रस्त्याच्या चौपदरीकरणाला विलंब
वरोरा-बामणी रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम उशिराने सुरू केल्याबद्दल विश्वराज कन्स्ट्रक्शन कंपनीला सार्वजनिक बांधकाम विभागाने साडेचार कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. दरम्यान, या कंपनीला ३१ डिसेंबपर्यंत काम पूर्ण करून द्यायचे असून तसे झाले नाही तर आणखी दंड ठोठावण्यात येणार असल्याने कंत्राटदारांच्या वर्तुळात खळबळ उडाली आहे.
चंद्रपूर-नागपूर राज्य महामार्गावरील वरोरा-बामणी या ११० किलोमीटरच्या चौपदरीकरणाचे काम नागपूरच्या विश्वराज कन्स्ट्रक्शन कंपनीला मिळाले आहे. या कंपनीला तीन वर्षांच्या कालावधीत काम पूर्ण करून द्यायचे होते आणि त्यानंतर पथकर वसुलीसुद्धा करायची होती. परंतु तीन वर्षांचा कालावधी पूर्ण होत आलेला असतानाही रस्त्याचे काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे बामणी-वरोरा या मार्गाने ये-जा करणाऱ्या प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. चौपदरीकरणाचे काम सुरू असल्याने भद्रावती ते चंद्रपूर व बल्लारपूर या मार्गाने प्रवास करणे अतिशय कठीण झाले आहे. रस्ता ठिकठिकाणी खोदून ठेवला असल्याने अपघातांच्या संख्येत वाढ झाली असून अनेकांना जीव गमवावा लागला आहे. रस्त्याचे काम कासवगतीने सुरू असल्यामुळेच या सर्व समस्या उद्भवल्या आहेत. बांधकाम विभागाशी झालेल्या करारानुसार या कंपनीला ३१ डिसेंबपर्यंत रस्त्याचे काम पूर्ण करून पथकर वसुली करायची होती. परंतु कंपनीने कामालाच उशिरा सुरुवात केल्यामुळे ही सर्व समस्या उद्भवल्याची माहिती आता समोर आली आहे. अशाही स्थितीत सार्वजनिक बांधकाम विभागाने कंपनीला ३१ डिसेंबपर्यंत काम पूर्ण करा अन्यथा दंड ठोठावण्याची नोटीस बजावली आहे. तत्पूर्वी या कंपनीला काम उशिराने सुरू केल्याबद्दल साडेचार कोटींचा दंड ठोठावण्यात आला आहे. हा दंड सार्वजनिक बांधकाम विभागाने वसूल केला असल्याची माहिती कार्यकारी अभियंता तेलंग यांनी दिली. यानंतरही कंपनीचे काम अतिशय मंदगतीने सुरू आहे. याबाबत अधिक चौकशी केली असता वेगवेगळय़ा कारणामुळे रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या कामाला विलंब होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
भद्रावतीजवळ या कंपनीने अतिशय चुकीच्या पद्धतीने पुलाचे बांधकाम केल्यामुळे रस्त्याला विलंब होत असल्याची माहिती समोर आली आहे. यासोबतच इरई नदीवरील पुलाच्या बांधकामाला तसेच बायपासवरील बांधकामाला विलंब झाल्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. पुलामुळे जुनोना चौक, बाबूपेठ व भिवापूर परिसरातील लोकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. यंदाच्या पावसाळय़ात या पुलामुळे पावसाचे पाणी या परिसरातील वस्त्यांमध्ये शिरल्याच्या तक्रारी आहेत. तसेच बल्लारपूर मार्गावर हा रस्ता ठिकठिकाणी खोदून ठेवला असल्यामुळे नियमित ये-जा करणाऱ्यांना त्रास होत आहे. या सर्व समस्या तसेच अपघातांची वाढती संख्या लक्षात घेता विविध राजकीय पक्षांच्या लोकप्रतिनिधींनी हा मार्ग तातडीने पूर्ण करावा अशी मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे.
लोकप्रतिनिधींची मागणी लक्षात घेता या रस्त्याचे काम कोणत्याही परिस्थितीत ३१ डिसेंबरपूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश बांधकाम विभागाने या कंपनीला दिले आहेत. दरम्यान, बांधकाम विभागाने निर्देश दिले असले तरी ३१ डिसेंबपर्यंत हा रस्ता पूर्ण होऊच शकत नाही, अशी माहिती विभागातील सूत्रांनी दिली. ही वस्तुस्थिती असली तरी बांधकाम विभाग ३१ डिसेंबरनंतर या कंपनीला दंड ठोठावणार आहे. यामुळे विश्वराज कंपनीचे धाबे दणाणले आहेत.
दरम्यान, बांधकाम विभागाची नोटीस हाती पडताच या कंपनीने युद्धपातळीवर रस्त्याचे काम सुरू केले आहे. वरोरा नाका ते बंगाली कॅम्पपर्यंतचा रस्ता तातडीने पूर्ण करण्यासाठी किमान तीन महिने या मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. या मार्गावरील वाहतूक कोणत्या मार्गाने वळती करायची त्या दृष्टीने बांधकाम विभाग नियोजन करीत आहे.