सिनेमा म्हणजे आपल्या भोवताली असणाऱ्या समाजाचं प्रतििबबच. प्रत्येक चित्रपट समाजातल्या निरनिराळ्या घटकांपासून प्रेरणा घेत असतो आणि त्याबरोबरच समाजातल्या लोकांच्या राहणीमानावरदेखील कळत किंवा नकळत आपली एक छाप सोडत असतो. स्त्रीप्रधान कथानकांची परंपरा भारतीय कलाक्षेत्रात पूर्वापार चालत आलेली आहे, असं म्हणायला हरकत नाही. प्रभातच्या ‘कुंकू’पासून, मेहबूब खानच्या ‘मदर इंडिया’पर्यंत अशी अनेक उदाहरणं आपल्याला आठवतील.
अगदी अलीकडच्या काळात मात्र स्त्रीप्रधान कथानकंदेखील एका ठरावीक साच्याच्या पलीकडे जाऊन निरनिराळ्या पद्धतीने आपल्यासमोर येतात. २०१२ मध्ये प्रदíशत झालेला सुजोय घोष यांचा ‘कहानी’ हा चित्रपट म्हणजे अशातलेच एक उत्तम उदाहरण ठरेल. विद्या बालनने साकारलेल्या ‘विद्या बाग्ची’चं पात्र, त्या पात्राचं दुर्गादेवीशी जुळवलेलं रूपक, त्यामधून करून दिलेली भारतीय स्त्रीच्या सामर्थ्यांची आणि तरीही तिच्या ठायी असलेल्या ममतेची जाणीव यांमुळे हा चित्रपट विशेष पसंत केला गेला. याउलट नुकताच प्रदíशत झालेल्या इम्तिआज़्ा अली यांच्या ‘हायवे’ने भारतीय स्त्रीच्या स्वातंत्र्यावर भाष्य केलं. तिची सहनशीलता, अन्याय्य बाल-लैंगिक शोषणावरची तिची असहाय प्रतिक्रिया पण त्याबरोबरच तिचा निडरपणा, भावनिक वर्चस्व, असे विविधअंगी पलू आलिया भटने साकारलेल्या ‘वीरा’च्या पात्राने आपल्यापुढे उलगडले.
उत्तर प्रदेशामधल्या महिलागटावर आधारलेला, नुकताच येऊन गेलेला डॉक्युमेंटरी पद्धतीचा ‘गुलाब गँग’ किंवा माधुरी दीक्षित आणि जूही चावला यांचा, आता येऊ घातलेला ‘गुलाब गँग’ हे चित्रपटदेखील या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे ठरतात. निरक्षर असूनही भारतीय महिलांच्या ठायी असणारा पराकोटीचा आत्मविश्वास, राजकीय ताकद, त्यांच्या एकजुटीत असणारी अनोखी शक्ती असे राजकीय आणि सामाजिक वळण असणारे मुद्दे यामार्फत धडाडीने समोर आणण्याचा हा प्रयत्न होय. याशिवाय प्रियांका चोप्राने साकारलेल्या ‘मेरी कोम’च्या पात्राचीही प्रेक्षकांना या धर्तीवर उत्सुकता वाटल्याशिवाय राहणार नाही.
पूर्वीप्रमाणे भारतीय स्त्री ही पुरुषाच्या अधीन असणारी, पतिव्रता किंवा फक्त प्रेयसी, बहीण, आई अशा साच्यात बांधलेली न राहता; ती चित्रपटांतून एक स्वतंत्र व्यक्तिरेखा म्हणून समोर येऊ लागली आहे. या चित्रपटांमुळे त्यांच्या स्त्री प्रेक्षकवर्गातही निश्चितच वाढ झालेली आपल्याला दिसून येते. भारतीय स्त्रीचं स्वतंत्र विश्व, तिची ओळख, तिचं सामथ्र्य यांचं सकारात्मक प्रदर्शन आणि भारताच्या सामाजिक आणि सांस्कृतिक नकाशावर असणाऱ्या स्त्रियांच्या स्थानाची नवी व्याख्या करण्यासाठी सिनेमा हे उत्तम माध्यम ठरतं आहे, यात दुमत नाही!
संग्रहित लेख, दिनांक 7th Mar 2014 रोजी प्रकाशित
सिनेमातली बाई
सिनेमा म्हणजे आपल्या भोवताली असणाऱ्या समाजाचं प्रतििबबच. प्रत्येक चित्रपट समाजातल्या निरनिराळ्या घटकांपासून प्रेरणा घेत असतो आणि त्याबरोबरच समाजातल्या लोकांच्या ...

First published on: 07-03-2014 at 01:09 IST
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Women in cinema