जीजिविषा काळे

मनात दडलेल्या, ठसठसणाऱ्या-सुखावणाऱ्या अशा कित्येक गोष्टी ज्या खरं म्हणजे मोकळेपणाने कुणाशी तरी बोलणं, कुणाला तरी सांगणं ही युवामनांची गरज असते. मात्र अनेकदा अशा गोष्टी डायरीच्या पानांत नाही तर मित्रमैत्रिणींच्या कानात गोळा होतात. ‘मिलेनिअल’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या युवामनांच्या ‘मी’चा हाच बिनधास्त-बेधडक आवाज या सदरातून उमटणार आहे..

प्रिय वाचक मित्र,

कसे अणि कुठून सुरू करावे हे कळत नसल्याने शाळेत शिकवलेल्या पद्धतीने पत्रशैलीत संवाद सुरू करते आहे. राज्यभरात थंडीचा गारवा जाणवत असेल अशी आशा आहे.. मुंबईत आता कुठे थंडी जरा जाणवू लागली आहे. वार्षिक ग्रहण बघितले. चुकून का होईना.. बघितले.

तर, आता (मूळ मुद्दा) पत्र लिहिण्यास कारण की, आजकाल अनेक चर्चामधून अगदी सहजपणे ‘मिलेनिअल्स हे अणि मिलेनिअल्स ते’ अशी वाक्यं कानावर पडतात. भारताच्या ऑटो इंडस्ट्रीत आलेल्या मंदीचे कारण पण बघा हे मिलेनिअल्सच आहेत म्हणे (असं एक रिसर्च सांगतो – वाचाल तर वाचाल). तर कोण आहेत बुवा हे मिलेनिअल्स लोक? तर १९८१ ते १९९५ यादरम्यान जन्माला आलेल्या पिढीला दिलेले लाडाचे नाव म्हणजे मिलेनिअल्स. २०२० मध्ये ही पिढी वय २६ ते ३९ वर्षांची असेल. त्यानंतरची पिढी म्हणजे जेन झी (z). ही पिढी २०२० मध्ये साधारण वय वर्षे ४ ते २४ ची असेल. माझा जन्म १९९४ चा असल्याने बऱ्याचदा माझा संबंध या दोन्ही पिढय़ांशी येतोच.

मिलेनियल्सनी त्यांच्या आयुष्यात द्रुतगतीने बदल होताना बघितले आहेत. ही पिढी जन्माला आली तेव्हा घरोघरी टेलिफोन नव्हते. पण कालांतराने प्रत्येक घरी लँडलाइन्स आले, मग त्याचे कॉर्डलेस फोन झाले. एका जागी उभे राहून फोनवर बोलण्याचा कंटाळा असलेल्यांना हायसे वाटले. आई मावशीशी गप्पा मारत स्वयंपाक करू लागली. गप्पाच काय तर लाइव्ह रेसिपी शेअर होऊ  लागल्या. दादाला मैत्रिणीचे फोन आले हे त्याच्या फोन खोलीत घेऊन जाण्याने कळायचे. काळ गेला आणि फक्त शाळेत दिसणारे कॉम्प्युटर्स आता नेट कॅफेमध्ये दिसू लागले. तासाला १० रुपये हा हिशोब करून आम्ही कॅफेमध्येजाऊ  लागलो. १० वीचे बोर्डाचे रिझल्ट्स ‘ऑनलाइन’सुद्धा आमच्याच पिढीने बघितले. पहिला मोबाइल फोन कॉलेजमध्ये हातात मिळणारी ९३-९५ सालातीलच मुले म्हणता येतील. ‘एस’ टाइप करण्यासाठी चार वेळा एकच बटण दाबायला लागायचे. आता फोनला सांगितले की फोनच टाइप करतो. तर अशी ही पिढी सतत नवीन बदलांना सामोरी जाणारी आणि आत्मसात करणारी, सतत धावणारी, दमणारी, जॉबला चिकटून राहणे सोडून ‘करिअर’ करणारी. ‘जिंदगी में हर क्यूँ, व्हाय, कायको, का जवाब नहीं होता’ याच विचाराला क्यूँ.. व्हाय.. आणि कायको विचारणारी.. ही पिढी.

नुसत्या टेक्नोलॉजीचा आवाका लक्षात घेताना ज्या पिढीला एवढे बदल आत्मसात करायला लागले, त्या पिढीचे मानसिक आरोग्य दुर्लक्षित झाले. डिप्रेशन आणि एंक्झायटीचे प्रमाण या पिढीत जास्त बघायला मिळू लागले. आम्हाला जे मिळाले नाही ते आम्ही तुम्हाला देतोय, याचे पाढे आमच्या वरच्या पिढीने सतत गिरवले असल्याने आम्हाला ‘थँक यू’ म्हणण्यावाचून काही पर्याय उरत नसे. ही पिढी कशी परंपरा मोडणारी, मोठय़ांचा आदर न करणारी, असमाधानी असे आरोप नवीन करिअर वाटा बनवत असताना, घरच्यांसाठी हाऊसिंग लोन्स काढताना, प्रेमासाठी धर्म/ जात न बघताना या पिढीवर सततच होत आले आहेत. या सगळ्यात बाजूला राहिली ती संवादातील पारदर्शकता. अनेक विषय कधी आईवडिलांशी बोलायचे, कधी शिक्षकांशी बोलायचे राहून गेले. आपल्याला पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरं मग आम्ही इंटरनेटवर शोधत गेलो आणि तिथेच शोधत राहिलो. इतर जगाशी जोडले गेलो. या सगळ्यात मैत्रीचा हात द्यायला वरच्या पिढय़ा बऱ्याचदा तयार नसायच्या. त्यात त्यांना दोष देता येणार नाही, कारण त्यांना त्यांच्या आईवडिलांनी आणि त्यांच्या आईवडिलांना त्यांच्या.. असे अनेक पिढय़ांनी एकमेकांना जे सांगितले, शिकवले त्यावरच त्यांनी त्यांचे निर्णय घेतले.

मी सांगितल्याप्रमाणे, माझा जन्म १९९४ सालचा, त्यामुळे मी तसे बघायला गेले तर काठावर किंवा दोन्हीही पिढय़ांच्या मधोमध उभी आहे. ज्या गोष्टीतून तुम्ही जात आहात त्याच गोष्टीतून थोडय़ा फार फरकाने मी गेले असेन याची खात्री मला आहे. त्याचमुळे पुढील काही लेखांमधून आपल्या मनात दडलेल्या अशा विविध विषयांवर आपल्या गप्पा रंगणार आहेत. हे विषय माझ्या अनुभवातून, माझ्या आधीच्या, माझा नंतरच्या आणि माझ्या पिढीमधल्या लोकांशी केलेल्या अनेक विषयांवरच्या चर्चेतून आणि समजलेल्या गोष्टींतून असतील हे नक्की.

करिअर, सोशल प्रेशर, परंपरा, प्रेम, समकालीन विचारसरणी, मानसिक आरोग्य आणि अशा बऱ्याच गोष्टी ज्या तुमच्या-आमच्यातच आहेत. त्यावर बोलणारे हे लेख असतील. मला लिहिताना जितके हे विषय जवळचे आहेत, तसे ते वाचताना तुम्हालाही वाटतील आणि ‘रिलेट’ होतील. या पत्रात्मक शैलीतील लेखापासून आपला संवाद सुरू झाला आहे. तो असाच उत्तरोत्तर रंगत जाईल..

जाता जाता दोनच गोष्टी.. पाणी पीत राहा आणि पाणी पीत राहा.

कळावे,

तुमची जीजि

viva@expressindia.com