जून महिन्याच्या अखेरीस जालना जिल्ह्य़ातील १० लाख ८४ हजार म्हणजे जवळपास ७० टक्के लोकसंख्या टँकरच्या पाणीपुरवठय़ावर अवलंबून आहे.
सध्या जिल्ह्य़ातील ४३८ गावे आणि १११ वाडय़ांना ५५६ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. नवीन जायकवाडी योजनेचे पाणी आले तरी जालना शहरात १५ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. भोकरदन नगरपालिका हद्दीत ९ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. जालना तालुक्याच्या ग्रामीण भागात ९९ टँकर सुरू असून त्यासाठी १५६ खासगी विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. बदनापूर तालुक्यातील ४८ गावे आणि २० वाडय़ांना ५५ टँकरने पाणीपुरवठा केला जातो. भोकरदन तालुक्यात १०० गावे आणि ४ वाडय़ांसाठी १०७ टँकर सुरू आहेत. जाफराबाद तालुक्यात ४१ गावांसाठी ५१ तर परतूर तालुक्यात ९ गावांसाठी १३ टँकर सुरू आहेत. मंठा तालुक्यात २९ गावे आणि ११ वाडय़ांना ३७ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. घनसावंगी तालुक्यात ८२ टँकर, तर अंबड तालुक्यातील ६६ गावे आणि २८ वाडय़ांना ८८ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. सध्या जिल्ह्य़ात गुरांच्या ७९ छावण्या सुरू असून त्यामध्ये ४६ हजार ७०० जनावरे आहेत.