News Flash

दोन महिन्यांत १२ शेतकऱ्यांची आत्महत्या

दुष्काळाची दाहकता दिवसेंदिवस अधिकच तीव्र होऊ लागली आहे. गेल्या जानेवारी व फेब्रुवारी या दोन महिन्यांत मराठवाडय़ातील १२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. मार्चमध्ये या संख्येत पुन्हा वाढ

| March 14, 2013 02:51 am

दुष्काळाची दाहकता दिवसेंदिवस अधिकच तीव्र होऊ लागली आहे. गेल्या जानेवारी व फेब्रुवारी या दोन महिन्यांत मराठवाडय़ातील १२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. मार्चमध्ये या संख्येत पुन्हा वाढ झाली. वाळूज (औरंगाबाद), परंडा (उस्मानाबाद), टेंभुर्णी (जालना), निंद्रुड (माजलगाव), किनगाव (लातूर) येथे शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. यापैकी परंडा तालुक्यातील जगदाळवाडी येथील शेतकरी आत्महत्या दुष्काळाची दाहकता स्पष्ट करणारी आहे.
परंडय़ापासून ३० किलोमीटर अंतरावरील जगदाळवाडी येथे अंबादास लिंबराज गिरी (वय ५२) या शेतकऱ्याने गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली. आत्महत्येचे कारण नापिकी होते. पाच एकरांत केवळ एक पोते ज्वारी झाली. त्याच्या २०० पेंढय़ा कडबा जनावरांना कशा पुरणार, याची चिंता अंबादास गिरींना होती. हा ताण असह्य़ होऊन त्यांनी जीवनयात्रा संपविली. त्यांची दोन मुले मजुरीसाठी मुंबईला गेली होती. राहुल (वय २२) मुंबईत मजुरी करतो, तर त्याच्या लहान भावाने शाळा सोडली. माधुकरी मागून अंबादासचे ८० वर्षांचे वडील कसेबसे दिवस ढकलत आहेत. अंबादासच्या जाण्याने त्याच्या आईनेही धसका घेतला व त्याच दिवशी तिने प्राण सोडले. रात्री साडेअकरा वाजता अंबादास यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. काही तासाने त्याच जागी त्यांची आई शाहुबाई लिंबराज गिरी यांच्यावरही अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकाराने सारा गाव हळहळला. काही नेतेमंडळीही येऊन गेली. पण सरकारी अधिकारी कोणी फिरकले नाहीत. अजून अंबादासच्या आत्महत्येची नोंद सरकारदरबारी होणे बाकी आहे.
औरंगाबाद शहरातील वाळूजमध्येही शेतकऱ्याने आत्महत्या केली. टेंभुर्णी, माजलगाव येथील घटनाही मनाला चटका लावून जाणाऱ्या आहेत. खरीप हंगामात हाती काही लागले नाही, तर रब्बीत पीक कोठून येणार? शेतकऱ्यांना अजूनही कसलीच मदत मिळाली नाही. टँकरचे पाणी व जनावरांना चारा या पलीकडे काही मदत होत नसल्याने दाहकता वाढू लागली आहे. गेल्या फेब्रुवारीअखेर उस्मानाबाद जिल्ह्य़ात ४, नांदेड ६ व परभणी जिल्ह्य़ात २ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. या आत्महत्या नापिकी, कर्जबाजारीपणामुळे आहेत की नाही याची तपासणी केली जात आहे. गेल्या वर्षभरात १७८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. यातील ९६ आत्महत्या नापिकीमुळे झाल्याचे सरकारने मान्य केले. ९६पैकी ८९ शेतकऱ्यांना प्रत्येकी १ लाख रुपये मदत देण्यात आली. सन २००२पासून नापिकी व कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची माहिती तातडीने सरकारला कळविली जाते. गेल्या ११ वर्षांत मराठवाडय़ात ८७२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या.
दुष्काळामुळे स्थिती दिवसेंदिवस बिकट बनू लागली आहे. मोठय़ा प्रमाणात तरुणांनी शहराकडे स्थलांतर केले आहे. गावागावांत बुजुर्ग मंडळी कसे जगावे या विवंचनेत आहेत. दुष्काळग्रस्तासाठी केंद्र सरकार मदत करेल, असे सांगितले जाते. आकडेही उजेडात आले आहेत. मात्र, त्यातील मदतीची रक्कम शेतकऱ्यांपर्यंत जाईल का, हा प्रश्न अनुत्तरित आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 14, 2013 2:51 am

Web Title: 12 farmers suside in two month
टॅग : Drought,Farmers
Next Stories
1 अ‍ॅसिड हल्ल्यात पत्रकाराचे कुटुंब होरपळले
2 वाळूचोरी करणारे ५ ट्रॅक्टर जप्त, लाखाचा दंड वसूल
3 अजित पवारांच्या आश्वासनानंतर पाणीप्रश्नावरील आंदोलन स्थगित
Just Now!
X