सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयातील वाहतूक नियंत्रण शाखेच्यावतीने यंदा वाहतूक सुरक्षा सप्ताहाचे औचित्य साधून शालेय विद्यार्थ्यांसाठी रस्ता सुरक्षा दलाच्या अभ्यासक्रमात बदल केला असून यात सहायक पोलीस आयुक्त व इतर पोलीस अधिकारी स्वत: शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांचा वर्ग घेणार आहेत. रस्ता सुरक्षेबद्दलचे मार्गदर्शन अवगत केलेले विद्यार्थी नंतर घरी आपल्या पालकांना रस्ता वाहतूक सुरक्षेचे नियम समजावून सांगणार आहेत. पोलीस आयुक्त प्रदीप रासकर यांच्या संकल्पनेतून हाती घेण्यात आलेल्या या उपक्रमात विविध ५८ शाळांतील ८७०० विद्यार्थी सहभागी झाले आहेत.
शहरात वरचेवर वाहतूक समस्या हा चिंतेचा विषय ठरला असताना रस्ता सुरक्षा दलात (आरएसपी) आतापर्यंत शालेय विद्यार्थ्यांना रस्त्यांवर चौकांमध्ये वाहतूक नियंत्रण कसे करावे याचे धडे दिले जात असत. त्यासाठी पोलीस हवालदार दर्जाचा कर्मचारी कार्यरत असे. आता या अभ्यासक्रमात लक्षणीय बदल करण्यात आला असून यात पोलीस हवालदाराऐवजी सहायक पोलीस आयुक्त, पोलीस निरीक्षक व अन्य पोलीस अधिकारी पुढे येऊन विद्यार्थ्यांना वाहतूक सुरक्षेचे धडे देणार आहेत. त्यासाठी शाळांमध्ये हे पोलीस अधिकारी जाऊन विद्यार्थ्यांना रस्ते वाहतूक सुरक्षेबाबत घ्यावयाची काळजी व सजगता याविषयी मार्गदर्शन करणार आहेत. ही संकल्पना पोलीस आयुक्त रासकर यांची असून त्यास शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी व पालक या सर्वाचा प्रतिसाद लाभत आहे. मुंबई व पुण्यानंतर रस्ता सुरक्षा दलात शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविण्याचा प्रयत्न सोलापुरात होत असल्याचे दिसून येते. रस्ता सुरक्षा दलाच्या विद्यार्थ्यांनी नुकतेच पोलीस मुख्यालयावर एकत्र येऊन शानदार संचलन केले. त्याचे नागरिकांनीही कौतुक करीत शहरातील वाहतुकीची समस्या सुटण्याची आशा व्यक्त केली.
नेमेची येतो पावसाळा याप्रमाणे दरवर्षी वाहतूक सुरक्षा सप्ताह साजरा केला जातो. मात्र शहर वाहतूक पोलीस शाखेने आगळ्या वेगळ्या पध्दतीने वाहतूक सुरक्षा सप्ताहाचे नियोजन केले होते. यात रस्ता सुरक्षा दलाच्या विस्तार व अभ्यासक्रमाची व्याप्ती वाढविण्याबरोबर विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांसाठी वाहतूक सुरक्षा व समस्येवर आधारित लघुपट दाखविले. या वेळी वाहतूक नियंत्रण शाखेचे सहायक पोलीस आयुक्त खुशालचंद बाहेती व त्यांच्या सहकाऱ्यांनी खुला संवाद साधत मार्गदर्शन केले. विसुभाऊ बापट यांच्या ‘कुटुंब रंगलय काव्यात’ या वैशिष्टय़पूर्ण कार्यक्रमाचे तीन ठिकाणी सादरीकरण करण्यात आले. या कार्यक्रमाचे वैशिष्टय़ म्हणजे विसुभाऊ बापट यांनी वाहतूक समस्यांवर सुंदर व मार्मिक आणि मनाला भिडणाऱ्या कविता सादर केल्या. त्यास रसिक नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. ग्रामदैवत सिध्देश्वर यात्रेचे औचित्य साधून यात्रेतील अक्षता सोहळा व शोभच्या दारूकामाच्यावेळी लावण्यात आलेले वाहतूक नियमनाविषयीचे प्रबोधनपर फलक आकर्षक ठरले. याशिवाय व्होडाफोन, बीएसएनएल यासारख्या दूरसंचार कंपन्यांच्या सहकार्याने मोबाइल व दूरध्वनीद्वारे वाहतूक नियमनाचा संदेश पोहोचविण्यात आला. वाहतूक नियमनाविषयी मार्गदर्शनपर पुस्तिकांची निर्मिती करण्यात आली असून त्याचे प्रकाशन केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी पोलीस आयुक्त प्रदीप रासकर यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. या उपक्रमाचे स्वागत करताना सुशीलकुमार शिंदे यांनी शहर वाहतूक पोलीस शाखेच्या कार्याला शुभेच्छा दिल्या. सहायक पोलीस आयुक्त खुशालचंद बाहेती यांच्यासह पोलीस निरीक्षक अभिजित मोहिते, पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी रस्ता सुरक्षा सप्ताहाचे नियोजन केले होते.