दरवर्षी ५ नोव्हेंबर हा दिवस ‘मराठी रंगभूमी दिन’ म्हणून साजरा केला जातो. मराठी रंगभूमीवर आजही प्रायोगिक नाटक मोठ्या संख्येने होतं. त्यातून नाटकातली तरुण पिढी तयार होत जाते. गेल्या काही वर्षांत या प्रायोगिक रंगभूमीने स्वत:चा असा प्रेक्षकवर्ग तयार केला आहे. ‘मराठी रंगभूमी दिना’च्या निमित्ताने प्रायोगिक रंगभूमीची वाटचाल समजून घेण्याचा हा प्रयत्न..

प्रायोगिक रंगभूमी हा शब्दप्रयोग नेमका कुठून आला हे शोधणे जरी थोडे अवघड असले, तरी १९६० च्या दरम्यान ज्येष्ठ नाटककार विजया मेहता, विजय तेंडुलकर, श्रीराम लागू, महेश एलकुंचवार, सतीश आळेकर अरविंद देशपांडे अशा दिग्गजांनी, नामांकित नाट्यसंस्थांची निर्मिती केली ज्यातून अजरामर कलाकृती निर्माण झाल्या आणि तरुण पिढीची अख्खी फळी तयार होत गेली, आजही होत आहे.

यशापयशाचा फारसा विचार न करता त्यांनी एकांकिका आणि नाटकांचे प्रयोग सुरू केले. त्यापूर्वीही अनेक नाटक आणि प्रयोग होत होतेच, परंतु या माध्यमाच्या कक्षा थोड्या व्यापक होत गेल्या ते १९६० नंतरच. रंगायन, कलोपासक, पीडीए, छबिलदास, अविष्कार, इंडियन नॅशनल थिएटर, थिएटर अॅकेडमी अशा अनेक संस्था तेव्हा महाराष्ट्राच्या मातीत रुजू पाहत होत्या. या नाट्यसंस्थांच्या निर्मात्यांनी नव्या धाटणीची अभिव्यक्ती प्रस्थापित केली आणि नाटक या माध्यमाला नवा आशय दिला. या रंगकर्मींनी नवं, ताजं आणि प्रस्थापित कलाकृतींपेक्षा रंगभूमीला छेद देणारा आशय दिला आणि त्यातून प्रायोगिक रंगभूमीचा जन्म झाला.

विशेष म्हणजे या दिग्गज कलावंतांनी सुरू केलेली प्रायोगिक दिंडी आजही तरुण पिढी अगदी उत्साहाने आणि अभिमानाने आपल्या खांद्यांवर पुढे नेते आहे. ‘कलादर्शन पुणे’ याचे संस्थापक आणि नाट्य दिग्दर्शक विनोद रत्ना सांगतात, ‘आपल्या मराठी नाटकात इतकी ताकद आहे की प्रायोगिक नाटकसुद्धा उदंड प्रतिसादात सुरू आहेत. मुळातच प्रायोगिक नाटक म्हणजे थोडं वेगळ्या धाटणीचं, रोजच्या विषयांपेक्षा वेगळा काहीतरी विषय किंवा वेगळ्या पद्धतीने मांडणीचा केलेला प्रयोग, जो लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे.

या नाटकाची प्रोसेस व्यावसायिक नाटकापेक्षा थोडी वेगळी असते किंबहुना दिग्दर्शक आणि कलाकार ती वेगळी करतात. आम्ही आमच्या नाटकांमध्ये थोडे बदल केले जे लोकांना आवडले आणि आम्हाला चांगला प्रतिसाद मिळाला. आम्ही आमच्या नाटकात पुष्पवृष्टी केली, स्टेजवर गाड्या आणल्या आणि सगळ्यात महत्त्वाचा बदल म्हणजे एरवी प्रायोगिकला ज्या जागा मिळतात त्यापेक्षा मोठ्या थिएटरमध्ये प्रयोग लावला. प्रायोगिक नाटकात एक गोष्ट खूप प्रामुख्याने जाणवते ते म्हणजे तुमचा विषय जर ताकदीचा असेल तर लोक नक्की तुमची कलाकृती बघायला येतील’.

