रकार सोयीचा पडतो. पण ज्या उद्देशाने दिवाळीत किल्ला बनवण्याची परंपरा सुरू झाली, मुलांना इतिहास- गडकोटांची जवळून ओळख व्हावी तो हेतू या तयार किल्ल्यात खऱ्या अर्थाने साध्य होताना दिसत नाही. मग यासाठी सोसायटय़ा, स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घेणे गरजेचे असते. डोंबिवलीतील अरुण निवास मित्रमंडळाने अशाच प्रकारे पुढाकार घेत यंदा पन्हाळगड आणि विशाळगड हे दोन किल्ले आणि त्याचबरोबर पावनिखडीतला थरार सादर केला आहे. या मंडळातील तरुण तुर्क आपापली नोकरी सांभाळून किल्ला बनवायला वेळ देतात. किल्ला बनवण्यासाठी जशी दगड-मातीची गरज असते तशीच पैशांचीही असते. किल्ले बनवण्यासाठी व इतर गोष्टींसाठी लागणारा पैसा हा कुठून जमा केला जातो याविषयी बोलताना, या मंडळातील निखिल सावंत हा युवक सांगतो, आम्ही दरवर्षी किल्ला बनवतो व स्पर्धेत भाग घेतो. स्पर्धेत जिंकल्यावर मिळणारी पारितोषिकाची रक्कम आम्ही यासाठी वापरतो. पैसे कमी पडले तर आम्ही नोकरी करणारे तरुण वर्गणी काढतो. मुख्य पैसे लागतात ते लाइटसाठी, मावळय़ांच्या खरेदीसाठी आणि इतर छोटय़ा-मोठय़ा खरेदीसाठी. यंदाच्या वर्षी दोन किल्ले व खिंड बनवल्यामुळे आम्हाला जास्त मावळे लागले. मातीच्या या मावळय़ांमध्ये महाराज, योद्धे, तोफा, शेतकरी, कातकरी विपुल प्रमाणात कुंभारवाडय़ात मिळतात. मुघल सैनिक तेवढे मिळत नाहीत. त्यामुळे आम्ही अगोदर जाऊन ते सैनिक विशेष बनवून घेतले.         

बदलापूरमधील आपटेवाडी येथील भागीरथी विश्व मित्रमंडळ हा कॉलेज तथा नोकऱ्या सांभाळून किल्ले तयार करणाऱ्या तरुणांचा चमू आहे. किल्ला तयार करताना नेमकी कोणती आव्हानं येतात, याबद्दल मंडळाचा सदस्य प्रथमेश शिर्के सांगतो, गड-किल्ले बनवताना नियोजन सर्वात महत्त्वाचं असतं. आम्ही दसऱ्याच्या दिवशी महाराजांच्या प्रतिमेचे व भूमीचे पूजन करून किल्ला बनवण्याची नांदी करतो. रोज किती काम करायचे आहे व ते कोणी करायचे आहे याचे नियोजन ठरलेले असते, पण हे सर्व नियोजन यंदाच्या वर्षी पावसामुळे बारगळले. या वर्षी सर्वात मोठं आव्हान पावसाचं होतं. आम्ही सगळे नोकरी करत असल्याने रात्री दहानंतर किल्ला बनवायला सुरुवात करतो. यंदा आम्ही सुवर्णदुर्ग किल्ला तयार केला असून या किल्ल्यासाठी वॉटरप्रूफिंग करताना जमीन ओली असलेली चालत नाही. आम्ही जेव्हा कामाला सुरुवात करायचो तेव्हाच पाऊस धो धो कोसळायचा. त्यात नवरात्रीनंतर मुंबई व उपनगरांत मोठय़ा प्रमाणात डोळय़ांची व आजाराची साथ पसरल्यामुळे आमच्या मंडळातील अनेक जण आजारी पडले. त्यामुळे रोज काही तरी काम अर्धवट राहायचे. बऱ्याच तरुणांनी दिवाळी तोंडाशी आल्याने नोकरीतून तीन-चार दिवस सुट्टी काढून रात्रभर जागरण करून किल्ला पूर्ण केल्याचे प्रथमेशने नमूद केले. त्यांच्या मंडळाचा किल्ला हा नेत्रसुखद अनुभव असतो. म्हणूनच त्यांच्या अभिप्रायाच्या वहीत आम्हाला सर्व दादांनी किल्ला बनवायला शिकवा अशी लहान मुलांनी हट्टवजा मागणी केली आहे. त्यामुळे पुढच्या वर्षी गणपतीनंतर किल्ला बनवण्याचे शिबीर आयोजित करण्याचा मंडळाचा मानस असल्याचे प्रथमेशने सांगितले.        

