एक कर्तबगार प्रशासकीय अधिकारी तर दुसरी देशाच्या संरक्षणासाठी सज्ज नौदलातील कर्तव्यदक्ष अधिकारी. एकीने आपल्या धडाडीच्या निर्णयक्षमतेने मुंबईतील मोठा प्रकल्प मार्गी लावलेला तर दुसरीने नौदलासारख्या तुलनेने अपरिचित क्षेत्रात ठसा उमटवलेला. आयएएस अधिकारी अश्विनी भिडे आणि नौदल अधिकारी कमांडर सोनल द्रविड या दोघींना भेटण्याची, त्यांच्या कारकीर्दीचा प्रवास त्यांच्याच तोंडून ऐकण्याची संधी पंचवीसाव्या ‘व्हिवा लाउंज’मधून मिळणार आहे.
नेव्हल अधिकारी कमांडर सोनल द्रविड भारतीय नौदलाच्या शैक्षणिक विभागात कार्यरत आहेत. सध्या त्या वेस्टर्न नेव्हल कमांडमध्ये सीनिअर स्टाफ ऑफिसरची जबाबदारी सांभाळत आहेत. गेली १५ वर्षे नौदलात अधिकारपदावर त्यांनी काम केलंय. संरक्षण दलाची कौटुंबिक पाश्र्वभूमी नसताना, कॉम्प्युटर सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतरही सोनल यांनी नौदलात जाण्याचं आपलं स्वप्न पूर्ण केलं. कमांडर सोनल स्काय डायव्हिंगही करतात. व्हाइट वॉटर राफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये संरक्षण दलाचं प्रतिनिधित्व करताना त्यांनी सुवर्णपदक पटकावलंय. नौदलाच्या व्हाइट युनिफॉर्मचं आकर्षण अनेकांना असतं. पण त्यासाठी कशा पद्धतीचं, किती शिस्तीचं प्रशिक्षण पूर्ण करावं लागतं, त्यासाठी काय पूर्वतयारी आवश्यक आहे, नौदल अधिकाऱ्याचं आयुष्य कसं असतं या सगळ्याची माहिती त्यांच्याशी होणाऱ्या गप्पांमधून उलगडेल.
आयएएस अधिकारी अश्विनी भिडे सध्या मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक आहेत. जिल्हा परिषदेपासून ते मंत्रालयापर्यंत विविध विभागात अधिकारी म्हणून त्यांनी काम केलंय. मुंबई मेट्रोपोलिटन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (एमएमआरडीए) मध्ये कार्यरत असताना मुंबई मेट्रो, मोनो प्रकल्पांमधील महत्त्वाचे टप्पे त्यांच्या कारकीर्दीतच पूर्ण झाले. तडफदार, निर्भीड आणि जबाबदार अधिकारी म्हणून अश्विनी भिडे यांचा दबदबा आहे. यूपीएससीचं आव्हान, प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करताना येणारे अनुभव त्यांच्याशी होणाऱ्या गप्पांमधून उलगडतील.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘व्हिवा लाउंज’च्या माध्यमातून आतापर्यंत अनेक क्षेत्रांतील कर्तबगार स्त्रिया आपल्याला भेटल्या. या उपक्रमातील रौप्यमहोत्सवी कार्यक्रमात या दोन कर्तबगार अधिकाऱ्यांना भेटता येणार आहे.

कधी : मंगळवार, २८ जुलै २०१५

वेळ : संध्याकाळी ५.००

स्थळ : यशवंत नाटय़ मंदिर, माटुंगा, मुंबई.

प्रवेश : विनामूल्य.

प्रथम येणाऱ्यास प्राधान्य. काही जागा राखीव

 

मराठीतील सर्व व्हिवा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viva lounge ashwini bhide and commander sonal dravid
First published on: 24-07-2015 at 09:22 IST