News Flash

राजीवनगरमधील ७० अनधिकृत झोपडय़ा जमीनदोस्त

सिंहस्थाची घटिका समीप आल्यानंतर महापालिकेने पुन्हा एकदा अतिक्रमण निर्मूलन मोहिमेला गती दिली असून, शुक्रवारी राजीवनगर रस्त्यावरील ७० अनधिकृत झोपडय़ांचे बांधकाम जमीनदोस्त करण्यात आले.

| April 18, 2015 12:31 pm

सिंहस्थाची घटिका समीप आल्यानंतर महापालिकेने पुन्हा एकदा अतिक्रमण निर्मूलन मोहिमेला गती दिली असून, शुक्रवारी राजीवनगर रस्त्यावरील ७० अनधिकृत झोपडय़ांचे बांधकाम जमीनदोस्त करण्यात आले. अतिक्रमणधारकांनी मोहिमेला विरोध करण्याचा प्रयत्न केला. तथापि, पोलिसांनी तंबी दिल्यावर अनेकांनी स्वत:हून अतिक्रमण काढून घेण्याची तयारी दर्शविली. संसारोपयोगी साहित्य काढून घेतल्यानंतर पक्क्या स्वरूपाची अतिक्रमणे हटविण्यात आली.
आगामी सिंहस्थाच्या पाश्र्वभूमीवर, काही महिन्यांपूर्वी धडकपणे सुरू झालेली अतिक्रमण निर्मूलन मोहीम मध्यंतरी काहीशी थंडावली होती. सिंहस्थाला काही दिवसांचा अवधी शिल्लक असल्याने तत्पूर्वी शक्य तितक्या रस्त्यांच्या विस्तारीकरणाचा पालिकेचा प्रयत्न आहे. एप्रिल २०१५ पर्यंत हे काम पूर्णत्वास नेण्याचे नियोजन आहे. याआधी पालिकेने ठिकठिकाणी अतिक्रमित बांधकामांवर चिन्हांकन करत संबंधितांना ते स्वत:हून काढून घेण्याची संधी दिली, परंतु जोपर्यंत पथक दाखल होत नाही, तोपर्यंत तशी तयारी अपवादाने दाखवली गेली. मुंबई-आग्रा महामार्गालगतच्या राजीवनगरला जाणाऱ्या मुख्य मार्गावर अनेक अनधिकृत बांधकामे आहेत. आदल्या दिवशी पथकाने त्यावर चिन्हांकन केले होते. या वेळी स्थानिकांच्या विरोधाचा सामना कर्मचाऱ्यांना करावा लागला. प्रत्यक्ष मोहीम राबविताना त्याची पुनरावृत्ती झाली. इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या लगत राजीवनगर परिसरात मोठी झोपडपट्टी आहे. त्यातील अनेक घरे मुख्य रस्त्याला लागून होती. सकाळी साडेनऊच्या सुमारास अतिक्रमण विभागाचे पथक पोलीस कर्मचाऱ्यांसह दाखल झाले. ही बाब लक्षात आल्यावर स्थानिकांचा मोठा जमाव जमला. राहती घरे पाडू नयेत असे सांगत त्यांनी मोहिमेला विरोध सुरू केला. पथकांशी त्यांचे वादविवादही झाले. पोलिसांनी संबंधितांना कारवाईची तंबी दिल्यावर विरोध मावळला.
काही जणांनी स्वत:हून अतिक्रमण काढून घेण्याची तयारी दर्शविली. त्यासाठी तासाभराची वेळ देण्यात आली. या कालावधीत अनेकांनी घरातील संसारोपयोगी साहित्य, पत्रे व तत्सम साहित्य काढून घेतले. घरे मोकळी होऊ लागल्यानंतर जेसीबीच्या साहाय्याने ती जमीनदोस्त करण्याचे काम सुरू झाले. दुपापर्यंत परिसरातील ७० हून अधिक पक्की घरे वजा झोपडय़ा भुईसपाट करण्यात आल्याचे पालिका अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. याच रस्त्यावरील आसपासची अन्य अतिक्रमणेही हटविण्यात आली. त्यात संरक्षण भिंत, शेडचा समावेश होता. दरम्यान, ज्या ज्या रस्त्यांचे विस्तारीकरणाचे काम केले जाणार आहे, त्या त्या ठिकाणी पालिका ही मोहीम राबवत आहे. त्यास प्रारंभापासून सातत्य राखले न गेल्यामुळे हा विषय सिंहस्थाआधी पूर्णपणे मार्गी लागणे अवघड असल्याचे चित्र आहे.

विद्यार्थ्यांना बचतीचे महत्व कळावे
‘आमची बँक’ ही संकल्पना मुळात मुलांना बचतीचे महत्त्व कळावे यासाठी सुरू केली. बचत व्हावी यासाठी उद्योजकता अंतर्गत मुलांकडून सणवारानुसार काही वस्तू बनवून घेत त्याची विक्री बाजारपेठेत केली जाते. तो सर्व पैसा हा मुलांचा असतो. हा पैसा कुठे आणि कसा खर्च करायचा याचे आम्ही मार्गदर्शन करतो. आपले पैसे म्हणून मुलांना त्याचा जास्त आनंद असतो.
– जगदीश जाधव  (अध्यक्ष, लोकविकास सामाजिक संस्था)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 18, 2015 12:31 pm

Web Title: 70 unauthorized slums demolished in in rajiv nagar
Next Stories
1 विद्यार्थ्यांना आर्थिक नियोजन शिकविणारा ‘आमची बँक, आमचे एटीएम’ उपक्रम
2 ‘आरटीई’अंतर्गत एक हजार विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहण्याची भीती
3 रब्बीची पैसेवारी शून्य :
Just Now!
X