अवघ्या ४५ दिवसात सरासरी १ हजार १० मि.मी. इतका प्रचंड पाऊस झाल्याने या जिल्ह्य़ात घरे, पीक, छोटे-मोठे पूल, रस्ते, गाव तलाव, जिवीत हानी व इतर, असे सुमारे ३०० कोटींचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मुख्यमंत्र्यांचा पूरग्रस्त जिल्ह्य़ाचा दौरा जाहीर होताच राज्याच्या मुख्य सचिवांनी आज व्हीडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून परिस्थितीची माहिती घेतली. दरम्यान, आज दुसऱ्याही दिवशी पाऊस सुरूच असून इरई धरणाचे दरवाजे दोन मीटरने उघडल्याने नदी काठावरील वस्त्या व गावांमध्ये पूरपरिस्थिती कायम आहे.
या जिल्ह्य़ात साडेतीन ते चार महिन्यात सरासरी ११४२.१८ मि.मी. पाऊस दरवर्षी पडतो. परंतु, यावर्षी अवघ्या ४५ दिवसात १ हजार १० मि.मी. इतका प्रचंड पाऊस पडला आहे. त्याचा परिणाम गेल्या आठवडय़ाभरापासून सुरू असलेल्या पावसाने जिल्ह्य़ात पूर आला असून नदी काठावरील शेकडो गावे व वस्त्यांमध्ये पूराचे पाणी शिरल्याने परिस्थिती गंभीर बनलेली आहे. इरई धरणाचे सात दरवाजे दोन मीटरने उघडण्यात आल्याने दाताळा, कोसारा, किटाळी, भटाळी, आरवट, चारवट, छोटा मारडा, मोठा मारडा, हडस्ती, नागाळा, वढा, पांढरकवडा, महाकुर्ला, नेरी या गावात पुराचे पाणी शिरल्याने पिकांची व घरांची अतोनात हानी झाली आहे, तसेच चंद्रपूर शहरालगतच्या अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरले आहे. त्यामुळे घरांची मोठय़ा प्रमाणात पडझड झाली आहे. आज सलग दुसऱ्याही दिवशी पाऊस सुरू असल्याने प्रचंड नुकसान झाले आहे. जिल्हाधिकारी डॉ.दीपक म्हैसकर यांनी नुकसानग्रस्त भागाच्या सर्वेक्षणाचे आदेश दिले आहेत. त्यानुसार आजपासून मनपा व जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त पथकाने सर्वेक्षणाला सुरुवात केली असून प्राथमिक अंदाजानुसार जवळपास ३०० कोटीचे नुकसान झाले आहे.  
 मुसळधार पावसामुळे जिल्ह्य़ात दोन हजाराच्या जवळपास घरांची पडझड झाली आहे. त्यापाठोपाठ पंधरा तालुक्यातील किमान १ लाख हेक्टरमधील कापूस, सोयाबिन व धानाचे पीक वाहून गेले आहे. जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयात कार्यरत सर्वेक्षकांच्या मते या आकडेवारीनुसार किमान शंभर कोटीचे पीक वाहून गेले आहे. तसेच जिल्ह्य़ातील छोटे-मोठे ३० पूल क्षतीग्रस्त झाले आहेत. या पूलांना जोडणारे जोडरस्ते, अंतर्गत रस्ते, गाव रस्ते वाहून गेल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने किमान २५ कोटीचे नुकसान झाले आहे. बांधकाम विभागाने तात्पुरत्या डागडुजीसाठी साडेपाच कोटीचा निधी तात्काळ उपलब्ध करून दिला आहे. याच निधीतून दाताळा पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. मुसळधार पावसात अनेक गाव तलाव वाहून गेले. इरई व झरपट नदीकाठावरील सिवरेज प्लान्ट सुध्दा पाण्यात आहे. एकटय़ा भद्रावती तालुक्यात तीन तलाव फुटले आहेत. वरोरा, गोंडपिंपरी, पोंभूर्णा, चंद्रपूर या तालुक्यातील प्रत्येकी दोन ते तीन तलाव फुटले आहे. यानुसार सिंचन विभागाचे किमान दहा कोटीचे नुकसान झाले आहे.
महाऔष्णिक वीज केंद्रालाही मुसळधार पावसाचा फटका बसला आहे. तसेच एमएससीबीचे सुध्दा मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. जिल्ह्य़ात सहा जणांची जीवहानी झाली असून या प्रत्येकाला दीड लाखाची आर्थिक मदत देण्यात आलेली आहे. नुकसानीचा हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा पूरग्रस्त जिल्ह्य़ांचा दौरा जाहीर होताच जिल्हा प्रशासनाने अतिशय जलद गतीने सर्वेक्षणाला सुरुवात केली आहे. त्यातूनच ही आकडेवारी समोर आली आहे. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याची तयारी म्हणून राज्याचे मुख्य सचिव बांठिया यांनी आज जिल्हाधिकारी डॉ.दीपक म्हैसकर यांच्याशी व्हीडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संपर्क साधला. यावेळी त्यांनी जिल्ह्य़ातील पूरग्रस्त तालुके व गावांची व घरांचे व शेतीच्या नुकसानीची आकडेवारीही जाणून घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. ग्रामीण भागासोबतच मनपा क्षेत्रातही मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. शहरात नव्यानेच डांबरीकरण करण्यात आलेल्या दोन्ही रस्त्यांवर मोठय़ा प्रमाणात खड्डे पडले आहेत. यासोबतच शहरातील बहुतांश प्रभागातील रस्ते, नाल्यांवरील छोटे पूल वाहून गेले आहेत. इंदिरानगर, रहमतनगर, श्यामनगर, संजय नगर, बाबूपेठ, भिवापूर, मित्रनगरातील हजारो घरांची पडझड झाली आहे. मनपा आयुक्त प्रकाश बोखड व त्यांची चमू शहरातील नुकसानीचे सर्वेक्षण करत आहेत.  
