राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या बी.कॉम. प्रथम वर्षांच्या (आवश्यक) इंग्रजी पुस्तकाने चुकांची शंभरी ओलांडली असून पानोपानी असलेल्या चुकांमुळे विद्यार्थी आणि प्राध्यापकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्रुटी व चुकांनी भरलेल्या या पुस्तकात अर्थ लावताना त्यांना तारेवरची कसरत करावी लागत असली तरी पुस्तकाच्या संपादकांविरोधात बोलण्याची हिंमत कोणीही केलेली नाही.
‘मालगुडी डेज्’वाले आर.के. नारायणन, मुल्कराज आनंद यांना इंग्रजीचे पितामह म्हणून ओळखले जाते. त्यांची चुकीची वाक्यरचना, स्पेलिंगमधील त्रुटी व चुका, लहान आणि मोठय़ा अक्षरांची गल्लत, वाक्यांचे अर्थ न लागणे, चुकीच्या शब्दांमुळे वाक्यांचा भलताच अर्थ लागणे, चुकीचा शब्द, चुकीचे प्रश्न विचारणे, वाक्य आणि ओळी यातील फरक न समजणे, काही लेखकांच्या कार्यकाळाचा उल्लेख नसणे, पात्राचे नाव चुकवून त्या ठिकाणी भलतेच नाव असणे आणि सर्वात गंभीर चूक म्हणजे वाङ्मयचौर्यासारखे प्रकार पुस्तकात उघड झाले आहेत. इंग्रजीच्या या पुस्तकात बी.कॉम.चे ‘स्व्ॉन अ‍ॅण्ड पर्ल्स’ हे कथा, कविता आणि निबंध असलेले हे पुस्तक वर्षां वैद्य आणि रत्नाकर भेलकर यांनी संपादित केले असून वाणिज्य विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. भरत मेघे आणि वाणिज्य भाषा मंडळाचे अध्यक्ष डॉ. सिद्धार्थ बुटले या समन्वयक आहेत. चंद्रपूरच्या एस.पी. महाविद्यालयाचे डॉ. अक्षय धोटे, धनवटे नॅशनल महाविद्यालयाचे डॉ. रत्नाकर भेलकर, बुटिबोरीच्या शरदचंद्र महाविद्यालयाच्या डॉ. पूर्वा भोंडे, संताजी महाविद्यालयातील निहाल शेख आणि भिवापूर महाविद्यालयातील डॉ. राहील कुरेशी सदस्य असलेल्या पुस्तकात प्रस्तावना, अनुक्रमणिकेपासून चुकांची जी सुरुवात होते ती शेवटच्या प्रकरणापर्यंत येऊन ठेपते. ज्या संताच्या नावाने विद्यापीठ आहे, त्यांच्यावर रत्नाकर भेलकर यांची एक कविता त्यात अंतर्भूत करण्यात आली आहे. मात्र, तुकडोजी हे नाव देखील चुकवले आहे. शब्दातील अक्षरे खाऊन टाकलीत. पान ४, ६, १०, १४ वर ’्र‘, ३ं’ुी, ्रल्लूें३्रल्लॠ, २३ील्ल्िरल्ली२२ इत्यादी शब्दांचे अर्थ अजिबातच लागत नाहीत. मूळ कवितेच्या शीर्षकातून ‘आर्टिकल’च काढून टाकण्यात आले आहे. उदा. ‘दी अन्नोन सिटीझन’ या डब्लू.एच. ऑडेनच्या कवितेतील ‘दी’ आर्टिकल अनेक ठिकाणी गायब आहे.

पुस्तकाची सुधारित आवृत्ती लवकरच -वैद्य
या संदर्भात पुस्तकाच्या संपादक वर्षां वैद्य म्हणाल्या, गेल्या वर्षी विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात हे पुस्तक लागले असून त्यात अनेक त्रुटी आणि चुका राहून गेल्या. म्हणूनच या पुस्तकाची सुधारित आवृत्ती लवकरच येत आहे. त्या चुका प्रकाशकामुळे झाल्या आहेत. अर्थात पुस्तकाची छपाई हा आमचा अधिकार नसून अभ्यास मंडळाचे अध्यक्ष ते ठरवतात.