परंपरा आणि पर्यावरणाचा अतूट मेळ घालून गणपती उत्सवाचं स्वरूप अधिकाधिक व्यापक आणि इको-फ्रेंडली करण्याकडे आजच्या तरुणाईचा ओढा दिसतो. गणेशोत्सवाचं कमर्शिअल, धांगडधिंग्याचं स्वरूप न रुचणाराही मोठा तरुणवर्ग आहे. एकीकडे परंपरा आणि पर्यावरणाचा मेळ घालून उत्सव इको-फ्रेंडली करण्याकडे आजच्या तरुणाईचा ओढा दिसतो, तर दुसरीकडे ढोल-ताशांच्या गजरातली शिस्तबद्ध मिरवणूक सातासमुद्रापार थेट सिडनीपर्यंत पोहोचविण्याचं कार्य काही युवा पथकातील तरुण करताहेत.
शाडूच्या मूर्ती, इको-फ्रेंडली गणपती व विसर्जन इत्यादी गोष्टी गणपती येण्याच्या फक्त काही दिवसच अगोदर सतत कानावर पडत असतात; पण गणपती आगमनाच्या तब्बल ४- ५ महिने अगोदर इको-फ्रेंडली गणपती मूर्तीचे महत्त्व पटवून देण्याचं काम ‘मी मुलुंडकर’ प्रतिष्ठानातील तरुण करताहेत. संस्थेचा प्रतिनिधी निनाद वैशंपायन म्हणाला, ‘या वर्षी हळद-कुंकू अशी आमची थीम आहे. गणपतीच्या मूर्तीसाठी जे रंग वापरले जातात त्यात केमिकल्स असतात, म्हणून हळद-कुंकू या दोनच गोष्टींचा वापर आम्ही गणेशमूर्ती रंगवण्यासाठी करतो. फक्त दोनच रंग असले तरीही या इको-फ्रेंडली मूर्ती दिसायला अतिशय आकर्षक व सुंदर दिसतात.’
सिडनीत घुमतोय ढोल-ताशांचा आवाज…सार्वजनिक उत्सवाला पत्ते खेळण्याचा अड्डा किंवा मिरवणुकीत मद्यधुंद नाचणं अशी किनार आलेली दिसते, पण त्याबरोबरच काही जण शिस्तबद्ध मिरवणुकीचेही धडे घालून देतात. शिस्त, लयबद्ध वादन याबरोबरच संस्कृती जपण्याचा प्रयत्न करणारीही काही पथकं आहेत. गणपती मिरवणुकीतला पारंपरिक मराठमोळा ढोल-ताशांचा निनाद काही तरुणांनी सातासमुद्रापार अगदी सिडनीपर्यंत पोहोचवलाय. पुण्याच्या शिवगर्जना ढोल पथकात वादन करणारे काही तरुण शिक्षणानिमित्त, नोकरीनिमित्त परदेशात स्थायिक झाले; पण गणेशोत्सवातील ढोलांचा आवाज ‘मिस’ करू लागले आणि त्यातूनच परदेशातही गणपती मिरवणूक वाजतगाजत काढण्याचा विचार रुजला. मूळच्या पुण्यातल्या काही तरुणांनी एकत्र येऊन २००७ मध्ये सिडनीमध्ये ढोलवादन केलं आणि एक नवीन पायंडा पाडला. पुण्याहून ढोल-ताशे मागवण्यापासून तरुणांचा ग्रुप जमवण्यापर्यंत सगळ्या गोष्टी करताना सुरुवातीला थोडय़ा अडचणी आल्या, पण माऊथ पब्लिसिटी आणि टीनएजर्सचा उत्स्फूर्त सहभाग यातून सहा-सात जणांपासून सुरू झालेला ग्रुप ५५ सदस्यांपर्यंत पोहोचला. सिडनीच्या या ढोल पथकाची चर्चा सगळ्या ऑस्ट्रेलियात पोचली. गेल्या वर्षी थेट सिडनीच्या ऑलिंपिक पार्कच्या प्रांगणात या पथकाचे ढोल निनादले. इंडो- ऑस्ट्रेलियन मैत्री दिनानिमित्त १५ ऑगस्टला तिथे मराठमोळ्या ढोल- ताशांचा आवाज घुमला. आता अॅडलेड शहरातसुद्धा अनुप देशमुख या तरुणाच्या पुढाकारानं या वर्षी ढोल-ताशांचे आवाज घुमणार आहेत. सिडनीत मिरवणुकीच्या जल्लोषात मुलींचाही तेवढाच सहभाग असतो. ढोल, ताशा आणि झांजा वाजवण्यात सगळ्या वयोगटांतले स्त्री-पुरुष सहभागी होतात. सिडनी पथकातले अजय गोखले म्हणाले, ‘परदेशात राहूनही आपल्या संस्कृतीशी नाळ जोडली राहावी, यासाठीचा हा प्रयत्न आहे. आम्ही इथल्या मिरवणुकीत ढोल वाजवतो तेव्हा भारतापासून इतक्या दूर आहोत, हे जाणवतच नाही.’ आपल्या संस्कृतीची ओळख परदेशी बांधवांनाही यानिमित्ताने होत असते.
संग्रहित लेख, दिनांक 6th Sep 2013 रोजी प्रकाशित
ढोल-ताशांची पताका सिडनीपर्यंत
परंपरा आणि पर्यावरणाचा अतूट मेळ घालून गणपती उत्सवाचं स्वरूप अधिकाधिक व्यापक आणि इको-फ्रेंडली करण्याकडे आजच्या तरुणाईचा ओढा दिसतो.

First published on: 06-09-2013 at 12:12 IST
मराठीतील सर्व व्हिवा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Women dhol pathak in sidney