‘प्रायोगिक हा घटक सगळ्यालाच लागू आहे; विषय, लेखन, रंगमंच, प्रॉपर्टी, सादरीकरण सगळ्याच अंगाने प्रायोगिक असू शकतं’, असं ‘उच्छाद’ नाटकाचे लेखक निरंजन पेडणेकर सांगतात. ‘उच्छाद’चं सादरीकरण वेगळं आहे. प्रेक्षकांच्या समोर नाही तर दोन्ही बाजूने नाटक सुरू असतं, ते तशा पद्धतीने प्रेक्षकांना बघावं लागतं. याआधी ‘एक्झाइल’ नावाचं नाटक केलं होतं, जे पॅलेस्टिनी कवी महमूद दरविश यांच्या कवितांवर आधारित होतं. मी या नाटकासाठी कार वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या उतार असलेल्या फ्लॅट-बेड ट्रकचा वापर केला होता. त्यावर बसमधील प्रवासी बसलेले दाखवले होते आणि त्या ट्रकचा उतार म्हणजे जणू कवीच्या कल्पनाशक्तीकडे जाणारा मार्ग होता. येत्या २ नोव्हेंबरला ‘अंकुश अनचेन्ड’ हे सोलो नाटक येतंय. घटस्फोटित आणि नोकरीत पदावनती झालेला रंजन नावाचा एक पुरुष ऑनलाइन जगतात आधार शोधतो, पण तिथे त्याची ओळख अंकुश नावाच्या एका पुरुष हक्क कार्यकर्त्याच्या स्त्रीद्वेषी विचारसरणीशी होते. या विनोदी एकपात्री नाटकात रंजनचा या विषारी विचारांच्या गर्तेत सापडण्यापर्यंतचा प्रवास कसा होतो, हे दाखवलं असल्याचं त्यांनी सांगितलं. ‘प्रायोगिक नाटक हे पूर्णपणे माऊथ पब्लिसिटीवर चालतं. तरुणांचा उत्साह आणि इच्छाशक्ती आणि मेहनतीमुळे प्रायोगिकचे प्रयोग रंगतात. आम्ही तर पार्किंगच्या जागेत केलेल्या नाटकालाही चांगला प्रतिसाद मिळाला होता, असंही निरंजन यांनी सांगितलं.

लोकप्रिय नाट्य आणि सिनेअभिनेत्री विभावरी देशपांडेच्या मते सगळ्याच अर्थाने प्रयोगशील असलेल्या कलाकृतीला प्रायोगिक नाटक म्हणतात. ‘प्रायोगिक नाटक बसवण्याची प्रत्येक दिग्दर्शकाची प्रोसेस वेगवेगळी असू शकते. काही दिग्दर्शक, सिद्ध असलेली संहिता हाती घेतात तेव्हा याबद्दलचं थोडं संशोधन, त्यांचं वाचन, तालीम अशा प्रोसेसमध्ये ठरलेल्या गोष्टी होतात. कधी कधी जुनी संहिता, वेगळ्या पद्धतीने सादर केली जाते, त्याचं रूपांतर होतं; आम्ही नाटक बसवतो तेव्हा बरेचदा आमच्याकडे संहिता नसतेच, प्रोसेसमध्ये जे लोक आहेत त्यांच्याशी बोलून, त्यांचं थोडाफार इम्प्रोव्हायझेशन करून आम्हाला कधी कधी व्यक्तिरेखा सापडतात, तालमीतच नाटक लिहिलं जातं; ‘जॉयराइड’ नावाचं जर्मन नाटक आम्ही केलं तेव्हा ते पूर्णपणे नव्या पद्धतीने आम्ही सादर केलं. त्याचं लेखन, सादरीकरण सगळंच प्रयोगशील पद्धतीने केलं.

