येत्या खरीप हंगामात नागपूर जिल्ह्य़ाला ९३३ कोटी रुपये पीक कर्ज वाटप करावयाचे असून नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला यंदा १३९ कोटी रुपये पीक कर्ज वाटपाचे लक्ष्य देण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा यांनी दिली. मात्र, तरीही ही बँक कर्ज वाटप करू शकणार की नाही, याबद्दल त्यांनी शंका व्यक्त केली.
येत्या खरीप हंगामात नागपूर जिल्ह्य़ाला ९३३ कोटी रुपये पीक कर्ज वाटप करावयाचे असून त्यापैकी १८ कोटी ६५ हजार रुपयांचे वाटप झाले आहे. पेरणीचे दिवस जवळ आले असून विदर्भातील शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. तरीही राष्ट्रीयीकृक तसेच सहकारी बँका विविध तांत्रिक मुद्दे पुढे करीत त्यात अडथळे आणत आहेत. नागपूरसह वर्धा व बुलडाणा जिल्हा मध्यवती सहकारी बँका दिवाळखोरीत निघाल्या आहेत. त्यामुळे या बँका पीक कर्ज वाटप करणार की नाही, याबाबत जिल्हा प्रशासन साशंक आहे.
जिल्हा मध्यवती बँका व सहकारी सोसायटय़ांमार्फत होणारे कर्ज वाटप अपवादानेच होत आहे. शेतकऱ्यांना पीक कर्ज न देण्याचेच धोरण राष्ट्रीयीकृत बँकांचे असल्याने हजारो पात्र शेतकरी कर्जापासून वंचित आहेत. सरकारमात्र एकीकडे शून्य टक्के व्याज दरावर पीक कर्ज वाटप सुरू केले असल्याचा दावा करीत आहे.
या पाश्र्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी नागपूर जिल्ह्य़ाला ९३३ कोटी रुपये पीक कर्जाचे उद्दिष्ट असल्याचे सांगितले. १५ जुलैपर्यंत कुठल्याही परिस्थितीत हे कर्ज वाटप करणे बँकांना करणे बंधनकारक आहे. यासंदर्भात बँकांच्या अधिकाऱ्यांची लवकरच बैठक घेणार असून त्यांना स्पष्ट निर्देश दिले जातील.
आतापर्यंत नागपूर जिल्ह्य़ात १८ कोटी ६५ हजार रुपये पीक कर्जाचे वाटप झाले आहे. नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेलाही यंदा खरिपासाठी १३९ कोटी रुपये कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. असे असले तरी ही बँक कर्ज वाटप करू शकेल काय, याबद्दल संभ्रमच असून या बँकेने दिलेले उद्दिष्ट पूर्ण केले नाही तर इतर बँकांचे उद्दिष्ट वाढवावे लागेल. शेतकरी मात्र पीक कर्जापासून वंचित राहणार नाही, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.