भारतीय रेल्वे खऱ्या अर्थाने संस्कृतीची आणि देशाच्या इतिहासाची साक्षीदार आहे. तब्बल १६० वर्षांमध्ये रेल्वेच्या साथीने भारताच्या अनेक सामाजिक आणि राजकीय घटना घडल्या, त्यांचा इतिहास झाला. भारतीय रेल्वेने हा इतिहास तब्बल १०० हून अधिक छायाचित्रांच्या माध्यमातून आजच्या पिढीसाठी मुंबईत खुला केला आहे.
बोरीबंदर (आताचे छत्रपती शिवाजी टर्मिनस) ते ठाणे या ऐतिहासिक ३४ किमीच्या प्रवासाला १६ एप्रिल रोजी १६० वर्षे पूर्ण झाली. तब्बल ४०० प्रवाशांना सोबत घेऊन निघालेली पहिली गाडी, धुरांच्या रेषा हवेत सोडत वाफेवर, डिझेलवर आणि नंतर इलेक्ट्रिकवर धावणारी इंजिने यांचा बदलता प्रवास, वास्तुशास्त्राचा उत्तम नमुना ठरलेले जागतिक दर्जाचे गॉथिक शैलीतील व्हिक्टोरिया टर्मिनस, लाल किल्ल्याची प्रतिकृती असलेले जुने दिल्ली जंक्शन स्थानक अशा अनेक रेल्वेच्या पाऊलखुणा पाहायला मिळतात, त्या मुंबईच्या नरिमन पॉइंटच्या एनसीपीएतील पिरामल आर्ट गॅलरीमध्ये भरलेल्या छायाचित्र प्रदर्शनातून. देशातील विविध स्थानके, तेथील त्या काळातील फलाट, रेल्वे गाडय़ा, नॅरोगेजवरील मालगाडय़ा, हत्तींच्या सहाय्याने रेल्वेच्या कारशेडमध्ये नेण्यात येत असलेले डबे यासारखी अनेक छायाचित्रे येथे पाहण्यास मिळतात.
या प्रदर्शनाचे वैशिष्टय़ म्हणजे देशातील अनेक प्रमुख राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील नेत्यांनी केलेल्या प्रवासाची दुर्मिळ छायाचित्रे. पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांनी केलेला इंजिनातील प्रवास, लाहोर रेल्वे पोलीस ठाण्यात बंदिवान असलेला क्रांतिकारक हुतात्मा भगतसिंग, तत्कालिन रेल्वेमंत्री लालबहादूर शास्त्री, नेताजी सुभाषचंद्र बोस, गुरूदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या रेल्वे प्रवासाची ही छायाचित्रे सर्वांचे लक्ष वेधून घेतात. भारत-पाकिस्तान फाळणीच्या वेळी अंबाला स्थानकामध्ये उभी असलेली निर्वासितांनी भरलेली गाडी पाहून अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही. हे प्रदर्शन १६ जूनपर्यंत दुपारी १२ ते रात्री आठ वाजेपर्यंत सर्वांना मोफत पाहण्यास खुले आहे.