या वेळी मी पहिल्यांदाच मतदान करणार आहे. सध्या आम्ही सगळीकडे प्रचाराचा धुरळा उडालेला पाहतोय. पण पक्षाकडे बघून व्होट करण्यापेक्षा आम्ही सर्व युवक विकासाकडे पाहून मत देणार आहोत. सध्याच्या प्रचाराचा त्यामुळे आमच्यावर तसा कोणताही प्रभाव नाही. आमच्यावर या कशाचाच परिणाम होणार नाही. एक सक्षम नागरिक या नात्यानं मी सजगपणे मत देण्यास सज्ज आहे.

शंभर टक्के मतदानाचा निर्धार करू या!
‘व्हिवा’च्या ४ एप्रिलच्या अंकात नवमतदारांच्या भावना व्यक्त झाल्या. सध्याच्या परिस्थितीत राजकारण्यांविषयी लोकांच्या मनात प्रचंड राग आहे. नवमतदार नाही तर आपल्या सर्वानाच पडणारा प्रश्न आहे ‘मतदान का करावे?’ खरेतर निष्क्रिय, भ्रष्टाचारी व गुन्हेगार लोकप्रतिनिधींना मतदानाच्या मार्गाने विरोध करून त्यांची राजकीय मक्तेदारी संपवण्याची आपल्याला चांगली संधी असते. मात्र आपण या संधीचा वापर न करता तक्रारच करण्यात समाधान मानतो. ‘मतदानाचा हक्क’ आहे बरोबर. पण या हक्काला कर्तव्यात बदलण्याची गरज आहे. अनेक लोकांनी मतदान न केल्यामुळे निवडून आलेले उमेदवार बहुमताने निवडून आला आहे का? हा प्रश्न आजवर अनुत्तरीतच आहे. भ्रष्टाचार, महागाई, महिला सुरक्षा, हे सारे प्रश्न देशाची दिशा ठरवणारे तरुण सोडवू शकतात. गरज आहे ती फक्त मतदानाचे कर्तव्य सजगपणे बजावण्याची!
 व्यवस्थेला बळी पडून बरेच तरुण गुन्हेगारीकडे वळत असतात. त्यांनी शासनाविषयी असलेला राग मतपेटीतून व्यक्त करावा. त्यांनी मतदान वाढवण्यासाठी ,व्यवस्था परिवर्तनासाठी प्रयत्न केला पाहिजे. यामुळे गुन्हेगारीचे प्रमाण कमी होऊ  शकते. जगातील सर्वात मोठी लोकशाही आणि जगातील सर्वात तरुण देश असे आपण गर्वाने सांगतो. मात्र आता प्रत्यक्ष कृती केली पाहिजे. मतदानाच्या माधमातून पुन्हा एकदा शांतीने क्रांती घडवूया आणि १००% मतदानाचा निर्धार करूया !
सौरभ नवारकर, नांदेड</strong>

@व्हिवा पोस्ट : व्हिवा पुरवणीतील सदरं कशी वाटतात, लेखातील विचार पटतात का, पुरवणी कशी वाटते, ते आम्हाला सांगा. त्याबरोबर या पुरवणीत आणखी काय वाचायला आवडेल तेही शेअर करा. आमच्या या मेल आयडीवर व्हिवा पोस्ट असं सब्जेक्ट लाइनमध्ये लिहून तुमच्या सजेशन्स पाठवा. viva.loksatta@gmail.com