नागपूर व रामटेक लोकसभा मतदारसंघात मतमोजणीअंती प्रारंभापासून सुरू झालेल्या महायुतीच्या झंझावातात आप आणि बसपासह ५१ उमेदवारांच्या अनामत रकमा जप्त झाल्याचे स्पष्ट झाले.
कळमना बाजारात शुक्रवारी सकाळपासून मतमोजणी सुरू झाली. नागपूर मतदारसंघाच्या मतमोजणीत पहिल्या फेरीत गडकरींनी ४२ हजार ८६४ मते घेत आघाडी घेतली. ती अखेरच्या सतराव्या फेरीपर्यंत कायमच होती. रामटेक मतदारसंघाच्या मतमोजणीत कृपाल तुमाने यांनी २४ हजार ५१६ मते घेत आघाडी घेतली. ती अखेरच्या फेरीपर्यंत कायम होती. कधी पुढे तर कधी मागे, असे झालेच नाही. महायुतीच्या या दोन्ही उमेदवारांचा झंझावात अखेरच्या फेरीपर्यंत कायम होता. या दोन्ही उमेदवारांनी प्रचंड मते घेतली होती. अखेरच्या फेरीनंतर मतांच्या झालेल्या गोळाबेरेजेअंती नितीन गडकरी यांनी ५ लाख ८७ हजार ७६७ मते घेतली. एकूण वैध मतांच्या (१० लाख ८१ हजार ५९८) एक षष्टमांश मतांपेक्षा कमी मते मिळाली असतील तर संबंधित उमेदवारांची अनामत रक्कम जप्त होते.
नागपूर मतदारसंघात एकूण ३३ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. काँग्रेसचे पराभूत उमेदवार विलास मुत्तेमवार यांना ३ लाख २ हजार ९३९ मते मिळाली. तिसऱ्या क्रमांकावर असलेले मोहन गायकवाड यांना ९६ हजार ४३३ व त्याखालोखाल आम आदमी पक्षाच्या अंजली दमानिया यांना ६९ हजार ८१ मते मिळाली. या दोघांसह ३१ उमेदवारांच्या अनामत रकमा जप्त झाल्या. बसप, आम आदमी पक्ष, हिंदुस्थान जनता पार्टी, मायनॉरिटीज डेमोक्रॅटिक पार्टी, गोंडवाना गणतंत्र पार्टी, डेमोक्रॅटिक सेक्युलर पार्टी, रिपाइं, बहुजन मुक्ती पार्टी, जदयू हे पक्ष तसेच अपक्ष उमेदवारांचा त्यात समावेश आहे.
रामटेक मतदारसंघात महायुतीचे कृपाल तुमाने यांनी ५ लाख १९ हजार ८९२ मते घेतली. काँग्रेसचे पराभूत उमेदवार मुकूल वासनिक यांना ३ लाख ४४ हजार १०१ मते मिळाली. एकूण वैध मतांच्या एक षष्टमांश मतांपेक्षा कमी मते मिळाली असतील तर संबंधित उमेदवारांची अनामत रक्कम जप्त होते. तिसऱ्या क्रमांकावरील बसपच्या किरण रोडगे यांना ९५ हजार ५१ मते मिळाली. त्याखालोखाल आम आदमी पक्षाचे प्रताप गोस्वामी यांना २५ हजार ८८९ मते पडली. रामटेकमध्ये २३ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. त्यापैकी वीस उमेदवारांच्या अनामत रकमा जप्त झाल्या.