 काल सोमवारी व आज जिल्ह्य़ात सर्वदूर मुसळधार पाऊस झाला. एकटय़ा गोंडपिंपरी तालुक्यात विक्रमी ३३३ मि.मी. पावसाची नोंद घेण्यात आली. या पावसामुळे गोंडपिंपरी तालुक्यातील धाबा, करंजी, झरण, आक्सापूर या भागातील हजारो हेक्टरमधील पीक वाहून गेले आहे. तसेच महाराष्ट्र-आंध्रप्रदेश या दोन राज्यांना जोडणारा पोडशाचा पूल क्षतीग्रस्त झाला आहे. अनेक पुलावरून पाणी असल्याने मुख्य रस्ते बंद पडले आहेत. २० गावांचा संपर्क तुटला असून अनेक गावातील वीज पुरवठा खंडित झाला आहे. आज जि.प. मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. माधवी खोडे यांनी गोंडपिंपरी तालुक्याचा दौरा करून परिस्थितीची माहिती घेतली. बल्लारपूर, पोंभूर्णा, मूल, चंद्रपूर, राजूरा, कोरपना व जिवती या तालुक्यातही मुसळधार पाऊस झाला. आज दुसऱ्याही दिवशी सलग पाऊस सुरू असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. कृषी सहसंचालक घावटे यांनी पूरग्रस्त गावाचा दौरा केला. यावेळी त्यांनी पूरग्रस्त शेतकऱ्यांशी चर्चा केली. रब्बी हंगामासाठी बियाणे देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले
तीन वेळा पेरण्या
मुसळधार पावसामुळे या जिल्ह्य़ातील बहुतांश तालुक्यातील शेतकऱ्यांनी तीन वेळा पेरण्या केल्यानंतरही पीक वाहून गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. चंद्रपूर, बल्लारपूर, गोंडपिंपरी, जिवती, चिमूर, वरोरा, भद्रावती, मूल, सावली, ब्रम्हपुरी या दहा तालुक्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. त्यामुळे या तालुक्यातील शेतकऱ्यांनी पहिल्यांदा पेरणी केली असता पीक वाहून गेले. दुबार पेरणीनंतरही पीक पुराच्या पाण्यात गेले, तर तिसऱ्यांदा पेरणी केल्यानंतर विक्रमी मुसळधार पावसात पुन्हा पीक वाहून गेल्याने शेतकऱ्यांची अवस्था मोठी बिकट झाली आहे. ओल्या दुष्काळाने शेतकऱ्यांचे डोळे अक्षरश: पाणावले आहेत.
सर्वपक्षीय नेते व पदाधिकाऱ्यांचे ‘फोटोसेशन’     
पूरग्रस्त भागाची पाहणी करण्याच्या निमित्ताने सर्वपक्षीय नेते व पदाधिकाऱ्यांचे ‘फोटोसेशन’ सुरू झाले आहे. याचा प्रत्यक्ष अनुभव काल व आज पूरग्रस्त भागाची पाहणी करतांना आला. शनिवार व रविवारी पूर ओसरल्यानंतर सर्वपक्षीय नेत्यांनी पूरग्रस्त भागाचा दौरा करून फोटोसेशन करून घेतले. पूरग्रस्त भागात फिरायचे, एक दोन घरांना भेटी द्यायच्या, त्यांचे सांत्वन करायचे, मदत दिल्याचा आव आणायचा आणि एक फोटो काढून निघून जायचे, असा हा सर्व प्रकार आहे. ही सर्वपक्षीय नेते मंडळी पूरग्रस्त भागात जातांना भांडे, साडय़ा, कपडे व धान्यासोबतच छायाचित्रकार व एखाद्या स्थानिक वाहिनीचा कॅमेरामनही सोबत घेऊन जातात. पूरग्रस्तांना भेट वस्तू देतांनाच स्वत:चे छायाचित्र काढून घेतात. मोठय़ा नेत्यांचे ठीक आहे. परंतु, दुसऱ्या व तिसऱ्या फळीतील नेत्यांनीही हा कित्ता गिरविण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे, शुक्रवारी या शहरालगतच्या अनेक वस्त्यांमध्ये पूर परिस्थिती होती. त्या काळात नगरसेवकासह पक्षाचा साधा कार्यकर्ताही फिरकला नाही. पूरग्रस्तांना तेव्हा मदतीची खरी गरज होती. मात्र, काही नगरसेवक इरई डॅमवर कुटूंब व मित्रांसोबत मौज मस्ती, तर काही मनपात बसून पूर परिस्थितीवर चर्चा करत होते. काही नगरसेवकांना तर प्रभागातील लोकांनी भ्रमणध्वनीवर संपर्क साधून प्रभागात पूर आल्याची माहिती दिली. तेव्हाही नगरसेवक मी बाहेर आहे. बघतो पाहतो.. अशी खोटी उत्तरे देण्यात मग्न होते. एकूणच काय तर, पूरपरिस्थिता फायदाही आता फोटोसेशन व मतांच्या राजकारणासाठी घेतला जात असल्याचे चित्र येथे बघायला मिळत आहे.