२०२६ मध्ये ग्रिप्सला ४० वर्षं पूर्ण होतील, या कालावधीत ग्रिप्सचे प्रयोगही खूप बदलले. अगदी पूर्वी स्थापना झाली तेव्हा श्रीरंग गोडबोले यांनी मूळ जर्मन २-३ नाटकं होती, त्याचं मराठी रूपांतर केलं, आता पूर्णपणे नवीन संहिता लिहिल्या जातात. आशय, विषय, सादरीकरण सगळंच नवनिर्मित आणि प्रयोगशील पद्धतीने होतं. विशेषत: लहान मुलांसाठी नाटक करताना ते जास्त गांभीर्याने करावा लागतं हे नक्कीच जाणवत असल्याचं विभावरीने सांगितलं.

पुण्यात प्रायोगिक रंगभूमीची चळवळ मोठ्या प्रमाणात दिसून येते, कारण आता येथे नवनवीन थिएटर्स आणि प्रयोगांसाठी योग्य अशा जागा उपलब्ध झाल्या आहेत. अनेक तरुण नाट्यकर्मी स्वत:च्या संस्था स्थापन करून प्रायोगिक नाटकांची परंपरा पुढे नेत आहेत. विनोद रत्ना यांचे ‘कलादर्शन’, अलोक राजवाडे आणि अनुपम बर्वे यांचा ‘राखाडी स्टुडिओ’सारख्या संस्थांप्रमाणेच सुदर्शन रंगमंच, डॉ. श्रीराम लागू रंगावकाश, ज्योत्स्ना भोळे सभागृह, पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्राचा ‘अंगणमंच’, भरत नाट्य मंदिर आणि नव्याने सुरू झालेले ‘द बॉक्स’ यांसारख्या मंचांवरही एकाच वेळी अनेक प्रायोगिक नाट्यकृती सादर होत असतात.

मुंबईतही अंधेरीतील ‘रंगशाला’, ‘पृथ्वी थिएटर’, नव्याने सुरू झालेली ‘एनएमएसीसी’मधील दोन लहान थिएटर्स, तसेच ‘अविष्कार’सारख्या संस्था काही शाळांमधून प्रायोगिक नाटके सातत्याने सुरू ठेवत आहेत.

तरुणांच्या सहभागाबद्दल विभावरी सांगते, ‘तरुण मुलं या क्षेत्रात प्रचंड सक्रिय आहेत. पुण्यात याचा प्रभाव जास्त जाणवतो कारण इथे खूप जागा झाल्या आहेत जिथे अतिशय प्रभावी आणि नवीन प्रयोग नाटकात होत असतात. आत्ताच्या तरुण पिढीसाठी दृक-श्राव्य माध्यम जास्त परिचयाचं असल्याने त्यांचे प्रयोग त्या पद्धतीचे असतात, हा बदलसुद्धा खूप नैसर्गिक पद्धतीने झाला आहे, त्यांचे प्रयत्न, कष्ट आणि नवीन काहीतरी करून बघण्याचा उत्साह खूपच आश्वासक वाटतो’. तर प्रायोगिक नाटकांमध्ये तरुण अधिक कार्यरत असले तरी त्यातून जास्त अर्थार्जन होत नाही, या वास्तवाकडे निरंजन यांनी लक्ष वेधलं. सध्या मुलांकडे अनेक पर्याय उपलब्ध आहेत, जे ते अजमावून बघतात, पण प्रायोगिक नाटकांत काम करण्याचा या मुलांचा उत्साह दांडगा असल्याचंही त्यांनी सांगितलं.

