गेल्या काही वर्षांत अपघात व त्यातील मृत्यूचे प्रमाण वाढले असून अपघाती मृत्यू आलेल्यांमध्ये हेल्मेट न घालणाऱ्यांची संख्याही मोठी असल्याचे आढळून आले आहे.
गेल्या काही वर्षांत शहरांमध्ये अपघाती मृत्यूंचेही प्रमाण वाढले. १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०१० या वर्षांत १ हजार ५४८ अपघात घडले. त्यात ३१२ जणांचा मृत्यू झाला. २०११ मध्ये २३०, २०१२ मध्ये २७५, २०१३ मध्ये ३०४ अपघाती मृत्यू झाले. अपघाती मरण आलेल्यांपैकी ९९ टक्के दुचाकीस्वारांनी हेल्मेट घातलेले नव्हते, हे विदारक सत्य असल्याचे स्पष्ट झाले आहे. हेल्मेट न घालणाऱ्या दुचाकीस्वारांची संख्या मोठी आहे. हेल्मेट घातल्याने मृत्यू टाळता येऊ शकतो, असे अनेक तज्ज्ञांनी वेळोवेळी स्पष्ट केले आहे. डॉ. भूषणकुमार उपाध्याय नागपुरात वाहतूक पोलीस उपायुक्त असताना त्यांनी हेल्मेटची गरज नागरिकांना पटवून दिली. त्यानंतर पोलीस आयुक्त डॉ. सत्यपालसिंह यांनी दुचाकीस्वारांना हेल्मेटची सक्ती केली होती. त्यांच्या कार्यकाळात वाहतूक पोलिसांनी सक्तीने अंमलबजावणी करून हेल्मेट न घालणाऱ्यांवर कारवाईचा सपाटा लावला होता. परिणामी, त्या तीन वर्षांत अपघाती मृत्यूचे प्रमाणही कमी झाले होते.
हेल्मेट सक्तीला विरोध करणाऱ्यांची संख्याही मोठी होती. डॉ. सत्यपालसिंह यांची बदली झाली नि हेल्मेट सक्ती थंडावली. मात्र, त्यानंतरचे पोलीस आयुक्त प्रवीण दीक्षित यांनीही हेल्मेटची गरज नागरिकांना पटवून दिली. नागरिकांना सक्ती न करता पोलिसांना मात्र हेल्मेट सक्ती केली होती. त्यासाठी हेल्मेट न घालणाऱ्या पोलिसांवरही कारवाई झाली होती.
हेल्मेट घालणे योग्य की अयोग्य, याचा नागरिकांनी विचारा करावा, अशी सावध प्रतिक्रिया एका पोलीस अधिकाऱ्याने नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर व्यक्त केली. अधूनमधून हेल्मेट न घालणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाते. पोलिसांनीही आता हेल्मेटची सक्ती टाळली आहे. सध्या हेल्मेट घालून वाहन चालवणाऱ्यांची संख्या तुरळक आहे. एवढा अपवाद सोडला तर एकंदरीत हेल्मेट आता अडगळीत गेले आहेत.

वर्ष अपघात मृत्यू जखमी
२००३ १३९५ २१७ १३८१
२००४ १५४० २२७ १३७४
२००५ १६२८ २४६ १७०४
२००६ १७०८ २८७ १८०८
२००७ १५४६ २४९ १५८०
२००८ ०७७८ २६० ०८०२
२००९ १४८३ २५० १२२४
२०१० १५४८ ३१२ ०६२०
२०११ १२३२ २३० ०५८४
२०१२ १०८४ २७५ ०५४३
२०१३ १२६४ ३०४ ०६३८
१५ऑ.१४ ०९०० २२३ ०४४९