रायगड जिल्ह्य़ातील आरोग्य विभागाला रायगड सुरक्षा मंडळाच्या ४७ रक्षकांना गेल्या अकरा महिन्यांपासून वेतन मिळत नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. काहींना वेतन मिळाले तर काहींना वेतनावर मिळणारे इतर भत्ते मिळाले नाहीत. रक्षकांनी मागील महिन्यात पालकमंत्री प्रकाश मेहता यांची याप्रश्नी भेट घेतली, मंत्री मेहता यांनीही आश्वासन दिले. मात्र अजूनही मंत्रालयातून वेतनाचा तिढा सुटलेला नाही.
 रायगड जिल्ह्य़ामध्ये पोलादपूर, महाड, रोहा, माणगाव, पेण, अलिबाग, चौक, कर्जत, खालापूर, पनवेल, श्रीवर्धन, उरण तालुक्यांमध्ये आरोग्य विभागाच्या उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयांमध्ये नेमणूक असलेल्या रक्षकांना त्यांचे वेतन मिळालेले नाही. सरकारचे अनुदानाच्या चालढकलपणामुळे ही वेळ रक्षकांच्या कुटुंबावर आल्याचे उरण येथील योगेश रसाळ या रक्षकाने सांगितले. तसेच याच सर्व गर्तेत पनवेल ग्रामीण रुग्णालयाची डोळ्यांत तेल घालून चौकीदारी करणारा रक्षक कुलदीप गावंड याचे वेतनाअभावी लग्नाची तारीख पुढे ढकलली जात आहे. पुणे व ठाणे येथील आरोग्य विभागाच्या टोलवाटोलवीमध्ये हे रक्षक भरडले गेले आहेत. काहींना दोन महिन्यांचे वेतन पाठविण्यात आले आहे. मात्र अजूनही पनवेल, उरण ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालयांमधील रक्षकांना वेतन मिळाले नाही.  शल्यचिकित्सक साहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय व उपसंचालक आरोग्य यांच्या कार्यालयांची खेटे घालून हे रक्षक वैतागले आहेत. सुमारे ३५ लाख रुपयांचे वेतन व इतर भत्ते न दिल्याने या रक्षकांवर उपासमारी व कर्जबाजारातून रक्षकांची सुटका होण्यासाठी आरोग्य विभागाने यात तातडीने यात लक्ष घालावे अशी मागणी रक्षकांच्या कुटुंबीयांनी केली आहे.  

आरोग्य विभागाशी आमचा पत्रव्यवहार सुरू आहे. तेथील उपसंचालक कार्यालयाला या सर्व परिस्थितीची जाणीव करून दिली आहे. अनुदान आल्यानंतर लगेच वेतन दिले जाईल असे त्या विभागाच्या प्रमुखांचे मत आहे. तसेच आमच्या कार्यालयाकडून वेतन मिळण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत.
शाम जोशी, साहाय्यक कामगार आयुक्त.