वर्षभरात एकदाही न झालेल्या जिल्हा नियोजन समितीची बैठक शुक्रवारी होणार होती. मात्र, काही अपरिहार्य कारणास्तव ही बैठक पुढे ढकलण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. आता ही बैठक २२ नोव्हेंबरला होणार आहे. वारंवार लांबणीवर पडत असलेल्या या बैठकीसाठी कोणताही मुहूर्त निश्चित होत नव्हता. ही बैठक शुक्रवारी होणार असे निश्चित झाले. तथापि पुन्हा एकदा बैठकीला विघ्न आले.
या आर्थिक वर्षांत म्हणजे दि. १ एप्रिलपासून जिल्हा नियोजन समितीची बैठक एकदाही झाली नाही. या संदर्भात पालकमंत्री प्रकाश सोळंके व जिल्ह्य़ातील चारही आमदारांचे जाहीर खटके उडाले होते. त्यामुळे पालकमंत्री व आमदारांमध्ये समन्वय नसल्याचे स्पष्ट झाले. त्याचबरोबर या विसमन्वयामुळे उपलब्ध तरतुदीपैकी केवळ ७ टक्केच खर्च विकासकामांवर झाला. या आर्थिक वर्षांत जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला एकदाही मुहूर्त लागला नाही. शुक्रवारची बैठक रद्द झाल्याने २२ नोव्हेंबरला ही बैठक होणार आहे, असे जिल्हा नियोजन अधिकारी एम. बी. बेग यांनी सांगितले. या दिवशी सकाळी ११ वाजता बैठक आता बी. रघुनाथदादा सभागृहात पालकमंत्री प्रकाश सोळंके यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.