शेवगावला नगरपालिका स्थापन करावे या मागणीसाठी उपोषण सुरू केलेल्या आंदोलकांची तब्येत खालावल्याने १९ महिलांसह २७ जणांना  पोलिसांनी आज जबरदस्तीने उपचारासाठी जिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, आंदोलनाची सरकारने दखल न घेतल्याने वेगळ्या पद्धतीने तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी घेतला. तसेच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण उद्या, सोमवारी श्रीरामपूरला येत आहेत. त्यांचीही शिष्टमंडळ भेट घेणार असून मागणीचे निवेदन त्यांना देण्यात येणार आहे.
शेवगावची ग्रामपंचायत बरखास्त करून तेथे नगरपालिका स्थापन करावी या मागणीसाठी ‘आप’चे कार्यकर्ते व शेवगाव ग्रामपंचायतचे कर्मचारी यांनी नगरमधील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. उपोषणाचा आजचा सातवा दिवस आहे. तीन दिवसांपूर्वी पालकमंत्री मधुकर पिचड यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन रविवारपर्यंत निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते, मात्र याबाबत उपोषणकर्त्यांशी कोणीही संपर्क साधला नाही.
आज सकाळी कोतवाली पोलिसांनी डॉक्टरांच्या तपासणीनंतर प्रकृती खालावलेल्या उपोषणकर्त्यांना जबरदस्तीने व्हॅनमध्ये बसवून रुग्णालयात नेले, परंतु तेथेही दाखल झाल्यानंतर आंदोलकांनी उपोषण सुरूच ठेवले आहे. नितीन दहिवाळकर, राजू साळवे, अमोल घोलप आदींनी रुग्णालयात दाखल होण्यास नकार दिला. दरम्यान पालकमंत्री पिचड यांनी आश्वासन न पाळल्याने आंदोलकांनी तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. ‘आप’च्या शहर कार्यकारिणीच्या बैठकीत अधिका-यांना घेराव घालण्याचा निर्णय घेण्यात आला.
दरम्यान, मुख्यमंत्री चव्हाण सोमवारी श्रीरामपूरला येत आहेत, पालिका स्थापन करण्याच्या मागणीसाठी ‘आप’चे कार्यकर्ते त्यांना तेथे शिष्टमंडळासह भेटून निवेदन देणार आहेत.