एकत्र येत किल्ला बनवण्याची मजाच काही और असते. पण दगड-मातीचा किल्ला न बांधता, आपल्या घरात काही वेगळे घटक वापरून किल्ले बनवण्याचा प्रयत्न मयूर शेलार हा तरुण करतो आहे. वाडय़ाला राहणारा मयूर लहानपणापासून दगड-मातीचे किल्ले तयार करायचा. पहिल्या दिवशी मुलांची होणारी गर्दी काम दिल्यावर हळूहळू ओसरू लागायची. मुलांचा निरुत्साह बघून मयूरने दोन वर्षांपूर्वी कागदाच्या लगद्यापासून प्रतापगड आणि गेल्या वर्षी सिंहगड हुबेहूब तयार केले. दगडाऐवजी कागदाचे गोळे आणि मातीऐवजी कागदाचा लगदा वापरून केलेले हे किल्ले सर्वाच्याच पसंतीस उतरले. या वर्षी मयूरने शनिवारवाडय़ाची निवड केली. मयूर सांगतो, आपल्याकडे भुईकोट (सपाटीवरील किल्ला), जलदुर्ग (पाण्यातील किल्ला) आणि गिरिदुर्ग (डोंगरावरील किल्ला) असे किल्ल्याचे तीन प्रकार दिसतात. यामध्ये दिवाळीत अनेक जण डोंगरी किल्ले तयार करतात. क्वचित जलदुर्गाकडे वळतात. भुईकोट प्रकार फारसा हाताळला जात नाही. याच विचारातून मी शनिवारवाडय़ाची निवड केली. प्रत्यक्ष भेट देऊन तेथील वास्तुरचनेचा अभ्यास मी केला. शनिवारवाडय़ाच्या भिंती मी शाडू मातीपासून तर वाडय़ाच्या इमारती पुठ्ठय़ापासून तयार केल्या. काम सांभाळून हौस म्हणून हा किल्ला तयार करत असल्यामुळे भाऊबिजेला माझा किल्ला तयार झाला. मी तयार करत असलेला हा मिनिएचर किल्ला असून ही पुढे काळाची गरज आहे, असे तो सांगतो. माझा किल्ला दगड-मातीचा नसल्यामुळे मी किल्ले स्पर्धेत भाग घेऊ शकलो नाही. शहरी भागात किल्ला स्पर्धा आयोजन करणाऱ्यांनी पुढे अशा पद्धतीचे किल्ले बनवण्यासाठी मुलांना प्रोत्साहित करायला हवे. दगड-मातीचे किल्ले बनविण्याचे आवड नसणाऱ्या मुलांकडून अशा सोप्या पद्धतीचे किल्ले बनवून घेतल्यामुळे इतिहासाची उजळणी, चित्रकला- हस्तकलेचा सराव, भूगोलाचा अभ्यासदेखील होईल, असे तो स्पष्ट करतो.     

महाराष्ट्राला गड-किल्ल्यांची समृद्ध परंपरा आहे. ही परंपरा भावी पिढीपर्यंत पोहोचावी या उद्देशाने किल्ल्यांची माहिती मुलांना देणं, त्यांनी किल्लेसफारीत सहभागी करून घेणं अशापध्दतीचे उपक्रम आयोजित करण्याची गरज असते. त्यामुळे दिवाळीच्या सुट्टीत किल्ला करणं हा त्यातील अत्यंत महत्वाचा भाग मानला जातो. दिवाळीचा किल्ला म्हणजे नुसता मातीचा डोंगर नाही. सगळय़ा कुटुंबाला, मित्रपरिवाराला किंबहुना त्यापेक्षाही पुढे जाऊन मराठी संस्कृतीला अभेद्य ठेवणारा असा चिरेबंदी आणि चिरंजीवी तट आहे. आणि तो जपण्याचा तरुणाई मनापासून प्रयत्न करते आहे.

viva@expressindia.com

मराठीतील सर्व व्हिवा ( Viva ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-11-2022 at 05:59 IST
Next Story
मन:स्पंदने : जनरेशन गॅपचा ताप