न्यायालयाच्या आवारात पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर टिप्पर गँगच्या आरोपींनी केलेल्या हल्लाची गंभीर दखल घेत यंत्रणेने घटनास्थळावरून पळालेल्या इतर संशयितांची युद्धपातळीवर धरपकड सुरू करत सहा जणांना अटक केली. त्यात चार महिलांचा समावेश आहे. अटक केलेल्या सहा जणांची गुरुवारी न्यायालयाने ११ मेपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली.
मोक्का कायद्याखाली वर्षभरापासून अटकेत असणाऱ्या टिप्पर गँगच्या आरोपींना न्यायालयात सुनावणीसाठी आणले असताना ही घटना घडली. एक कोटी रुपयांची लूट केल्याप्रकरणी गतवर्षी टिप्पर गँगचा म्होरक्या समीर पठाण, सुनील अनर्थे, गणेश वाघ, नागेश सोनवणे, नितीन काळे व सोनल भडांगे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मध्यवर्ती कारागृहातून या संशयितांना घेऊन पोलीस जिल्हा न्यायालयात आले. या वेळी संबंधितांचे काही साथीदार व नातेवाईक जमले होते. या ठिकाणी अनर्थे याच्याकडे त्याचा मित्राने भ्रमणध्वनी दिला. तो भ्रमणध्वनीवर बोलत असताना हवालदार सोमनाथ गुंबाडे यांनी हटकले असता अनर्थे व साथीदारांनी गुंबाडे यांना शिवीगाळ व दमदाटी केली. हा प्रकार पाहून पोलीस उपनिरीक्षक सचिन सावंत यांनी संशयितांकडून भ्रमणध्वनी हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. या वेळी पठाण, अनर्थे व इतर साथीदारांनी सावंत यांच्यावर थेट हल्ला चढविला. त्यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. उपस्थित पोलीस कर्मचाऱ्यांनी संशयितांना रोखण्याचा प्रयत्न केला असता संशयितांनी त्यांच्यावरही हल्ला चढविला. पठाणने सावंत यांच्याकडील पिस्तूलही खेचण्याचा प्रयत्न केला.
या वेळी मोक्का गुन्हेगारांसमवेत रहिसाना नासीर पठाण, हिना नासीर पठाण, अल्का भागवत सोनवणे, आशा बाळकृष्ण काळे, बाळकृष्ण विष्णू काळे, भागवत रघुनाथ काळे यांच्यासह इतर साथीदार व नातेवाईक उपस्थित होते. या घटनेनंतर पोलीस अधिकाऱ्यांनी न्यायालयात धाव घेतली. परंतु दरम्यानच्या काळात आरोपींचे नातेवाईक व साथीदार पसार झाले होते. पोलीस फौजफाटा दाखल झाल्यावरही आरोपी मस्तवालपणे भ्रमंती करत होते. टिप्पर गँगचा मुजोरपणा याआधी वारंवार अधोरेखित झाला आहे. टिप्पर गँगचा म्होरक्या पठाणविरुद्ध खून, दरोडा, मारहाण, लूटमार, प्राणघातक हल्ला असे ५० हून अधिक गंभीर गुन्हे विविध पोलीस ठाण्यात दाखल आहेत. यापूर्वी पठाणने इंदिरानगर पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांवर हल्ला केला होता. सहा महिन्यांपूर्वी त्याने अंबडचे पोलीस उपनिरीक्षक गावित यांच्यावर जिल्हा रुग्णालयात हल्ला चढविला होता. या प्रकरणी टिप्पर गँगचे आरोपी, त्यांचे साथीदार व कुटुंबीय अशा एकूण १० जणांविरुद्ध सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलीस यंत्रणेवर थेट हल्ला करण्याच्या घटनेची गंभीर दखल घेत पोलिसांनी संशयितांची शोध मोहीम सुरू केली. रहिसाना पठाण, हीना पठाण, आशा काळे, अल्का सोनवणे या महिलांसह बाळकृष्ण विष्णू काळे, भागवत विष्णू काळे यांना अटक करण्यात आली आहे. पठाणच्या वडिलाचांही शोध सुरू आहे. अटक केलेल्या संशयितांना गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने संशयितांना ११ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान, या प्रकरणातील अन्य चार संशयित कारागृहात आहेत. त्यांना या प्रकरणात अटक करण्याची विहित प्रक्रिया या दिवशी पूर्ण होऊ शकली नाही.