बार कौंसिलच्या सदस्य असलेल्या अपंग महिला वकिलासोबत महाराष्ट्र एक्स्प्रेसच्या ए.सी.कोचमध्ये तिकिट तपासणी पथकातील दोघांनी त्यांचा हात पकडून गाडीबाहेर काढण्याची धमकी देऊन त्यांच्याशी अभद्र व्यवहार केल्याची घटना २० जूनला कोल्हापूरहून गोंदियाला येणाऱ्या महाराष्ट्र एक्स्प्रेसमध्ये कामठी स्थानकादरम्यान घडली.
गोंदिया स्थानकावर आल्यानंतर या घटनेची तक्रार स्टेशन व्यवस्थापकांच्या कक्षातील  तक्रार पुस्तिकेत करण्यास ही महिला वकील गेली असता रेल्वेतील काही लोकांनी त्यांना मज्जाव केला. इतक्यावरच रेल्वेचे कर्मचारी थांबले नाही, तर गोंदिया स्थानकाबाहेर आल्यानंतर तिच्याशी तक्रार परत घेण्याकरिता थांबविण्यात आले. याबाबतची तक्रार आपण रेल्वे स्थानकातील पोलिस ठाण्यात केली असून हा गैरव्यवहार करणाऱ्या दोन्ही तिकीट तपासणीसांची  चौकशी करून त्यांना निलंबित करण्यात यावे, अशी मागणीही या महिला वकीलांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली. गोंदियातील बार कौंसिलच्या सदस्य संगीता रोकडे या अपंग महिला वकील २० जूनला महाराष्ट्र एक्स्प्रेसने नागपूरहून गोंदियाला येण्याकरिता साधारण दर्जाचे तिकीट घेऊन गाडीतील टी.सीं. ना विचारणा करून ए.सी.कोचमधून प्रवास करीत होत्या.
याबाबत त्या म्हणाल्या, कामठी स्थानकानंतर आलेल्या अरिवद विश्वकर्मा व पी.एन.रायपुरे या टी.सीं.नी ए.सी.चा इतरत्र चार्जपोटी ८४० रुपये मागितले. नियमानुसार पसे देण्यास तयारी दाखवून याची रसीद मागितली असता फक्त २०० रुपये द्या आणि मोकळे व्हा, असे हे टी.सी. म्हणाले. मग पसे देण्यास नकार दिल्यावर या दोन्ही रायपुरे व विश्वकर्मा यांनी हात पकडून चालत्या गाडीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न  केला. दरम्यान, आरडाओरड केली असता जवळील बोगीत असलेले माझे सहकारी अ‍ॅॅड.पराग तिवारी, रवी भालाधरे, विद्याधर जगनाडे आणि इतर प्रवासी  मदतीकरिता धावले. याबाबतची तक्रार त्वरित अ‍ॅॅड.पराग तिवारी यांनी गार्ड मुदलीयार यांच्याकडे केली असता त्यांनी तक्रारपुस्तिका देण्यास नकार दिला व पसे कोण खात नाही  साहेब. अपंगांना गाडीत विशेष जागा नसते, असे म्हटले. या बाबतची तक्रार गोंदिया स्थानकावर आल्यानंतर रेल्वे स्टेशन व्यवस्थापकांकडे करण्यास गेले असता या टी.सीं.नी याबाबतची आगाऊ सूचना आपल्या सहकाऱ्यांना करून तेथे इतर २०-२५ लोक जमवून ठेवले होते. त्या लोकांनी आम्हाला तक्रार पुस्तिका देण्यापासून तर तक्रार देण्यावरूनही मज्जाव केला. तरी आम्ही याबाबतची तक्रार रेल्वेच्या तक्रारपुस्तिकेत केली.
या संदर्भात गोंदिया रेल्वे स्थानकाचे स्टेशन व्यवस्थापक बी.बी.टी.राव यांना विचारणा केली असता या महिला वकीलांनी घडलेल्या घटनेची तक्रार गोंदिया स्थानकातील तक्रार पुस्तिकेत नोंदविली असून याबाबतची सूचना वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांना दिली असल्याचे सांगितले. तसेच याबाबत रेल्वेचे झोनल अधिकारी जैस्वाल यांना विचारणा केली असता या घटनेची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशी करून दोषी टी.सी. व इतर कर्मचाऱ्यांविरुद्ध कारवाई केली जाणार असल्याचे सांगितले.
प्रसंगी जैस्वाल यांना महाराष्ट्र एक्स्पेस व विदर्भ एक्स्प्रेसमध्ये दररोज साधारण दर्जाचे तिकिट घेऊन ए.सी. कोचमध्ये गोंदिया-नागपूर दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून टी.सी. प्रत्येक तिकिटमागे रसीद न देता २०० रुपये घेतात, अशा तक्रारी असल्याचे सांगितल्यावर  आपण चौकशी करून ही बाब रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून देणार असल्याचे त्यांनी सांगितले.