प्रायोगिक रंगभूमीला सध्या सोशल मीडिया हे प्रसिद्धीसाठी उत्तम माध्यम उपलब्ध झालं आहे. प्रायोगिकचा प्रेक्षकवर्गही थोडा व्यापक विचारशक्तीचा असतो. समोर जे चाललं आहे ते समजून घेऊन पाहणारा प्रेक्षक असावा लागतो, त्यामुळे अशा प्रेक्षकांचा प्रतिसाद, आर्थिक बांधणी, आर्थिक पाठबळ अशी काही आव्हानं प्रायोगिक रंगभूमीची पाठ धरून आहेत. याबद्दल बोलताना, प्रायोगिक रंगभूमीचं प्राधान्य अर्थार्जन नसलं तरीही आर्थिक गणितं चांगल्या पद्धतीने बांधणं अत्यावश्यक असतं. नाटकात काम करणारे कलाकार समोर स्टेजवर दिसतात, त्यामुळे पैसे नाही मिळाले तरी त्यांना एक समाधान लगेच मिळतं; परंतु बॅकस्टेजच्या लोकांना आपल्या कामाची काहीतरी पोचपावती मिळणं गरजेचं आहे. मुलं खूप कष्ट करून, कधी कधी लांबून प्रवास करून अगदी उत्साहाने प्रायोगिक नाटकात काम करतात, निदान त्यांना पेट्रोलचा, प्रवासाचा खर्च तरी मिळावा; प्रेक्षकांनी (तिकीटदर आणि प्रतिसादाच्या बाबतीत) आणि निर्मात्यांनीसुद्धा हा आर्थिक गणिताचा मुद्दा विचारात घ्यायला हवा, असं मत विभावरीने व्यक्त केलं.

याला निरंजननेही दुजोरा देताना प्रायोगिकमध्ये प्रयोग चालू राहणं महत्त्वाचं असलं तरी फक्त १०- १५ लोकांत ते करता येत नाहीत, हे स्पष्ट केलं. प्रयोगातून नफा होणं अपेक्षित नसतंच, पण किमान प्रयोग लावता येईल अशी प्रेक्षक संख्या आणि तेवढे प्रयोग होणं हे आव्हानात्मक असल्याचं सांगितलं.

गेली दहा वर्षं प्रायोगिक नाटक करणाऱ्या विनोद रत्नाच्या मते, ‘आर्थिक पाठबळ हा चिंताजनक मुद्दा आहे, पण सध्या एकांकिका स्पर्धा बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणात होतात, त्यांच्या बक्षिसांच्या रकमाही चांगल्या असतात आणि त्याचे परीक्षकही मोठे कलाकार असतात. चांगल्या एकांकिकांना, चांगलं व्यासपीठ मिळतं आणि चांगला निर्माताही मिळतो. पण ही प्रक्रिया तशी हळूहळू होणारी असते, शिवाय नुसतं स्पर्धेत असून उपयोग नाही, जिंकणंही महत्त्वाचं आहे’.

सतत न थकता, कष्ट करून आनंदाने नाटक करणाऱ्यांची मराठी रंगभूमी आहे. अतुलनीय नाट्यपंरपरा लाभलेल्या या रंगभूमीवर अतुल पेठे, मोहित टाकळकर यांच्या बरोबरीने नव्या पिढीचे अलोक राजवाडे, अनुपम बर्वे, सूरज पारसनीस, निरंजन पेडणेकर, विनोद रत्ना, अजित साबळे ही सगळी मंडळी सातत्याने नवनवीन प्रयोग करत आहेत. मराठी रंगभूमी म्हणजे केवळ मंचावरच्या प्रयोगांचा प्रवास नाही, तर तो विचारांचा, दृष्टिकोनांचा आणि सामाजिक जबाबदारीचा शोध आहे. बदलत्या काळातही प्रश्न विचारण्याची, जाणिवा जागृत करण्याची आणि प्रेक्षकांशी जिवंत संवाद साधण्याची मराठी रंगभूमीची ताकद नव्या रंगकर्मींनीही तितक्याच सचोटीने जपली आहे.

viva@expressindia.com