आठवडय़ाभरापासून विदर्भात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि इतरही जिल्ह्य़ात पूर परिस्थिती निर्माण झाल्याने अनेक  मार्ग बंद करण्यात आल्यामुळे नागपूर विभागात गेल्या चार दिवसात एसटीचे सुमारे १५ ते २० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
विदर्भात चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, वर्धा आणि मध्यप्रदेशमध्ये छत्तीसगड या भागात गेल्या पाच सहा दिवसापासून मुसळधार पाऊस असल्यामुळे अनेक त्या भागातील अनेक मार्ग बंद झाल्यामुळे त्याचा फटका एसटीला बसला आहे. नागपूरवरून चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली, गोंदिया, भंडारा या भागात जाणाऱ्यांची संख्या मोठय़ा प्रमाणात आहे. अनेक लोक रोज येणे जाणे करीत असतात मात्र, गेल्या पाच ते सहा दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे अनेक नागरिकांनी प्रवास करणे टाळले आहे. त्यामुळे नागपूर जिल्हा ग्रामीण तसेच नागपूरच्या मध्यवर्ती बस स्थानकाहून निघणाऱ्या लांब पल्ल्यांच्या बसेसमध्ये अचानक प्रवाशांच्या संख्येत घट झाली. जिल्ह्य़ात सुमारे २५ ते ५० हजार किमी फे ऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे दिवसाला सरासरी २ ते ३ लाख रुपयांचा फटका बसत आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक नागपूर विभागाचे प्रादेशिक व्यवस्थापक सूर्यकांत अंबाडेकर यांनी सांगितले, गेल्या पाच सहा दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका एसटीला बसला आहे. विशेषत गडचिरोली, आरमोरी, सिरोंचा, अहेरी या भागात १९ जुलै पासून बसेस जात नाही.चंद्रपूपर्यंत बसेस जात होत्या मात्र गेल्या दोन मार्ग बंद करण्यात आल्यामुळे त्या ठिकाणी बसेस जात नाही. गोंदिया आणि भंडारासह छिंदवाडाकडे जाणाऱ्या अनेक बसेस रद्द करण्यात आल्या आहेत त्यामुळे गेल्या पाच दिवसात एसटीचे १५ ते २० लाखाचे नुकसान झाले आहे. चाकरमानी आणि अन्य नागरिकांनी मुसळधार पावसामुळे घराबाहेर पडण्याचे टाळले. त्यामुळे साहजिकच जवळपास ५० टक्के प्रवासी संख्या घटली आहे. नागपूर विभागात उमरेड, कळमेश्वर, काटोल, मौदा, हिंगणा आदी भागातील एसटीच्या ग्रामीण फेऱ्या आणि गणेशपेठ तसेच मोरभवन बसस्थानकाहून लांब पल्ल्याच्या फेऱ्या दररोज सुरू आहेत. पावसामुळे  प्रवाशांची संख्या मंदावली असली तरी फेऱ्या बंद करता येत नाही. त्यामुळे अजून काही दिवस एस.टी. महामंडळाला नुकसान सहन करावा लागण्याची शक्यता आहे. पावसाने उघडीप दिल्यानंतर एस.टी.चे प्रवासी वाढतील, असेही अंबाडेकर म्हणाले.
नागपूर वर्धा रेल्वे मार्गावर पुलाखालची माती व खडी वाहून गेल्याने या मार्गावरील रेल्वे वाहतूक गेल्या दोन दिवसांपासून बंद असल्यामुळे एसटीने वर्धा आणि गोंदियाकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली आहे. गेल्या दोन दिवसात नागपूर – वर्धा मार्गावर ८० फेऱ्या म्हणजे १५ ते २० हजार किमी बसेस जास्तीच्या चालविण्यात आल्या आहेत. यात एसटीला ४ ते ५ लाखाचा फायदा झाला आहे. वर्धा- राळेगाव- गिरड हा मार्ग काही वेळ बंद असल्यामुळे या मार्गाने जाणाऱ्या बसेस रद्द करण्यात आल्या होत्या. आजही वध्र्याला जाणाऱ्या आणि तेथून येणाऱ्या बसेसमध्ये गर्दी असल्याचे अंबाडेकर म्हणाले.

पचमढीला नागद्वारच्या यात्रेसाठी मोठय़ा प्रमाणात लोक जात असल्यामुळे १ ऑगस्ट ते २१ ऑगस्टपर्यंत १६ बसेस अतिरिक्त सोडण्यात येणार आहे. पंचमढीला जाण्यासाठी रोज तीन बसेस जात असल्या तरी यात्रेसाठी विशेष व्यवस्था केली आहे. पचमढीला जाण्यासाठी आगाऊ बुकींग सुरू झाले आहे. पचमढीवरून परतीचे आरक्षण नागपूर मध्यवर्ती बसस्थानकमध्ये करण्यात आली आहे.