नगर-औरंगाबाद रस्त्यावरील इमामपूर घाटात मध्यरात्री झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील तीन जण ठार झाले तर तिघे जखमी झाले. हे सर्वजण औरंगाबादजवळील पढेगावचे आहेत. मृतांमध्ये सासू, सून व ४१ दिवसांच्या लहान बाळाचा समावेश आहे.
एमआयडीसी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सासू अन्सा फरजाना हमीद (वय ५६), डॉ. सनातजीन शहानवाजी हमीद (२४) व हंसीरअली शहानवाजी अली (वय ४१ दिवस) अशी मृतांची नावे आहेत. तर सासरा सय्यद हमीद इक्रम अली (वय ५७), नातलग सय्यद महमद अली हमीद अली (२८) व चालक सय्यद सलाम सलीम हे जखमी आहेत. रात्री दीडच्या सुमारास अपघात झाला.
डॉ. सनातजीन यांचा विवाह वर्षांपूर्वीच झाला होता, त्यांचे पती बंगळुरूला वैद्यकीय व्यवसाय करतात. हमीद कुटुंबीय टोयाटो जीपने (एमएच २० बीवाय ६०८३) औरंगाबादहून पुणे येथे जात होते व तेथून पुढे विमानाने बंगळुरूला जाणार होते. टोयाटोची व खासगी प्रवासी कंपनीच्या लक्झरी बसची (एमएच २७ ए ९६०७) समोरासमोर धडक झाली. लक्झरी बस पुण्याहून यवतमाळकडे चालली होती. बसच्या चालकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अधिक तपास सहायक उपनिरीक्षक इंगळे करत आहेत.